पार्किंग आरक्षणे विकसित करा, मगच धोरण राबवा!, सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 03:15 AM2018-06-16T03:15:55+5:302018-06-16T03:15:55+5:30

महापालिकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहनतळ धोरण राबविण्यात येत आहे. याबाबत आज सर्वपक्षीय चर्चा झाली. त्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे या विरोधी पक्षांनी विरोध केला आहे.

Develop parking reservations, demand of all-party corporators | पार्किंग आरक्षणे विकसित करा, मगच धोरण राबवा!, सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

पार्किंग आरक्षणे विकसित करा, मगच धोरण राबवा!, सर्वपक्षीय नगरसेवकांची मागणी

Next

पिंपरी - महापालिकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाहतूककोंडी टाळण्यासाठी वाहनतळ धोरण राबविण्यात येत आहे. याबाबत आज सर्वपक्षीय चर्चा झाली. त्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे या विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. शहरातील पार्किंगची आरक्षणे विकसित करा, त्यानंतर धोरण राबवा, अशी भूमिका घेतली; तर सत्ताधारी भाजपाने या भूमिकेचे समर्थन केले आहे.
महापालिकेतील तिसऱ्या मजल्यावरील स्थायी समितीच्या दालनात वाहनतळ धोरणावर सादरीकरण आणि चर्चा झाली. या वेळी उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले, महिला व बालकल्याण समिती सभापती
स्वीनल म्हेत्रे, जैवविविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, सह शहर अभियंता राजन पाटील, सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
या वेळी राजन पाटील यांनी सुरुवातीला सादरीकरण केले. त्यानंतर राहुल कलाटे यांनी वाहनतळाची आरक्षणे किती विकसित झाली, याची माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी केली. त्यावर पाटील यांनी शहरात वाहनतळाची ८९ आरक्षणे असून, त्यांपैकी २१ आरक्षणे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ०.२१ टक्के आरक्षणे विकसित झाली आहेत, असे उत्तर दिले. त्यावर कलाटे म्हणाले, ‘‘अगोदर आरक्षणे विकसित करा, लोकांना पर्याय द्या. कोणाच्या तरी तुंबड्या भरण्यासाठी ठेकेदारी चालविण्यासाठी हे धोरण तर आणले जात नाही ना, हे तपासले पाहिजे.’’
विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनीही धोरणास विरोध केला. साने म्हणाले, ‘‘पार्किंगची आरक्षणे विकसित केली नाहीत आणि नवीन धोरण आणले जात आहे. जगाच्या नकाशावरील शहरांची अनेक उदाहरणे सादरीकरणात दिली. आपल्या शहराचे पाहा. कुणाला तरी डोळ्यांसमोर ठेवून हे धोरण राबविले जात आहे. अगोदरच नागरिक शास्तीकराने पिचले आहेत. त्यात हा नवीन कर लादणार आहोत. नागरिकांवर बोजा कशासाठी? वाहतूक समस्या जटिल होईपर्यंत अधिकारी काय झोपले होते का?’’

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘वाढत्या वाहनांची समस्या पाहता भविष्याच्या दृष्टीने पार्किंग धोरण ठरविण्याची गरज आहे. तसेच काही नागरिक त्यांची वाहने दिवसभरासाठी एखाद्या ठिकाणी पार्क करतात. त्यामुळे त्या ठिकाणी अल्प कालावधीसाठी येणाºया नागरिकांना त्यांचे वाहन पार्क करणे अवघड जाते.’’
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘नागरिकांना विविध ठिकाणी वाहनतळ उपलब्ध होण्यासाठी सार्वजनिक वाहनतळ धोरण ठरवून ते राबविण्याची गरज आहे. कोणालाही डोळ्यांसमोर ठेऊन धोरण
केलेले नाही. विरोधाला विरोध ही भूमिका विरोधी पक्षाची नसावी. पार्किंग धोरण ही शहराची गरज आहे. त्यासाठी यावर चर्चा आहे. धोरण कसे राबवायचे यासाठी सूचना आवश्यक आहेत. दराबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही.’’

-मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले, ‘‘पार्किंग पॉलिसी करताना नागरिकांवर बोजा पडणार नाही ना, याची दक्षता घ्यायला हवी. निगडीतील भक्तीशक्ती चौक, गर्दीच्या ठिकाणांचा विचार करायला हवा.’’
-माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर म्हणाल्या, ‘‘पुण्याने पार्किंग पॉलिसी फेटाळली आहे. मग आपल्याकडे हा आग्रह कोणासाठी आणि कशासाठी केला जात आहे. दराबाबत विचार करण्याची गरज आहे. विशिष्ट लोकांना डोळ्यांसमोर ठेवून धोरण केले आहे.’’
-भाजपाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी वाहनतळ पॉलिसीवरून भाजपाला घरचा आहेर दिला. वाघेरे म्हणाले, ‘‘पिंपरी कॅम्पच्या विकासासाठी काहीही प्रयत्न झालेले नाहीत. आरक्षणांचा विकास होण्याबाबत अधिकाºयांची भूमिका सकारात्मक नाही. आता पिंपरीकरांनाच टार्गेट केले जात आहे. आमदारांनी परिसर वाटून घेतले आहेत. आम्हाला कोणी वाली नाही.’’

Web Title: Develop parking reservations, demand of all-party corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.