खड्डे बुजवण्यासाठी नगरसेवक करताहेत जेट पॅच मशिनसाठी आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:18 AM2018-07-25T01:18:54+5:302018-07-25T01:19:09+5:30

हट्ट पुरविताना महापालिका प्रशासनाच्या आले नाकी नऊ

Inspectors for jet patch machines are being used by the corporators to build potholes | खड्डे बुजवण्यासाठी नगरसेवक करताहेत जेट पॅच मशिनसाठी आग्रह

खड्डे बुजवण्यासाठी नगरसेवक करताहेत जेट पॅच मशिनसाठी आग्रह

googlenewsNext

भोसरी : भोसरीसह परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी नगरसेवकांकडून जेट पॅचर मशिनचाच आग्रह धरला जात आहे. नगरसेवकांचा हट्ट पुरवता पुरवता प्रशासनाच्या चांगलेच नाकी नऊ आले आहे.
शहरातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मॉन्सूनपूर्व डागडुजी करण्यात न आल्याने रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात डांबर उपलब्ध होत नाही. रस्ते तयार करताना महापालिकेकडून शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब होत नाही. रस्त्याच्या कामाचा योग्य दर्जाही राखला जात नाही. त्यामुळे खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस उग्र बनत चालली आहे. खड्ड्यांच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार शहरात प्रथमच जेट पॅचर पोथॉल मशिनद्वारे खड्डे बुजवले जात आहेत. महापालिकेने ठेकेदाराकडून दोन मशिन या कामासाठी घेतल्या आहेत. त्यावर सुमारे सव्वा आठ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
यापूर्वी खड्ड्यात मुरुम अथवा खडी भरून त्यावर डांबरी पट्टे मारले जायचे. या तात्पुरत्या मलमपट्टीमुळे काही दिवसांतच खड्डे ‘जैसे थे’ दिसायचे. मात्र, जेट पॅचर मशिनमुळे शास्त्रीय पद्धतीने खड्डे भरले जातात. रस्ता स्वच्छ केल्यानंतर खड्ड्याची समपातळी करून त्यावर मशिन ठेवली जाते. खड्ड्याच्या जागेवर जाळी ठेवून त्याचे तापमान उष्ण केले जाते. त्यानंतर रासायनिक प्रक्रिया केली जाते. थंड डांबराचे गोळे त्यावर टाकले जातात. पुन्हा त्यावर मशिन ठेवली जाते. त्यामुळे डांबराचे गोळे वितळतात आणि डांबराचे मिश्रण एकजिनसी होते. ते पुन्हा रस्त्याला घट्ट बसते. त्यावर दाब मशिन फिरविली जाते. या प्रक्रियेला ३० ते ३५ मिनिटांचा कालावधी लागतो.
या मशिनच्या साहाय्याने दिवसभरात २० ते २५ खड्डे भरले जातात. खड्डे दुरुस्ती परिमाणकारक होत असल्यामुळे नगरसेवकांकडून या मशिनला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सर्वच प्रभागांतील नगरसेवक या मशिनचा आग्रह धरत असल्याने प्राधान्य कोणाला द्यायचे, असा प्रश्न प्रशासनापुढे पडतो. काही नगरसेवक अधिकाऱ्यांशी वाद घालतात. पावसाची उघडीप न मिळाल्यास प्रशासनाच्या अडचणींमध्ये भर पडते. केवळ नगरसेवक नव्हे, तर कार्यकर्ते, विविध संघटनांकडून खड्डे बुजवण्यासाठी मशिनची मागणी केली जाते. खड्ड्यांबाबत येणाºया तक्रारी आणि दोनच मशिन उपलब्ध असल्याने प्रशासनाला खड्डे दुरुस्तीसाठी धावाधाव करावी लागत आहे. ‘वेटिंग लिस्ट’ तयार करून पावसाची उघडीप मिळताच स्थापत्य विभागाकडून हे खड्डे ‘जेट पॅचर’द्वारे दुरुस्त केले जात आहेत.

महापालिकेतर्फे जेट पॅचर तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांवर पडलेले खड्डे भरले जात आहेत. दोन मशिनच्या साहाय्याने सर्व प्रभागांमध्ये तक्रारीनुसार खड्डे दुरुस्ती केली जात आहे. पावसाची थोडी उघडीप मिळाल्यानंतर ज्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, ते तातडीने बुजविण्यात येत आहेत. खड्डे दुरुस्ती चांगल्या पद्धतीने होत असल्याने नगरसेवकांकडून जेट पॅचरचा आग्रह धरला जात आहे. अधिकाधिक खड्डे दुरुस्तीचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.
- शिरीष पोरेड्डी, स्थापत्य विभाग, महापालिका

Web Title: Inspectors for jet patch machines are being used by the corporators to build potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.