उद्योगनगरीला डेंगीचा विळखा; पंधरा दिवसांमध्ये २६ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 01:07 AM2018-09-15T01:07:04+5:302018-09-15T01:07:31+5:30

स्वाइन फ्लूने गेल्या महिनाभरापासून शहरामध्ये कहर केला असून, आता डेंगीचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Dangi is known for industrialization; 26 patients in fifteen days | उद्योगनगरीला डेंगीचा विळखा; पंधरा दिवसांमध्ये २६ रुग्ण

उद्योगनगरीला डेंगीचा विळखा; पंधरा दिवसांमध्ये २६ रुग्ण

Next

पिंपरी : शहरामध्ये साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. मलेरिया, डेंगी या आजाराच्या रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्वाइन फ्लूने गेल्या महिनाभरापासून शहरामध्ये कहर केला असून, आता डेंगीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
सप्टेंबर या महिन्यामध्ये तापाचे तीन हजार १४० रुग्ण आढळले आहेत. त्यातील १८३ संशयित रुग्णांपैकी २६ रुग्णांना डेंगीची लागण झाली आहे. जानेवारी २०१८ पासून आजपर्यंत ९५४ रुग्णांपैकी ८७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. महापालिकेच्या व खासगी रुग्णालयांमध्येही उपचार उपलब्ध आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले, तर हा आजार प्राणघातक ठरू शकतो. डेंगीची लागण झाल्यावर डोके, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये या लक्षणांमध्ये वाढ होते. उच्च ताप, पुरळ आणि स्नायू यामध्ये तीव्र वेदना होतात. प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. अशा वेळी रक्तस्राव होण्याची शक्यता असते. रक्तस्राव झाल्यामुळे रक्तदाब वाढून श्वसन प्रक्रियेवर परिणाम होतो. ही शेवटची स्थिती मानली जाते. अशा परिस्थितीमध्ये तातडीने उपचार मिळणे आवश्यक असते.
डेंगी हा विषाणूजन्य आजार आहे. त्याचा प्रसार एडिस या डासांमार्फत होतो. आजारी माणसाच्या रक्तातील डेंगी विषाणू इडिस जातीच्या डासांच्या मादीमार्फत दुसºया निरोगी व्यक्तीच्या शरीरात संक्रमित होतात. हे डास समुद्रसपाटीपासून सुमारे १००० मीटरपर्यंतच्या भागात जिवंत राहतात. इडिस हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमीटर असतो.

ताप आल्यानंतर लगेचच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. ताप जास्त दिवस अंगावर काढू नये. या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी डासांना आळा घालणे महत्त्वाचे आहे. आपल्या परिसरामध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. घराजवळ असलेल्या रिकाम्या भांड्यांमध्ये, कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. अंगभर कपडे घालावेत. डेंगीच्या आजारावर प्रतिजैविक लस उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये डेंगीची लक्षणे वाटल्यास डॉक्टरांकडून शहानिशा करून त्वरित उपचार घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Dangi is known for industrialization; 26 patients in fifteen days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.