Priya Singh: दोन मुलांच्या आईला बॉडी बिल्डिंगच्या जोरावर बॉलिवूडमध्ये संधी; कोण आहे ही धाकड गर्ल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 12:56 PM2022-12-26T12:56:28+5:302022-12-26T13:06:42+5:30

Rajasthan women bodybuilder Priya Singh: प्रिया सिंग ही राजस्थानमधील बॉडी बिल्डर असून तिने जागतिक बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप थायलंड येथे सुवर्ण पदक जिंकले आहे.

बॉडीबिल्डिंग स्पर्धेत केवळ पुरूषांचे वर्चस्व असते असे मानले जात होते. मात्र, राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या प्रिया सिंगने हा समज चुकीचा ठरवला. काही वर्षांपूर्वी प्रिया सिंगने बॉडीबिल्डिंगच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि काही वर्षांतच उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पदके जिंकली.

प्रियाने आता थायलंडमध्ये झालेल्या बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव उंचावले आहे. नॅचरल बॉडीबिल्डिंग युनियन इंटरनॅशनलतर्फे 8 डिसेंबर रोजी बँकॉक येथे 39 व्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रिया सिंग ही राजस्थानची पहिली बॉडीबिल्डर आहे जिने वर्ल्ड बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता. प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर भाग घेत प्रियाने सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव उंचावले आहे.

खरं तर प्रिया सिंग ही सामान्य कुटुंबातील आहे. लग्नानंतर ती सासरी गेली आणि दोन मुलांची आई झाली. आई झाल्यानंतर प्रियाने या क्षेत्रात पाऊल टाकले आणि नाव कमावले.

प्रिया सिंग सांगते की, पहिल्यांदा तिने रोजगारासाठी जिममध्ये नोकरी सुरू केली. याच काळात बॉडीबिल्डिंगमध्ये जाण्याची आवड निर्माण झाली. नियमित जिम केल्यानंतर तिचे शरीर मजबूत झाले. मग ती बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागली

राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये प्रियाने सलग तीनवेळा सुवर्ण पदक जिंकले. प्रियाने सांगितले की, राजस्थानमध्ये तिने मिस राजस्थान 2018, 2019 आणि 2020 मध्ये बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.ि

नियमितपणे जिममध्ये घाम गाळल्यानंतर प्रिया सिंग जिम ट्रेनर बनली. मग तिच्या देखरेखीखाली आता अनेक मुली या क्षेत्रात रस घेऊ लागल्या आहेत.

प्रिया सिंगची बॉडी पाहून बॉडी बिल्डिंग उत्पादने बनवणाऱ्या अनेक कंपन्यांनी तिला ब्रँड ॲम्बेसेडर बनण्याची ऑफर देतात. मात्र, सुरूवातीला तिने या सर्वांकडे दुर्लक्ष केले. पण नंतर ती एका कंपनीची ब्रँड ॲम्बेसेडर झाली.

बॉडीबिल्डिंग क्षेत्रात सक्रिय असण्यासोबतच प्रिया सिंग एक सामाजिक कार्यकर्त्या आहे. ती सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेते. ती अनेक स्वयंसेवी संस्थांशी देखील संबंधित आहे, ज्याद्वारे ती असहाय्य प्राण्यांना नेहमी मदत करते.

प्रिया सिंगने टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. अलीकडेच प्रिया सिंगने जयपूरमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. यादरम्यान प्रियाने चित्रपटाचा नायक सनी देओलसोबत एक फोटोही शेअर केला होता.