वाढीव वीजबिल माफीवर राज्य सरकारचा 'यू टर्न' ; पिंपरीत भाजपा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 03:52 PM2020-11-23T15:52:14+5:302020-11-23T15:57:00+5:30

राज्य सरकारची वाढीव वीजबिल माफीबाबतची भूमिका ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे..

State government's 'U-turn' on increased electricity bill; BJP is aggressive in Pimpri | वाढीव वीजबिल माफीवर राज्य सरकारचा 'यू टर्न' ; पिंपरीत भाजपा आक्रमक

वाढीव वीजबिल माफीवर राज्य सरकारचा 'यू टर्न' ; पिंपरीत भाजपा आक्रमक

Next
ठळक मुद्देबिजलीनगर येथे आंदोलन : वीजबिलांमध्ये दुरुस्तीची मागणी

पिंपरी : वीजबिलात सूट देण्याची घोषणा राज्य सरकारने केली. मात्र त्यानंतर घुमजाव करीत सर्वसामान्यांना वीजबिल भरण्यासाठी सक्ती केली आहे. राज्य सरकारची ही भूमिका ग्राहकांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. त्याच्या निषेधार्थ प्रभाग क्रमांक १७ बिजलीनगर येथील महावितरणच्या कार्यालयासमोर सोमवारी भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर महावितरणचे शाखा अभियंता कल्याण जाधव यांना मागणीचे निवेदन देण्‍यात आले. यावेळी महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, नगरसेविका मोना कुलकर्णी, करुणा चिंचवडे, संगिता भोंडवे, स्वीकृत प्रभाग सदस्य बिभीषण चौधरी, शेखर चिंचवडे, महिला मोर्चा मंडल अध्‍यक्षा पल्लवी वाल्हेकर, चिंचवड किवळे मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे, सरचिटणीस प्रदीप पटेल, अशोक बोडखे, रविंद्र ढाके, तेजस खेडेकर,‍ शिरीष कर्णिक, वसंत नारखेडे, संजय जगदाळे, सचिन वाणी, मुरलीधर चोपडे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

नामदेव ढाके म्हणाले, लाॅकडाऊन काळात बहुतांश कामगार घरे बंद करून मूळगावी गेले होते. त्यांच्या बंद असलेल्या घरांचे हजारो रुपयांची वीजबिले आली आहेत. तसेच दुकाने, व्यवसाय बंद असतानाही व्यावसायिक व दुकानदार यांनाही लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात वीजबिले आली आहेत. तर अनेक ठिकाणी मीटर तपासणी न करता ग्राहकांना मनस्ताप देणारी सरासरी वीजबिले पाठविण्यात आली आहेत. विजबिलात आकारणी केलेली रक्कम फार मोठ्या प्रमाणात असल्याने ती किमान कमी केली तरी नागरिकांना दिलासा मिळू शकतो. वीज दर कमी करुन दुरुस्त वीज देयके द्यावे, सर्व वीज मीटरची तपासणी करून तसेच वीज दर कमी करून दुरुस्त केलेली वीज बीले द्यावीत.

Web Title: State government's 'U-turn' on increased electricity bill; BJP is aggressive in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.