रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील पदपथ गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:45 AM2018-12-12T02:45:58+5:302018-12-12T02:46:15+5:30

महापालिकेचे दुर्लक्ष; व्यावसायिकांनी केले पदपथावर अतिक्रमण

Pethons in Rahatani, Pimple Saudagar area disappeared | रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील पदपथ गायब

रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरातील पदपथ गायब

Next

रहाटणी : पिंपरी-चिंचवड शहराची ओळख औद्योगिकनगरी म्हणून असली, तरी सध्या या शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू आहे. येथील प्रशस्त रस्ते, मुबलक पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था यासह अनेक नागरी प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासन आग्रही आहे. मात्र शहरातील काही भागातील नियोजनशून्य कारभारामुळे त्या भागाला बकाल स्वरूप आले आहे.

रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर परिसरातील वाढते हातगाडीवाले, पथारीवाले, छोटे व्यावसायिक यांनी काही ठिकाणी फुटपाथच गिळंकृत केल्याने नागरिकांना रस्त्यावरून ये जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या सर्व बाबीकडे पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या संबंधित अधिकारी कर्मचारी बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
महापालिका प्रशासनाकडून मागील काही वर्षांपूर्वी पथारीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते.

तापकीर चौक धोकादायक स्थितीत
एमएम शाळेकडून तापकीर चौकाकडे येणाऱ्या ४५ मीटर बीआरटीएस रस्त्याच्या कडेला फुटपाथवर विविध प्रकारच्या हातगाड्या लावल्यामुळे या फुटपाथवरून नागरिकांना चालण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नागरिक मुख्य रस्त्यावरून ये जा करीत असल्याने इतर वाहनांना ही वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर भाजी विक्रेते, फळविक्रेते, इडली डोसावाले, वडापाववाले यासह अनेक व्यावसायिक फूटपाथ व सायकल ट्रॅकवर व्यवसाय करीत असल्याने एमएम शाळा ते तापकीर चौक हा रस्ता वाहनांसाठी व पादचाºयांसाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या अतिक्रमण विभागाने या रस्त्यावरील अतिक्रमण लवकरात लवकर काढण्याची मागणी नागरिक व वाहनचालक करीत आहेत.

हातगाडी, पथारीवाल्यांच्या विळख्यात रस्ता
नखाते वस्ती चौकाची अशीच परिस्थिती झाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातगाडीवाले, फेरीवाले यांचा रस्त्यावर विळखा झाल्याने परिसराला बकाल स्वरूप आले आहे. या रस्त्यावर सायंकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी व वाहतूककोंडी होत आहे. तरी पालिका प्रशासन याकडे डोळे उघडून पाहात नाही. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यावसायिकांनी उच्छाद मांडला आहे. रहाटणी फाटा ते रहाटणी चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. मात्र याकडे पालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाला लक्ष देण्यास वेळच नसल्याचे दिसते.

रहाटणी चौकाकडून कोकणे चौकाकडे येणाºया रस्त्याची यापेक्षाही भयावह परिस्थिती झाली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फळविक्रते, भाजीविक्रेते, खाद्यपदार्थ विके्रते यासह विविध प्रकारचे व्यावसायिक व अनधिकृत वाहन पार्किंग केली असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असल्याने नागरिकांना व वाहनचालकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा पालिकेच्या संबंधित विभागात तक्रारी देऊनही याचा फायदा होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
शिवार चौकात रॅबो प्लाझासमोर सायंकाळच्या वेळेस फुटपाथवर मोठ्या प्रमाणात कपडेवाले, खेळणीवाले यासह विविध वस्तूविक्रेते बसत असल्याने फुटपाथवरून चालण्यासाठी नागरिकांना मुख्य रस्त्याचा वापर करावा लागत आहे. अनेक वेळा याठिकाणी अपघातही झाले आहेत. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे. अशीच परिस्थिती कुणाल आयकॉन रस्त्याची आहे. या रस्त्यावर तर पथारीवाल्यांच्या व स्थानिक दुकानदारांच्या अतिक्रमणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुकान सोडून रस्त्यावर सामान मांडण्याचा अजबगजब प्रकार या परिसरात नजरेस पडत आहे. काही दुकानदारांनी पोटभाडेकरू ठेवले आहेत. त्यामुळे या परिसरात मोठीच समस्या निर्माण झाली आहे. याकडे पालिका प्रशासन कधी गांभीर्याने पाहणार आहे, असा प्रश्न रहाटणी व पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना पडला आहे.
रहाटणी फाटा या ठिकाणी थेरगाव हद्दीत भाजी मंडई आहे. मात्र सायंकाळच्या वेळेस अनेक हातगाडीवाले रस्त्यावरच व्यवसाय मांडत असल्याने वाहनांसाठी ये-जा करण्यासाठी रस्ताच शिल्लक राहत नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. काळेवाडी फाटा ते एम एम शाळा या रस्त्यावर अर्धा भाग ग क्षेत्रीय कार्यालय हद्दीत येतो, तर अर्धा भाग ब या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येतो, तर पिंपळे सौदागर ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येते. मात्र कारवाई तर महापालिका भवनातील अतिक्रमण विभागाकडून होते. मग यात कामचुकारपणा होत असल्याने सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

Web Title: Pethons in Rahatani, Pimple Saudagar area disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.