सतीश शेट्टी खून प्रकरण : सीबीआय यंत्रणाही तपासकामात अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 02:13 AM2019-01-20T02:13:30+5:302019-01-20T02:13:35+5:30

माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येला ९ वर्षांचा कालावधी उलटूनही मारेकऱ्यांचा तपास लावण्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेस अपयश आले, अशी खंत सतीश शेट्टी यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्ताने एकत्रित आलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

 Satish Shetty murder case: CBI probe fails in the investigation | सतीश शेट्टी खून प्रकरण : सीबीआय यंत्रणाही तपासकामात अपयशी

सतीश शेट्टी खून प्रकरण : सीबीआय यंत्रणाही तपासकामात अपयशी

Next

तळेगाव दाभाडे : माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येला ९ वर्षांचा कालावधी उलटूनही मारेकऱ्यांचा तपास लावण्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण यंत्रणेस अपयश आले, अशी खंत सतीश शेट्टी यांच्या नवव्या स्मृती दिनानिमित्ताने एकत्रित आलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर पुन्हा याप्रकरणी तपास व्हावा, अशी मागणी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
तळेगाव येथे स्मृती दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी नगरसेवक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते अरुण माने, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम जगताप, विजय महाजन, जमीर नालबंद, राजेंद्र जव्हेरी, किशोर कवडे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी सतीश शेट्टी यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देण्यात आला.
तळेगावात १३ जानेवारी २०१० मध्ये धारदार शस्त्राने वार करून दिवसाढवळ्या शेट्टी यांचा खून करण्यात आला. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गालगतच्या ओझर्डे व पिंपोळीतील शेतकºयांच्या शेकडो एकर जमिनी बेकायदा मार्गाने बळकावल्याची माहिती मिळाल्याने शेट्टी यांनी याबाबत आवाज उठविला होता. माहिती अधिकारातून मिळालेल्या कगदपत्रांच्या आधारे त्यांनी पाठपुरावा केला. आठशे एकर जमिनीचे भूसंपादन रद्द करावे लागले होते. त्यानंतर शेट्टी यांना धमक्या आल्या होत्या. त्यांनी २००९ मध्ये पोलीस संरक्षणाची मागणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे केली होती़ मात्र, संरक्षण मिळण्याआधीच तळेगावात त्यांची हत्या करण्यात आली. शेट्टी यांनी माहिती अधिकारांतर्गत सरकारी जमिनीचा घोटाळाही उघडकीस आणला होता. या खूनप्रकरणी पोलीस यंत्रणेकडून योग्य प्रकारे तपास होत नसल्याची तक्रार सतीश शेट्टी यांचे बंधू संदीप शेट्टी यांनी केली होती. उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. सीबीआयने २०१४ मध्ये वडगाव न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला. शेट्टी यांच्या मारेकºयांचा शोध घेण्यात तपास यंत्रणांना अपयश आले. सीबीआयकडे तपास देऊनही नऊ वर्षांच्या कालावधीनंतर काहीच निष्पन्न झाले नाही. याबद्दल आरटीआय कार्यकर्त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
>शेवटच्या श्वासापर्यंत न्यायासाठी लढणार
सतीश शेट्टी हत्या प्रकरणातील सीबीआयने दिलेल्या क्लोजर रिपोर्ट विरोधात उच्य न्यायालयात दाद मागितली आहे. पुढील आठवड्यात या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होईल. तपास यंत्रणांनी हात टेकले असले तरी बंधू सतीश शेट्टी यांच्या मारेकºयांचा शोध घेण्यासाठी तसेच त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, यासाठी आमचा लढा सुरूच राहणार आहे. तपासयंत्रणेने चुकीच्या पद्धतीने काम केले आहे. आर्थिक सौदेबाजीचा खेळ झाल्याचा संशय आहे. सीबीआयने तपास थांबवला तरी न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास कायम आहे. जिवात जीव असेपर्यंत न्याय मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे, असे संदीप शेट्टी यांनी सांगितले.

Web Title:  Satish Shetty murder case: CBI probe fails in the investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.