फूटपाथ झाले गायब; पिंपरी चिंचवड शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 05:09 PM2017-11-28T17:09:13+5:302017-11-28T17:14:19+5:30

encroachment on Footpath; pimpari chinchwad municipal, police neglected issue | फूटपाथ झाले गायब; पिंपरी चिंचवड शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर

फूटपाथ झाले गायब; पिंपरी चिंचवड शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न ऐरणीवर

Next
ठळक मुद्देरहाटणी, पिंपळे सौदागर व काळेवाडीतील फूटपाथवर सर्वच स्थरातील व्यापाऱ्यांचे अतिक्रमणअतिक्रमण विभाग, वाहतूक पोलीस डोळेझाक करीत असल्याचा रहिवाशी, वाहनचालकांचा आरोप

रहाटणी : शहरात रोजच वाढणारी वाहन संख्या व नित्यनियमाने होणारी वाहतूककोंडी त्यामुळे नागरिकांना रस्त्याने चालताना होणारा त्रास यावर उपाय म्हणून शहरात पालिका प्रशासनाने ठिकठिकांणी रस्त्याच्या कडेला फूटपाथ तयार केले आहेत. मात्र याचा फायदा नागरिकांना होतो काय हा खरा प्रश्न आहे. रहाटणी, पिंपळे सौदागर व काळेवाडी परिसरातील जवळजवळ सर्वच रस्त्यावरील फूटपाथवर सर्वच स्थरातील व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे त्यामुळे नागरिकांना जीव मुठीतधरून रस्त्याने चालावे लागत आहे. संबंधित परिसरातील रस्त्यावरील फुटपाथवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले तरी पालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्पा आहेत त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. 
पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ते कुणाल आयकॉन रस्त्याच्या दुतर्फा बसणार्या हातगाडीवाले, फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांनी रस्ता गिळकृंत केल्याने या अडचणीत आणखीच भर पडली आहे. या समस्यकडे पालिका प्रशासनाचे अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलीस डोळेझाक करीत असल्याचा आरोप येथील रहिवाशी व वाहन चालक करीत आहेत. चौकात वाढलेल्या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे  कुणाल आयकॉन रस्ता व शिवार चौकाचा  श्वास गुदमरत असून वाहतूककोंडीचा प्रश्न दिवसे दिवस किचकट होत आहे. या रस्त्यावर रुपये लाखो खर्च करून पालिकेने फूटपाथ तयार केले आहे मात्र याचा फायदा वाटसरूंना न होता येथील हातगाडीवाले,फेरीवाले, छोटे व्यावसायिक व स्थानिक व्यापारी यांना होत आहे. जे नागरिक वर्षाकाठी हजारो रुपये पालिकेचा कर भरतात त्यांना चालण्यासाठी फुटपाथचा वापर करता येत नाही, मात्र जे हातगाडीवाले, फेरीवाले छोटे व्यावसायिक एक रुपाया पालिकेला कर भरत नाहीत ते मात्र फुटपाथचा पुरेपूर उपयोग करीत आहेत. तरी पालिका प्रशासन याकडे डोळे झाक करीत आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे संतापले आहेत. याच रस्त्यावर अनेक स्थानिक व्यापारी दुकानातील माल सरास फूटपाथवर मांडले आहेत. तर अनेक दुकानदारांनी दुकानाचे शेड रस्त्यावर थाटले आहे. काही दुकानदारांनी पार्किंगमध्येच वाढीव बांधकाम करून दुकाने थाटली आहेत. याकडे पालिकेचे संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी जाणूनबुजून कानाडोळा करीत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिक करीत आहेत. 
शिवार चौकाला तर बकालपणा आला आहे. या चौकात सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थांच्या हातगाड्या लागलेल्या असतात. तसेच शिल्लक राहिलेले खाद्य पदार्थ अनेक वेळा तेथेच कुठेतरी टाकले जाते. त्यामुळे या चौकात दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे. अनेकवेळा सिग्नलला थांबलेल्या वाहनचालकाला नाकाला रुमाल धरल्या शिवाय थांबताच येत नाही किंवा रस्त्याने चालणाºया नागरिकांचा दुर्गंधीमुळे जीव गुदमरल्याशिवाय राहत नाही. एवढी भयावह परिस्थिती असूनसुद्धा पालिका प्रशासनाची अतिक्रमण विभाग कारवाई करण्यात वेळकाढूपणा करीत आहे. जर एखाद्या वेळेस कारवाई केलीच तर हा अमुक एकाचा ह्याच्यावर कारवाई नको असे करून कारवाई केली जाते अनेक वेळा कारवाईत दुजाभाव केला जात आहे. त्यामुळे काही ठराविक हातगाडीवाले फेरीवाले यांच्यावरच कारवाई  केली जाते. मात्र स्थानिक व्यापाऱ्यांवर कधीच कारवाई करण्यासाठी अधिकारी पुढे जात नाहीत अशी परिस्थिती आहे.
या पेक्षा भयावह परिस्थिती रहाटणी चौक ते रहाटणी फाटा या दुतर्फा रस्त्याची आहे. रहाटणी फाट्यापासून रहाटणीकडे  नखाते वस्तीपर्यंतच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने फुटपाथ मात्र यावर स्थानिक व्यापाऱ्यांनी आपला कब्जा केला आहे. त्यामुळे पायी ये जा करणाऱ्या नागरिकांना मुख्य रस्त्याचा वापर करावा लागत आहे. मुळात या रस्त्याचे विकास आराखड्यानुसार रुंदीकरणाचा झाले नाही. त्यामुळे कुठे फुटपाथ आहे तर कुठे नाही. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुतर्फा अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांची संख्या जास्त असल्याने इतर वाहनांना ये जा करण्यास फक्त एकच लेन शिल्लक राहत असल्याने इतर वाहन चालकांना व वाटसरूंनासुद्धा जीव मुठीत धरून चालावे लागते. एखादा अपघात झाला तर याला जवाबदार कोण, असा सवाल विचारला जात आहे. 
नखातेवस्ती चौक ते रहाटणी चौक हा रस्ता अद्याप फुटपाथच्या प्रतीक्षत आहे. त्यामुळे या रस्त्यावर चालणाºया नागरिकांना मुख्य रस्त्याचाच आधार घ्यावा लागत आहे. मात्र प्रगत पालिका हद्दीतील गावामध्ये अशी भयावह परिस्थिती का असू शकते असे  एक ना अनेक प्रश्न स्थानिक नागरिकांना सतावत आहेत. या रस्त्यावर ना रस्ता दुभाजक ना फुटपाथ मात्र रस्त्याच्या कडेला शंभर टक्के अतिक्रमण अशी परिस्थिती या रस्त्याची झाली आहे त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेले पालिका प्रशासन जागे कधी होणार अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
 यापेक्षा वेगळी परिस्थिती काळेवाडी येथील तापकीर चौक ते पिंपरी पूल या रस्त्याची नाही. या रस्त्यावरील फुटपाथवर  देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. रस्त्याच्या दोन्हीबाजूने सकाळ सायंकाळ हातगाडीवाले फेरीवाले छोटे व्यावसायिक यांनी अतिक्रमण केल्याने नागरिकांना ये-जा करणे म्हणजे रस्त्यावर जीव गमवणे झाले आहे. अनेकवेळा पालिकेची अतिक्रमण कारवाई करणारे अधीकारी कर्मचारी सर्व फौजफाटा घेऊन जातात मात्र त्या आधीच हे व्यावसायिक पाय काढतात याचा अर्थ काय, आज कारवाई होणार हे त्या व्यापाऱ्यांना कळते कुठून हा खरा प्रश्न आहे. या संदर्भात स्थानिक नागरी म्हणाले, की व्यापारी व अधिकारी यांच्या अर्थपूर्ण हितसंबधामुळे ही खबर दिली जाते. 
रहाटणी फाटा चौकात मजूर अड्डा असल्याने अगदी सकाळी चौकात मोठ्या प्रमाणात मजूर उभे असतात. त्यामुळे चहावाले, नाश्तावाले, फळ विक्रते यांच्या इतर व्यवसायाच्या हातगाड्या मोठ्या प्रमाणात ह्या हातगाड्या सर्रास मुख्य रस्त्यावर लागत असल्याने रस्त्याने पायी ये जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्याचा आधार घ्यावा लागत आहे.पिंपरीकडून येणारी बस किंवा इतर वाहनांना रहाटणीकडे  जाणार्या रस्त्यावर  वळायचे झाल्यास  सहा सीटर रिक्षा,तीन सीटर रिक्षा व हातगाडीवाले फेरीवाले, टेंपोवाले  यांनी सर्व रस्ताच काबीज केला  असल्यानें  रस्ता तीन पदरी  असूनही वाहन चालकांना रस्ता शोधावा लागत  आहे. वाहन चालकांना रस्ताच मोकळा मिळत नसल्याने चौकात वाहनांच्या रांगाच रांगा लागत असल्याने वाहन चालक नाराजी व्यक्त करीत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजच वाहतूककोंडी होऊनही पालिका प्रशासनाचे अतिक्रमण विभाग व या भागातील वाहतूक पोलीस विभाग मूग गिळून गप्प असल्याने येथील रहिवाशी नाराजी व्यक्त करीत आहेत.खरेतर या ठिकाणच्या सहा सतार रिक्षावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होणे अपेक्षित आहे मात्र यांना वाहतूक पोलीसच पाठीशी घालीत असल्याने याचा त्रास सवार्नाच होगावा लागत आहे. 

दुकानदारांचा डबल धंदा         
रोजच होणारी वाहतूक कोंडी यावर कुठेतरी अंकुश यावा म्हणून शहरातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात रुंदीकरण करण्यात आले. यासाठी अनेक मिळकतधारकांनी आपल्या जमिनी दिल्या. त्यामुळे रस्ते मोठे झाले मात्र वाहतूककोंडीचा प्रश्न सुटला नाही. कारण दुकानाच्या समोर पोट भाडेकरू ही प्रथा सध्या अनेक दुकानदार अवलंबित आहेत. दुकानाच्या समोर जागा  हातगाडीवाले, फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांच्याकडून ठराविक रक्कम घेऊन भाड्याने दिली आहे. त्यामुळे दुकानासमोरील फुटपाथ व रस्ता शिल्लकच राहिला नाही. पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ते कुणाल आयकॉन रस्त्यावरील अनेक दुकानदारांच्या समोर पोटभाडेकरू आहेत काही ठिकाणी तर एक नव्हे दोन नव्हे तीन चार भाडेकरू ठेवण्यात आले आसत्याने रस्त्याची व फुटपाथची जागा व्यापली आहे. अनेक हातगाडीवाले, फेरीवाले यांनी तर हॉकर्स झोनच्या नावाखाली या रस्त्याला पूर्णपणे बकाल केले आहे. त्यामुळे पिंपळे सौदागर हे स्मार्टसिटी म्हणून उदयास येईल की नाही अशी शंका जाणकार व्यक्त करीत आहेत. 

Web Title: encroachment on Footpath; pimpari chinchwad municipal, police neglected issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.