‘वायसीएम’मध्येही रूग्णांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 11:56 PM2017-09-17T23:56:16+5:302017-09-17T23:56:20+5:30

गरिबांना जीवन देणारे रुग्णालय म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. मात्र, या रुग्णालयातील रुग्णसेवेकडे महापालिकेचे सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे लक्ष नसल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून उघडकीस आणले आहे.

Loot of patients in YCM also | ‘वायसीएम’मध्येही रूग्णांची लूट

‘वायसीएम’मध्येही रूग्णांची लूट

Next

विश्वास मोरे ।
पिंपरी : गरिबांना जीवन देणारे रुग्णालय म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. मात्र, या रुग्णालयातील रुग्णसेवेकडे महापालिकेचे सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे लक्ष नसल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून उघडकीस आणले आहे. शिकाऊ डॉक्टरांचा भरणा, प्रशासकीय यंत्रणा नियोजन आणि अंमलबजावणीचा अभाव, जबाबदार व्यक्त तातडीक विभागात नसणे, रुग्णांना बाहेरून औषध आणायला लावणे, तसेच गोळ्या देण्याच्या नावाखाली रुग्णांच्या नातेवाइकांची ‘आर्थिक’ लूट केली जात आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे आॅपरेशन करण्याची वेळ आली आहे.
संत तुकारामनगरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील तातडीक (कॅज्युलिटी) विभाग. दुपारी पावणेचारची वेळ. वाल्हेकरवाडी, चिंचवड परिसरातील एक सर्वसामान्य कुटुंबातील ४५ वर्षीय महिला पोटात दुखते म्हणून रुग्णालयात दाखल होते. वेदनांनी अत्यंत हैराण झालेली ही स्त्री तातडीक विभागात गेल्यानंतर सीएमओ आॅफिसशेजारील वैद्यकीय अधिका-याचे केबिन मोकळेच होते. (अर्थात अधिकारी गायब). सीएमओ कार्यालयात एक डॉक्टर होते. तोंडाला मास्क लावलेले हे डॉक्टर तीस ते पस्तीस या वयोगटातील. या वेळी रुग्णास खूप वेदना होत आहेत, असे रुग्णाला बरोबर घेऊन येणाºयांनी डॉक्टरांना सांगितल्यानंतर तेथील डॉक्टरने केसपेपर काढण्याची चिठ्ठी लिहून दिली. त्यानंतर तातडीने प्रवेशद्वारासमोरील काउन्टरवरून केसपेपर काढला. त्यासाठी तेथील काउंटरवरील क्लार्कने ५०० रुपयांची नोट देऊनही नियमानुसार १० रुपये शुल्क घेतले. तेथून पुन्हा तातडीक विभागात आल्यानंतर त्याच डॉक्टरांनी आपणास पेशंटला एक इंजेक्शन द्यावे लागेल. ते तातडीने घेऊन या, असे सांगितले. ‘हे इंजेक्शन आपल्याकडे नाही का?’ असे विचारल्यावर ‘नाही, बाहेरूनच आणावे लागेल असे सांगितल्यानंतर तेथून पोलीस चौकी आणि लिफ्टशेजारील कर्मचारी महासंघाच्या मेडिकलमध्ये चिठ्ठी घेऊन गेल्यानंतर इंजेक्शन दिले. दहा रुपये घेतले. त्यावर पावती द्या, अशी मागणी तेथील व्यक्तीला केली. आता पावती मिळणार नाही, नंतर या. इंजेक्शन घेऊन पुन्हा तातडीक विभागात गेल्यानंतर डॉक्टरने इंजेक्शन दिले. गोळ्या घेऊन या असे केसपेपरवर लिहून दिले. रुग्णालयाच्या मेडिकलमधून गोळ्या घेतल्या. तेथेही नियमानुसारच दहा रुपये शुल्क घेतले. पुन्हा तातडीक विभागात आल्यानंतर संबंधित रुग्णाच्या वेदना काही कमी होत नव्हत्या. त्या वेळी संबंधित डॉक्टर म्हणाले, ‘‘आणखी एक इंजेक्शन बाहेरून आणावे लागेल व चिठ्ठी लिहून दिली. त्यानंतर पुन्हा महासंघाच्या मेडिकलमध्ये गेल्यानंतर ५६ रुपये घेतले. ते तीन इंजेक्शन होते. पुन्हा पावती दिली नाही. तीनपैकी एकच इंजेक्शन फोडून पेशंटला दिले गेले. तरीही रुग्णाच्या वेदना कमी होत नव्हत्या. त्यानंतर डॉक्टरांनी गोळ्यांचे एक पाकीट दिले. रुग्णाबरोबर आलेल्यांना वाटले ते फुकट असेन. मात्र, गोळ्या दिल्यानंतर डॉक्टर रुग्णाच्या अवतीभवतीच फिरत होते. काही वेळाने रुग्णाजवळ आले आणि म्हणाले, त्या गोळ्यांचे १०० रुपये द्यावे लागतील.’ अडला हरी म्हणून रुग्णासोबत असलेल्यांनी डॉक्टरांना १०० रुपये दिले. त्यानंतर गोळ्या, इंजेक्शन घेतल्या. दरम्यान, अपघाताचा एक रुग्ण दाखल झाल्याने डॉक्टर त्या रुग्णाला तपासण्यासाठी गेले. त्यानंतर सुमारे अर्धा तास रुग्णास बरे वाटेना, म्हणून सीएमओ कार्यालयासमोरच असणा-या स्पेशल वॉर्डात नेले. (ओळख सांगितल्यानंतर सूत्रे हलली) तेथील डॉक्टरांनी तपासले. मेडिकल हिस्ट्री लिहून घेतली. त्यानंतर एक्स रे, पोटाची सोनोग्राफी केली.
तीन आठवड्यांपूर्वीच महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी अचानकपणे भेट देऊन वायसीएम रुग्णालयाची पाहणी करून स्टिंग आॅपरेशन केले होते. वायसीएमचा कारभार बेभरोसे असल्याचे आढळून आले होते. रुग्णांशी भेटून डॉक्टर, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला होता.
रुग्णांची हेळसांड, डॉक्टर-कर्मचा-यांची कमतरता असल्याचे आढळून आले होते. उपचाराचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत आयुक्तांशी होणा-या बैठकीला अजूनही वेळ सापडलेली नाही. सत्ताधारी व प्रशासनाने गांभीर्याने विचार करून आॅपरेशन करण्याची गरज आहे. तरच रुग्णांवर चांगले उपचार होतील.

Web Title: Loot of patients in YCM also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.