१९४७ च्या लढ्यातून स्वातंत्र्य हे चुकीचे - सुमित्रा महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:34 AM2018-07-09T01:34:33+5:302018-07-09T01:34:55+5:30

देशाला स्वातंत्र्य मिळाले याचे श्रेय अनेक गोष्टींना आहे. फक्त १९४७च्याच स्वातंत्र्यलढ्यातून स्वातंत्र्य मिळाले असे म्हणणे चुकीचे ठरेल.

 Independence is wrong with the 1947 fight - Sumitra Mahajan | १९४७ च्या लढ्यातून स्वातंत्र्य हे चुकीचे - सुमित्रा महाजन

१९४७ च्या लढ्यातून स्वातंत्र्य हे चुकीचे - सुमित्रा महाजन

Next

पिंपरी - देशाला स्वातंत्र्य मिळाले याचे श्रेय अनेक गोष्टींना आहे. फक्त १९४७च्याच स्वातंत्र्यलढ्यातून स्वातंत्र्य मिळाले असे म्हणणे चुकीचे ठरेल. स्वातंत्र्यासाठी १८५७ ते १९४७ हा शंभर वर्षांचा कालखंड महत्त्वाचा आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरापासून ते महात्मा गांधींचा लढ्यापर्यंतच्या एकत्रितपणे दिलेल्या लढ्याचा परिपाक स्वातंत्र्य आहे, असे मत लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले.
चिंचवडमधील क्रांतिवीर चापेकरवाड्यात क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या टपाल तिकीट अनावरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यसभेचे खासदार अमर साबळे, आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, महाराष्ट्र व गोवा राज्याचे मुख्य पोस्टमास्तर हरीश अगरवाल, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह सतीश गोरडे, सहकार्यवाह रवी नामदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मिलिंद देशपांडे आदी उपस्थित होते.
सुमित्रा महाजन म्हणाल्या, ‘‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी योगदान दिलेल्या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाप्रति आपण कृतज्ञ असायला हवे. आपला इतिहास वेळोवेळी आपल्या स्मृतीत असायला हवा. देश आणि देशवीरांप्रति आदराची भावना असायला हवी. राष्ट्रभक्ती आणि कामाची निष्ठा यातून अनेक गोष्टी साकार होतात.’’
खासदार बारणे म्हणाले, ‘‘क्रांतिवीर चापेकर बंधूंचा इतिहास संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. एकाच परिवारातील तीन भावंडे स्वातंत्र्यसंग्रामासाठी शहीद झाले होते. क्रांतिवीर चापेकरांच्या नावाने टपाल तिकीट काढण्याबाबत मी गेली तीन वर्षे पाठपुरावा करीत होतो. चापेकरांच्या स्वातंत्र्यसंग्रामाचे सर्व पुरावे संबंधित मंत्रालयात दिले होते. केंद्र सरकारने दामोदर हरी चापेकर यांच्या नावाने टपाल तिकीट काढण्यास परवानगी दिली. आज त्या सर्व पाठपुराव्याचे चीज झाल्याची भावना निर्माण झाली आहे.’’

टपाल खात्याला मृतावस्था
टपाल खात्याला मृतावस्था आली आहे. कारण आपण पत्र लिहायला विसरलो आहोत. आपल्या जवळच्या माणसांशी बोलायला आपल्याला वेळ नाही आणि शेकडो मैल दूर असणाऱ्या अज्ञात मित्रांशी बोलताना आपण धन्यता मानू लागलो. त्यामुळे ही अवस्था झाली आहे. आपल्या लोकांसोबतच संवाद हरवत चालला आहे. तो पुन्हा पूर्ववत होणे आवश्यक आहे. आपण आपल्या माणसांना आपल्या मनातल्या गोष्टी लिहिल्या, तर मन मोकळे होते. मन मोकळे होणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे सुमित्रा महाजन म्हणाल्या.

स्वातंत्र्यसमराविषयी बोलताना महाजन म्हणाल्या, ‘‘चापेकर बंधूंप्रमाणेच राष्टÑासाठी प्राणार्पण करणाºया क्रांतिकारकांमुळे, देशभक्तांमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्यासाठी १८५७ ते १९४७ हा नव्वद वर्षांचा कालखंड महत्त्वाचा आहे. केवळ १९४७ च्या लढ्यामुळे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणणे चुकीचे ठरेल. स्वातंत्र्यासाठी अनेक देशभक्तांनी प्राणांची आहुती दिली. ‘चले जाव’चा नारा दिला आणि इंग्रज गेले असेही नाही.
स्वातंत्र्यासाठी अनेकांच्या प्राणाच्या आहुतीची किंमत देशाला चुकवावी लागली. मात्र, स्वातंत्र्याबद्दल एकच गाणे वाजविले जात आहे. स्वातंत्र्याचा विचार घेऊन महात्मा गांधीजींनी घराघरांत जागृती निर्माण केली. सामान्यांमध्ये आत्मविश्वास भरला. नव्वद वर्षांच्या एकत्रित प्रयत्नातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य चळवळीत पुण्याचेही मोठे योगदान होते. चापेकर यांच्या नावाने टपाल तिकीट सुरू होणे ही केवळ उत्सवाची बाब नाही, तर टपाल तिकिटाच्या माध्यमातून त्यांना वाहिलेली खरी आदरांजली आहे. त्यांचा इतिहास यानिमित्ताने संपूर्ण देशभरात वारंवार पोहोचणार आहे.’’

देशाच्या इतिहासात चापेकर अजरामर आहेत. जेव्हा जेव्हा आपण चापेकरांचे तिकीट दिसेल तेव्हा तेव्हा त्यांचा संपूर्ण इतिहास डोळ्यांसमोर येईल. देशासाठी बलिदान देणाºया शहिदांना अशा प्रकारच्या उपक्रमांमधून आदरांजली वाहता येईल.
- गिरीश बापट

पुण्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक स्वातंत्र्यसैनिक या भूमीत होऊन गेले आहेत. त्यांचे स्मरण यानिमित्ताने होत आहे.
- हंसराज अहिर

Web Title:  Independence is wrong with the 1947 fight - Sumitra Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.