‘सीसीटीव्ही’ची यंत्रणा केवळ शोभेला , शहरातील प्रमुख चौक सोसायट्यांचे कॅमेरे निरूपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 03:07 AM2017-10-20T03:07:17+5:302017-10-20T03:08:00+5:30

पिंपरी-चिंचवड येथील प्रमुख चौकांमध्ये कार्यान्वित असलेली सीसीटीव्ही यंत्रणा केवळ वाहतूक व्यवस्थेसाठी उपयोगात आणली जात आहे. पण त्याचा नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपयोग होत नाही.

 The 'CCTV' system is not only decorated, the cameras of the head quarters of the city are useless | ‘सीसीटीव्ही’ची यंत्रणा केवळ शोभेला , शहरातील प्रमुख चौक सोसायट्यांचे कॅमेरे निरूपयोगी

‘सीसीटीव्ही’ची यंत्रणा केवळ शोभेला , शहरातील प्रमुख चौक सोसायट्यांचे कॅमेरे निरूपयोगी

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड येथील प्रमुख चौकांमध्ये कार्यान्वित असलेली सीसीटीव्ही यंत्रणा केवळ वाहतूक व्यवस्थेसाठी उपयोगात आणली जात आहे. पण त्याचा नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपयोग होत नाही. शिवाय बाजारपेठेतील हॉटेल, दुकाने आदी ठिकाणी वैयक्तिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारली आहे. मात्र, सार्वजनिक सुरक्षेसाठी ती कुचकामी ठरत आहे. गृहसंस्थांमध्ये कॅमेरे बसविले आहेत. मात्र, रोजचे फुटेज संकलित करण्याची यंत्रणा नसल्याने सोसायट्यातील चोरीचे प्रकरणे उजेडात आणण्यासाठी त्याचा उपयोग होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत टीम’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मधून समोर आले.

पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. वाहतूक नियमांचे
उल्लंघन करून जाणाºया वाहनांना त्यामुळे वचक बसला आहे, असे मानले जाते. काहींना सिग्नल तोडल्याप्रकरणी वाहतूक विभागाकडून नोटीस पाठवून दंड भरण्यास सांगितले गेल्याने बेशिस्त चालकांनी धसका घेतला आहे.
वेळ दुपारी बाराची. चौकात नव्याने सिग्नल बसविण्याचे काम सुरू आहे. पिंपरी बाजारपेठेतून चौकात येणाºया मार्गावर, खराळवाडीकडून पिंपरीकडे येणाºया मार्गावर आणि मुंबई-पुणे महामार्गावर दोन्ही बाजंूना दुचाकीस्वार स्वयंशिस्त पाळताना दिसून येत होते. सिग्नल तोडताना कॅमेºयात कैद झाल्यास दंडाची नोटीस घरी येईल, अशी त्यांना भीती वाटत होती. मात्र थोडे अंतर पुढे गेल्यानंतर अस्ताव्यस्त अशा पद्धतीने रस्त्यातच रिक्षा उभ्या केल्याचे दिसून आले. मध्येच अचानक थांबणाºया रिक्षा, पूर्ण रस्ता बंद होईल, असे थांबून मध्येच उतरणारे प्रवासी हे कॅमेºयात कैद होईल,अशी सीसीटीव्ही यंत्रणा मात्र, येथे दिसून येत नाही. चौकाच्या पुढे काही अंतरावर हे रिक्षावाले थांबतात. जवळ बँक आहे; परंतु बँकेचे कॅमेरे आतील बाजूस आहेत. त्यातही बेशिस्त रिक्षाचालक कैद होत नाहीत. अर्थातच चौकात सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम असली, तरी बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई होत नाही.
पिंपरी बाजारपेठेतील अनेक गृहसंस्था, मोजकी दुकाने, मॉल या ठिकाणीच सीसीटीव्ही यंत्रणा दिसून येते. सराफी व्यावसायिकांच्या पेढ्या ज्या ठिकाणी आहेत, अशा काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. काही दुकानांमध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेºयाच्या निगराणीखाली आहात, असे केवळ फलक दिसतात.
चिंचवड स्टेशन चौकात वाहतूक सिग्नलजवळ कॅमेरे आहेत. या कॅमेºयांच्या कक्षेत मोठा परिसर येतो. शिवाय डाव्या बाजूला व्यापारी संकुल आहे. या व्यापारी संकुलात दुकानांच्या आवारात कॅमेरे लावलेले दिसून येत आहेत. काही सुरू आहेत, काही बंद आहेत. एखादी अनुचित घटना घडल्यास सीसी फुटेज तपासण्याची वेळ येते. त्या वेळी फुटेज उपलब्ध होत नाही. सीसीटीव्ही यंत्रणा सुरू आहे की बंद, हे वेळोवेळी तपासले पाहिजे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

कॅमेरे बसविण्यासाठी दोन कोटींचा प्रस्ताव

लोणावळा : पर्यटनाचे मध्यवर्ती ठिकाण असलेले लोणावळा शहर सुरक्षित करण्यासाठी सर्व चौकांत सीसीटीव्हींसाठी दोन कोटींचा प्रस्ताव निधीसाठी शासनाकडे पाठविला आहे. नगर परिषदेतर्फे नव्या प्रशासकीय इमारतीमध्ये ६४ कॅमेरे बसविले आहेत. रेल्वे स्थानकावर ४८ कॅमेरे बसवून स्थानकाचे प्रवेशद्वार ते स्थानकाचा परिसर, पादचारी पूल सुरक्षित केले आहेत. मध्यवर्ती चौकांत पोलीसांच्या वतीने चार कॅमेरे बसविले आहेत. यापैकी कुमार व शिवाजी चौकातील कॅमेरे सुरू असून पावसामुळे जयचंद चौक व रायवूड चौकातील कॅमेरे बंद पडले आहेत. भांगरवाडी व खंडाळा येथे लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कॅमेरे बसविले आहेत. पोलीस स्थानकातही अधिकारी कक्षापासून ठाणे अंमलदार कक्षापर्यंत कॅमेरे बसविले आहेत. यासह बहुतांश हॉटेल, मॉल, दुकाने यांचे कॅमेरे चालू स्थितीमध्ये आहेत. शहराचा इतरत्र अद्याप कोठेही सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नाहीत.

प्रवाशांची सुरक्षा वा-यावर
तळेगाव दाभाडे : फ्रेंड्स आॅफ नेचरचे संस्थापक महेश महाजन व स्थानिक नगरसेवक गणेश खांडगे, अमोल शेटे, संग्राम काकडे, नगरसेविका नीता काळोखे यांनी स्वखर्चाने काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक, तळेगाव स्टेशन भागातील एसटी स्टँड परिसर, इंद्रायणी कॉलेजसमोरील भाग, कडोलकर कॉलनी या भागात कॅमेºयाची नजर राहणार आहे. तळेगाव रेल्वे स्थानक व घोरावाडी रेल्वे स्थानक येथेही कॅमेरे नसल्याने प्रवाशांची सुरक्षा रामभरोसेच आहे.
तळेगावमध्ये सुरक्षितता धोक्यात
४नगर परिषदेने कोठेही सीसीटीव्ही कॅमेºयांची व्यवस्था केलेली नसल्याने येथील नागरिकांची सार्वजनिक ठिकाणावरची सुरक्षाव्यवस्था रामभरोसे झाली आहे. खुद्द नगर परिषद कार्यालयातील सीसीटीव्हीची यंत्रणा बुजगावण्याच्या स्थितीत आहे. सीसीटीव्ही यंत्रणेचे पासवर्ड मागील दोन-तीन महिन्यांपासून मागणी करूनही कंपनीकडून रिसेट करून न मिळाल्याने होत असलेले रेकॉर्डिंग पाहता येत नाही़, हे वास्तव समोर आले आहे. सीसीटीव्ही कॅमेºयाचा स्क्रीन ब्लॅकआऊट असल्याने विविध कक्षात नेमके काय चालले आहे़ यावर मुख्याधिकाºयांना नजर ठेवता येत नाही. ही यंत्रणा कालबाह्य झाली आहे. नगर परिषद शिक्षण मंडळ कार्यालयात कॅमेरे नाहीत. मात्र, नगर परिषदच्या शाळांमध्ये कॅमेरे आहेत. खासगी शाळा व परिसरातील आवारात कॅमेºयाची वानवा आहे.

 
सुरक्षा व्यापा-यांच्या सीसीटीव्हीवर
देहूरोड : येथील बाजारपेठेत पाहणी केली असता ग्राहकांची सुरक्षा केवळ व्यापा-यांच्या सीटीटीव्हीच्या भरवश्यावर असल्याचे दिसून आले. बाजारपेठेतील विविध व्यावसायिक, व्यापारी व खरेदीसाठी येणाºया पंचक्रोशीतील २०-२५ गावांतील ग्राहकांच्या सुरक्षेसाठी शहरी भागाप्रमाणे अद्याप राज्य सरकार, कॅन्टोन्मेंट बोर्ड, अगर पोलीस यंत्रणेकडून सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले नसल्याचे चित्र समोर आले आहे.
विविध सराफी पेढ्या, कापड दुकाने व किराणा मालाच्या दुकानांत भेट दिली असता संबंधित व्यापाºयांनी त्यांच्या व्यवसायाच्या सुरक्षेसाठी स्वत: किमान चार ते कमाल आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचे सांगितले. काही किराण्याच्या चार तर सोन्याच्या दुकानांत आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. काही सराफांनी सुरक्षारक्षक ठेवल्याचे आढळले.
सुभाष चौक, स्वामी विवेकानंद चौक, महर्षी वाल्मीकी चौक, मुख्य बाजारपेठ, दत्त मंदिर रस्ता, तसेच अबुशेठ रस्ता आदी महत्त्वाच्या ठिकाणी कॅन्टोन्मेंट व पोलीस यंत्रणेमार्फत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.

Web Title:  The 'CCTV' system is not only decorated, the cameras of the head quarters of the city are useless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.