भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर? महापौर नितीन काळजेंसह क्रीडा समिती सभापती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 04:08 AM2018-03-04T04:08:38+5:302018-03-04T04:08:38+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष निवडणुकीसाठी भाजपाच्या ममता गायकवाड यांनी एकमेव अर्ज दाखल केला होता. अध्यक्षपदासाठी डावलल्याने आमदार महेश लांडगे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

BJP is on the threshold of a split? Mayor Nitin Kaljen and sports committee chairman | भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर? महापौर नितीन काळजेंसह क्रीडा समिती सभापती

भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर? महापौर नितीन काळजेंसह क्रीडा समिती सभापती

googlenewsNext

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष निवडणुकीसाठी भाजपाच्या ममता गायकवाड यांनी एकमेव अर्ज दाखल केला होता. अध्यक्षपदासाठी डावलल्याने आमदार महेश लांडगे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेवटच्या दोन तासांत राजीनामा नाट्य सुरू झाले़ त्यामुळे भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर असून महापौर नितीन काळजेंसह स्थायी समिती सदस्य राहुल जाधव, शीतल शिंदे, क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते यांनी राजीनामे दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड स्थायी समिती अध्यक्षपदी आमदार महेश लांडगे गटाचे राहुल जाधव, निष्ठावान सदस्य म्हणून विलास मडिगेरी, शीतल शिंदे या तिघांच्या नावाची चर्चा होती. अध्यक्षपद भोसरीला मिळणार की पिंपरी, चिंचवडला मिळणार याबाबत उत्सुकता होती. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती. दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऐनवेळी ममता गायकवाड यांचे नाव देण्यात आले. त्यामुळे आमदार लांडगे गटात जोरदार खळबळ माजली. दुपारी तीनला महापौर नितीन काळजे यांनी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्याकडे राजीनामा दिला. त्यानंतर विधी समिती आणि स्थायी समिती सभापतिपदातही डावल्याने शीतल शिंदे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते यांनी राजीनामा दिला आहे.
गायकवाड यांची अडचण वाढली
भाजपातर्फे स्थायी समिती अध्यक्षपदासाठी ममता गायकवाड यांचा एकमेव अर्ज असला तरी स्थायीतील सोळापैकी दोन जणांनी राजीनामे दिले आहेत. स्थायीत भाजपाचे बहुमत असल्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्यांच्या नावावर सात मार्चला शिक्कामोर्तब होईल. तर नाराजीचा परिणाम म्हणजे गटबाजी उफाळून येऊ शकते. तसेच राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने मोरेश्वर भोंडवे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे गायकवाड यांची अडचण वाढली आहे. गायकवाड या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांच्या पत्नी आहेत, गायकवाड हे आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक आहेत. निवडणुकीच्या आधी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. गायकवाड यांच्या निवडीमुळे अध्यक्षपद दुसºयांदा चिंचवड विधानसभचे प्रमुख अर्थात आमदार जगताप यांच्या समर्थकाकडे आले आहे.

भोसरी आमदार गटाचा राष्ट्रवादीस पाठिंबा
महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष निवडणुकीत शनिवारी वेगवान घडामोडी घडल्या. आमदार जगताप यांच्या समर्थकांचा अर्ज भरण्यात आला. त्यामुळे तिघांनी राजीनामा दिला. त्यामुळे भाजपातील गटबाजी झाल्याने चार सदस्य असलेल्या राष्ट्रवादीने स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उडी घेत मोरेश्वर भोंडवे यांचा अर्ज दाखल केला आहे. स्थायी समिती अध्यक्षपदात डावलल्याने आमदार लांडगे समर्थक भोंडवे यांना पाठिंबा देणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

समजूत घालण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न
स्थायी समिती अध्यक्षपदावरून गटबाजी उफाळून आली आहे. नाराज झालेल्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केले आहेत. पालकमंत्री गिरीश बापट, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेही समजूत काढणार असल्याचे समजते. प्रदेशाध्यांकडे गायकवाड यांची वर्णी लागावी म्हणून आमदार जगताप समर्थक आणि पिंपरीतील एक माजी नगरसेवक हे तळ ठोकून होते. त्यामुळे गायकवाड यांची वर्णी लागल्याची चर्चा महापालिकेत होती.


मला महापौरपदाचा मान दिला. त्याबद्दल मी पक्षाचा ऋणी आहे. यानिमित्ताने भाजपाचा पहिला महापौर होण्याचा मान मला मिळाला. परंतु, माझा पदाचा राहुल जाधव यांना स्थायीचे अध्यक्षपद मिळण्यासाठी भौगोलिक अडसर ठरत होता. आम्ही दोघेही भोसरी मतदार संघातील आहोत. त्यामुळे जाधव यांच्या पदासाठी माझा अडसर ठरू नये, यासाठी मी राजीनामा देत आहे.
- नितीन काळजे,
महापौर

Web Title: BJP is on the threshold of a split? Mayor Nitin Kaljen and sports committee chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.