One-month infant found in Pimpri railway station area | पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरात सापडले एक महिन्याचे अर्भक
पिंपरी रेल्वे स्टेशन परिसरात सापडले एक महिन्याचे अर्भक

पिंपरी : बेटी बचाव बेटी पढाव असा केंद्र सरकार नारा देत असतानाच नागरिकांना मुली नकोशा झाल्या आहेत. या संदर्भात महिन्यात तीन घटना घडल्या आहेत. शुक्रवारी सकाळी आणखी एक स्त्री जातीचे एक महिन्याचे अर्भक पिंपरी रेल्वे स्टेशन येथे सापडले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात दोन आठवड्यांत पालकांना मुले नकोशी होण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. पोटची मुले नकोशी झाल्याने आकुर्डीतील पालकांनी मुलांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना दोन फेब्रुवारीला घडली होती. त्याप्रकरणी आकुर्डीतील पंचतारानगरातील स्वप्नपूर्ती बिल्डिंग येथील राजेश आणि प्रतिभा भोसले या दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर न्यायालयाने जबाबदारी पुन्हा पालकांवर सोपविली होती.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हिंजवडीजवळील मारुंजी रस्त्यावरील हॉटेलच्या मागे शेती व मोकळ्या मैदानात अज्ञातांनी उघड्यावर अर्भक टाकून दिले होते़ दुपारी या मैदानातून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याने येथील स्थानिक तरुणाने पाहणी करून नियंत्रण कक्षाला कळविले़ त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी त्या अर्भकाला ताब्यात घेऊन उपचारासाठी औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्या अर्भकाची प्रकृती सध्या स्थिर होती.
या दोन्ही घटना ताज्या असतानाच शुक्रवारी पिंपरी रेल्वेस्थानकावर शुक्रवारी आणखी एक मुलगी सापडली आहे. पिंपरी लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलम गायकवाड या कामावर जाण्यासाठी सकाळी सव्वानऊला पिंपरी रेल्वे स्टेशन येथे आल्या असता त्यांना एक महिन्याचे स्त्री जातीचे बाळ रेल्वे स्टेशनवर आढळले. बाळाजवळ दुधाची बाटली, स्वेटर आणि कपड्याचा जोड आढळून आला. गायकवाड यांनी मातेबाबत चौकशी केली असता, आई मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी बाळाला पिंपरी रेल्वे पोलिसांकडे सुपूर्त केले. त्या बाळाला उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले आहे.


Web Title:  One-month infant found in Pimpri railway station area
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.