वर्षाविहारासाठी खंडाळा, लोणावळ्यात पर्यटकांची तुडुंब गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 05:28 AM2018-07-02T05:28:46+5:302018-07-02T05:28:58+5:30

मागील आठवड्यात भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याचे समजल्यानंतर या धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाºया पाण्यात बसून चिंब भिजण्याचा व वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरिता आज मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले.

 Khandala, Lonavala, Tourists crowd | वर्षाविहारासाठी खंडाळा, लोणावळ्यात पर्यटकांची तुडुंब गर्दी

वर्षाविहारासाठी खंडाळा, लोणावळ्यात पर्यटकांची तुडुंब गर्दी

Next

लोणावळा : मागील आठवड्यात भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याचे समजल्यानंतर या धरणाच्या पायऱ्यांवरून वाहणाºया पाण्यात बसून चिंब भिजण्याचा व वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरिता आज मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले. मात्र पावसाने मागील काही दिवसांपासून शहरात दांडी मारल्याने आज पर्यटकांना कडक उन्हाचा सामना करावा लागला.
भुशी धरणाच्या पायºयांवरून वाहणारे पाणी कमी झालेले असतानादेखील धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक जण पाणी दिसेल त्या ठिकाणी भिजण्याचा आनंद घेत होते. सहारा पुलावरील दोन्ही धबधबे पावसाअभावी कोरडे पडले होते, तर गिधाड तलाव येथील धबधब्यातून पडणाºया पाण्याखाली पर्यटकांची गर्दी झाली होती. लायन्स पॉइंट व शिवलिंग पॉइंट येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र पावसाअभावी सर्वत्र पर्यटकांचा हिरमोड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. लायन्स पॉइंट येथे पोलीस प्रशासन, तसेच वन विभागाचे कर्मचारी नसल्याने पर्यटक बिनदिक्कतपणे सुरक्षा रेलिंगच्या पुढे धोकादायकपणे दरीच्या तोंडाजवळ फोटो काढण्याकरिता जात होते. खंडाळ्यातील राजमाची पॉइंट येथेदेखील सुरक्षेची उपाययोजना नसल्याने पर्यटक धोकादायकपणे दरीच्या तोंडावर जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करतात. हे दोन्ही पॉइंट वन विभागाच्या जागेत असल्याने त्यांनी येथील सुरक्षेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
मोठ्या संख्येने पर्यटक आज लोणावळ्यात आल्याने मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर झालावाडी ते गवळीवाडा नाका व गवळीवाडा नाका ते एल अ‍ॅन्ड टी ट्रेनिंग सेंटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. भुशी धरणाकडे जाणाºया मार्गावर
रायवूड कॉर्नर ते थेट भुशी धरण अशी पाच किमी अंतरापर्यंत व परतीच्या मार्गावर भुशी गाव ते आयएनएस शिवाजी गेटपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतराकरिता पर्यटकांना तास-दोन तास वाहतूककोंडीचा सामना
करावा लागला. वाहतूक नियोजनाकरिता, तसेच धरण सुरक्षेकरिता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दुप्पट दराने हुक्का विक्री
लायन्स पॉइंटवर खुलेआम सुरू असलेल्या हुक्का विक्रीवर मागील पंधरावड्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केल्यानंतर येथील हुक्का विक्री बंद होण्याऐवजी ती दुप्पट दराने व छुप्या पद्धतीने सुरू झाली आहे. हुक्क्याच्या एका पॉटकरिता एक हजार ते बाराशे रुपये घेऊन पर्यटकांना त्यांच्या गाडीत अथवा पॉइंटपासून काही अंतरावर हुक्का लावून देण्याची तजवीज केली जात असल्याचे पाहणीमध्ये निदर्शनास आले. हुक्काविक्रेत्यांना हुक्का एवढा महाग का विकता, अशी विचारणा केली असता पोलीस कारवाई करतात. त्यांना हप्ता द्यावा लागतो. तुम्हाला हवा तेवढा हुक्का मिळेल, असे विक्रेत्यांनी सांगितले.

त्यांना रोखणार कोण?
लायन्स पॉइंटच्या दरीजवळ जाणे धोकादायक आहे. सुरक्षा रेलिंगच्या पुढे जाऊ नका, असे बोर्ड वन विभागाने लावलेले असतानादेखील पर्यटक या सूचनांकडे काणाडोळा करीत रेलिंगच्या पुढे जात आहेत. अनेक ठिकाणचे रेलिंगच गायब झाले आहेत. स्थानिकांनी सूचना केली तरी दुर्लक्ष करत पर्यटक हुल्लडबाजी करत आहेत. या हुल्लडबाजांवर कारवाई होत नाही.

Web Title:  Khandala, Lonavala, Tourists crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.