उद्योगनगरीत आमदारांच्या घरवापसीची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 03:35 AM2018-12-14T03:35:05+5:302018-12-14T03:35:31+5:30

राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या नेत्यांना अपेक्षा; पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालाचा परिणाम

Discussion of family members' resignation | उद्योगनगरीत आमदारांच्या घरवापसीची चर्चा

उद्योगनगरीत आमदारांच्या घरवापसीची चर्चा

Next

पिंपरी : पाच राज्यांतील निवडणुकीच्या निकालानंतर गतवर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादीतून काही नेत्यांनी पक्षांतर केले होते. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत दाखल झालेल्या या आमदारांची घरवापसी होणार का, याबाबतची चर्चा शहरात रंगली आहे. मात्र, भाजपा व शिवसेनेच्या विद्यमान आमदारांनी घरवापसीला नकार दिला आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ती कायम होती. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि निवडणुकींमध्येही मोदी करिष्मा दिसून आला. अगदी दोन दिवसांपूर्वी नगर व धुळे महापालिकांच्या निवडणुकीतही भाजपाला बहुमत मिळाले. त्यामुळे भाजपाची लाट अजून ओसरली नसल्याचे बोलले जात होते. तसेच, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका भाजपातून लढविण्यास अनेक नेते इच्छुक असल्याचे बोलले जात होते.

दरम्यान, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम या राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या आशेने भाजपात आणि शिवसेनेत जाऊनही शहरातील एकही आमदार मंडळींना मंत्रीपद अथवा महामंडळ मिळाले नाही. त्यामुळे ही मंगळी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घरवापसी करणार की नाही? याबाबतची चर्चा रंगली आहे.

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीपूर्वी चिंचवड विधानसभेचे अपक्ष आणि राष्टÑवादी संलग्न आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर ते भाजपाचे आमदार, शहराध्यक्षही झाले. तसेच भोसरी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष महेश लांडगे हे अपक्ष निवडणूक लढवून आमदार झाले. त्यानंतर त्यांनी भाजपा संलग्न आमदार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. जगताप आणि लांडगे यांनी मिळून महापालिकेत सत्ता आणली.

पिंपरी विधानसभेतून शिवसेनेचे गौतम चाबुस्कार हे निवडून आले होते. चाबुकस्वार यांनीही काँग्रेसचा राजीनामा देऊन ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे तेही घरवापसी करणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, घरवापसीला भोसरी, चिंचवड आणि पिंपरीच्या आमदारांनी नकार दिला आहे. आम्ही आमचा पक्ष सोडणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे.

शहरातील नागरिकांचे महत्त्वाचे प्रश्न सुटले जावेत या उद्देशाने मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानुसार बहुदा शहरातील प्रश्न सुटले असून, राहिलेले प्रश्नदेखील सुटण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भाजपामध्ये मी समाधानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात व राज्यात जोरदार विकासाची कामे सुरू आहेत. प्रत्येक शासकीय योजना ही तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. - लक्ष्मण जगताप, आमदार, चिंचवड

आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानतो. पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. शहराचा विकास करण्याची जबाबदारी त्यांनी आमच्यावर दिली आहे. त्यानुसार विकास वेगाने सुरू झाला आहे. तसेच विकासकामे दिसू लागली आहेत. पक्षनेतृत्वाचा आमच्यावर विश्वास आहे. त्यामुळे भाजपाबरोबरच राहणार आहे. आम्ही परत जाणार या विरोधकांनी उठविलेल्या वावड्या आहेत.
- महेश लांडगे, आमदार, भोसरी

शहरातील भाजपाचे नेते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नाही. राष्ट्रवादीची काही मंडळी याविषयीच्या अफवा पसरविण्याचा उद्योग करीत आहेत. मात्र, भाजपातून कोणतेही नेते, नगरसेवक अथवा कार्यकर्ते पक्ष सोडून घरवापसी करणार नाहीत. - एकनाथ पवार
सत्तारूढ पक्षाचे गटनेते

शहरातील आमचे सर्व नेते व कार्यकर्ते भाजपात सुखी व समाधानी आहेत. नेत्यांनी सर्व कार्यकर्त्यांना वेळोवेळी संधी दिलेली आहे. त्यामुळे कोणीही पक्ष सोडून जाणार नाही.
- राहुल जाधव, महापौर

चार वर्षांनंतरही नाही मंत्रिपद
गेल्या चार वर्षांपासून पिंपरी-चिंचवडला मंत्रिपद मिळणार, अशी चर्चा रंगली आहे. हे मंत्रिपद जगताप की लांडगे यांना मिळणार या विषयी उत्सुकता आहे. भाजपात जुना व नवीन असे दोन गट पडले आहे. वरिष्ठ नेते मंडळींचा स्थानिक राजकारणात हस्तक्षेप वाढला आहे. तसेच आश्वासन देऊनही मंत्रिपद अथवा महामंडळ दिले नाही. त्यामुळे विद्यमान आमदारांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोरामचे निकाल फिरल्याने हे भाजपाचे दोन आमदार पुन्हा घरवापसी करतील, अशी चर्चा सुरू आहे.

Web Title: Discussion of family members' resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.