‘बीआरटी’चा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 04:49 AM2017-08-06T04:49:47+5:302017-08-06T04:50:07+5:30

निगडी ते दापोडी मार्गावर बस रॅपिड ट्रान्सपोेर्ट सिस्टीम (बीआरटीएस) मार्गिका हा प्रकल्प उभारून तीन वर्षे उलटली, तरी ही मार्गिका सुरू होण्यास अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही.

 'BRT' game window | ‘बीआरटी’चा खेळखंडोबा

‘बीआरटी’चा खेळखंडोबा

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : निगडी ते दापोडी मार्गावर बस रॅपिड ट्रान्सपोेर्ट सिस्टीम (बीआरटीएस) मार्गिका हा प्रकल्प उभारून तीन वर्षे उलटली, तरी ही मार्गिका सुरू होण्यास अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. दरम्यान, आता पुण्याहून पिंपरीपर्यंतच्या मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी वाहतूक वळविण्यात येत आहे.
एकीकडे मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला असताना बीआरटीएस मार्गिकेच्या उद्घाटनाचा मुहूर्त मात्र लांबणीवरच पडत आहे. त्यामुळे आता तरी बीआरटीएस मार्गिका सुरू होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार, की उद्घाटनाबाबत केवळ ‘तारीख पे तारीख’ ऐकायला मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला
आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसचा प्रवास जलद व विनाअडथळा व्हावा, यासाठी शहरात बस रॅपिड ट्रान्सपोेर्ट सिस्टीम (बीआरटीएस) प्रकल्प हाती घेण्यात आला. या प्रकल्पातील शहरात निगडी-दापोडी, किवळे-सांगवी, देहू-आळंदी रस्ता ते काळेवाडी आणि नाशिक फाटा-वाकड या मार्गांवर ‘बीआरटीएस’चे काम हाती घेण्यात आले.
दरम्यान, प्रशस्त रस्ते असताना बीआरटीएस कशासाठी, यावरून या प्रकल्पाला विरोध करण्यात आला. मात्र, तरीही प्रकल्पाचे काम सुरूच ठेवले. निगडी-दापोडी या मार्गिकेचे काम २०१४ मध्ये सुरूकरण्यात आले. या मार्गावर मधोमध ग्रेड सेपरेटर, शेजारी बीआरटीएस मार्गिका आणि त्यानंतर सेवा रस्ता अशी रचना करण्यात आली. दरम्यान, ग्रेड सेपरेटरमधून बाहेर पडण्यास ‘मर्ज आऊट’, तर आत जाण्यास ‘मर्ज इन’ करण्यात आले. मात्र, ग्रेड सेपरेटरमधून सेवा रस्त्यावर येताना बीआरटीएस मार्गिकेचा अडथळा येत असल्याने अपघाताची शक्यता वर्तविली
जात आहे. तसेच या मार्गिकेवरील थांब्यावर उतरणारे प्रवाशांना धोकादायकरीत्या सेवा रस्ता ओलांडावा लागणार, असाही मुद्दा उपस्थित झाला. दरम्यान, निगडी ते दापोडी या मार्गिकेवर दोन्ही बाजूने बसथांबे उभारण्याचे नियोजन आहे.

मेट्रोच्या कामामुळे वाढली प्रतीक्षा
मेट्रोच्या कामासाठी खराळवाडी ते दापोडीपर्यंत पुणे-मुंबई महामार्गावर तसेच ग्रेड सेपरेटरमधील दुभाजकांवर पिलर उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत वाहतूक पोलिसांनी बदल केले असून काही मार्ग बंद केले आहेत. ग्रेड सेपरेटरमधील एका लेनवरून दोन वाहने जात असतात. मात्र, एका लेनमधील अर्ध्या जागेवर मेट्रोच्या कामासाठी बॅरिकेडस उभारण्यात आल्याने लेनमधून एकच वाहन जात आहे. यामुळे ग्रेड सेपरेटरमधील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.त्यामुळे अनेक जण सेवा रस्त्याचा वापर करत असून यामुळे सेवा रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. खासगी वाहनांसह पीएमपी बसेसचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. अशावेळी बंद असलेल्या बीआरटीएस मार्गिकेमधून बसेस धावल्यास सेवा रस्त्यावर पुरेशी जागा उपलब्ध होईल.

चारचाकींचा शिरकाव : लोखंडी खांबही तुटले
बीआरटीएस मार्गिकेवरील लोखंडी खांबही तुटले बीआरटीएसच्या उद्घाटनास अवधी लागणार असल्याने काही दिवसांपूर्वीच ही मार्गिका केवळ दुचाकीसाठी खुली करण्यात आली. केवळ दुचाकीच आतून जाव्यात यासाठी मार्गिकेत आत प्रवेश करण्याच्या ठिकाणी लोखंडी खांब उभारण्यात आले. यामुळे दुचाकी या मार्गिकेतून जाऊ लागल्या. मात्र, आता प्रवेश करण्याच्या ठिकाणी असलेले लोखंडी खांबही तुटले आहेत.

निगडी-दापोडी बीआरटीएस मार्गिकेची बांधणी झालेली आहे. केवळ काही बसथांब्यांची उभारणी तसेच इतर किरकोळ कामे उरली आहेत. मेट्रोच्या कामाचा कसलाही अडथळा निर्माण होणार नाही. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही मार्गिका सुरू होईल.
- विजय भोजने, प्रवक्ता, बीआरटीएस

Web Title:  'BRT' game window

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.