Independence Day 2022: देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात RSSचा खरंच सहभाग नव्हता का? नेमकं सत्य काय? पाहा, जाणकारांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 04:38 PM2022-08-15T16:38:23+5:302022-08-15T16:44:33+5:30

Independence Day 2022: पूर्ण स्वातंत्र्याचा पहिला उल्लेख राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच केला होता. महात्मा गांधींनीही RSSच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे कौतुक केले होते, असे काही जाणकार सांगतात.

संपूर्ण देशभरात भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ व्या अमृत महोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या आवाहनला प्रतिसाद देत देशवासीयांनी घरोघरी तिरंगा ही मोहीम यशस्वी करून दाखवल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण देश तिरंगी रंगात न्हाऊन निघत असल्याचे सांगितले जात आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यवीरांचे स्मरण आणि त्यातून पुन्हा एक नवी प्रेरणा देशवासी घेत आहे. मात्र, यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होता की नाही, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Independence Day 2022)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून घडलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून भाषण केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ साली झाली. या संघटनेचे संस्थापक होते डॉ. केशव बळीराम हेडगेवार. या संघटनेची स्थापना जेव्हा करण्यात आली, त्यावेळी भारत स्वातंत्र्याची लढाई लढत होता. डॉ. हेडगेवार यांना स्वातंत्र्यलढ्यात दोनदा तुरुंगात जावे लागले होते. भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळायला हवे, हे पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनात डॉ. हेडगेवार यांनी सांगितले होते, याबाबत संघाचे जाणकार माहिती देतात.

इतकेच नाही तर देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी त्यांनी त्यांचे सरसंघचालक पदही सोडले होते. याचा अर्थ असा होता की, संघटनेच्या पातळीवर नव्हे तर प्रेरणा म्हणून स्वयंसेवकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे. अशा प्रकाराने हजारो स्वयंसेवकांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला, इतकेच नाही तर काही जणांनी त्यासाठी बलिदानही केले.

दुसरे सरसंघचलाक माधव सदाशिव गोळवलकर यांनी स्वयंसेवकांना यासाठी परावनगी दिली नाही, असाही प्रवाद आहे. मात्र असे अनेक प्रसंग आहेत, ज्यावेळी गोळवलकर यांनी स्वयंसेवक हे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊ शकतात, असे सांगितले. संघावर पुस्तक लिहिणारे लेखकांच्या मते, १९३० साली लाहोर अधिवेशनात काँग्रेसने पूर्ण स्वराज्य स्वाकीर केले होते. ही बातमी हेडगेवार यांना कळाल्यानंतर, त्यांनी संघातील सर्व शाखांवर स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचे संदेश १९३० सालीच पाठवले होते. तसेच स्वातंत्र्याचा अर्थही स्वयंसेवकांना समजावून सांगा असेही सांगितले होते.

संघाने स्वातंत्र्यलढ्यात सहभागी न होता इंग्रज आणि इंग्लंडच्या राजसत्तेला साथ दिली, असा आरोप सातत्याने संघावर करण्यात येतो. मात्र संघाने इंग्रजांना साथ दिली हा आरोप अत्यंत चुकीचा आहे, असे संघाचे जुने प्रचारक राहिलेले देवेंद्र कश्यप यांचे म्हणणे आहे. संघटना म्हणून संघ या लढ्यात सहभागी झाला नसला तरी स्वयंसेवक या लढ्यात होतेच, असेही ते नमूद करतात.

संघ स्वयंसेवकांनी वेगवेगळ्या संघटना आणि पक्षांच्या वतीने आयोजित आंदोलने आणि सत्याग्रहांत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. हे वास्तव असताना संघाने काहीच केले नाही, असे म्हणणे चुकीचे असल्याचे भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता नामक पुस्तक लिहिणारे सहगल स्पष्टपणे सांगतात. काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी, संघ स्वयंसेवकांच्या स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाचा उल्लेखच नाकारला, स्वयंसेवकांचा सहभागच नसल्याचे समाजमनावर गोंदले, असे सहगल यांचे म्हणणे आहे.

सन १९३० पूर्वी काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्य याचा उच्चारही कधी केला नव्हता. पूर्ण स्वातंत्र्याचा पहिला उल्लेख हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच केला आणि हेच त्याचे उद्दिष्ट्य होते. राष्ट्पिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या असहकार आंदोलनात, डॉ. हेडगेवार यांनी सहा हजारंहून अधिक स्वयंसेवकांसह सहभाग घेतला होता. तसेच सत्याग्रहही केला होता, असेही सहगल यांचे म्हणणे आहे.

योजनापूर्वक अर्धाच इतिहास सांगण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. भारतातील काहीजण हे १९४२ चे आंदोलन आणि काँग्रेसमुळे स्वातंत्र्य मिळाले हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतरांनी कुणी त्यासाठी योगदान दिले नाही, असे ठासवण्याचा हा प्रयत्न आहे. हा संकुचित विचार आहे, असे संघाचे सहकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य सांगतात.

सन १९२१ साली जेव्हा प्रांतीय काँग्रेस बैठकीत क्रांतीकारकांची निंदा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यावेळी डॉ. हेडगेवार यांनी त्याला विरोध केला होता. त्यांच्या या विरोधामुळे हा प्रस्ताव मागे घेण्यात आला होता. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकमान्य अणे हे होते. हेडगेवार हे क्रांतिकारकांना देशभक्त मानत होते, त्यामुळे ते निंदेचा विषय ठरलेले आहेत. क्रांतिकारकांच्या पद्धतीवर आक्षेप असू शकतो, मात्र त्यांच्या देशभक्तीवर शंका घेणे, हा गुन्हा आहे, असे हेडगेवारांचे मत होते, असेही ते सांगतात.

सरदार पटेल यांच्यासह काँग्रेसमधील असा एक गट होता ज्यांना संघाप्रती ममत्व होते. संघाचे स्वयंसेवक हे देशभक्त आहेत, अशी त्यांची धारणा होती. गांधी हत्येनंतर काँग्रेसमधील विरोधकांना संधी मिळाली आणि त्यांनी संघ कार्यकर्त्यांना अटक केली. नंतर त्यांच्याच लक्षात आले की संघावर बंदी घालणे योग्य ठरणार नाही. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर झालेली चौकशी आणि सर्व बाबी पाहिल्यानंतर सरदार पटेल म्हणाले होते की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा यात कुठल्याही प्रकारे सहभाग नाही.

सन १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधी यांनी गोळवलकर गुरुजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर गोळवलकर गुरुजी दिल्लीला तातडीने आले आणि बिर्ला भवनात त्यांची महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली होती. गांधी संघाच्या एखाद्या कार्यक्रमात जाऊन स्वयंसेवकांना संबोधित करणार होते. बिर्ला भवन जवळील एका मैदानावर ५०० स्वयंसेवकांसमोर महात्मा गांधी यांचे भाषण झाले होते. त्यात त्यांनी संघाच्या कामाचे कौतुक केले होते.

स्वातंत्र्यलढ्यात संघाच्या सक्रिय आंदोलनातील सहभागाला नाकारणारे हे विसरतात की, संघटनेच्या रुपात अप्रत्यक्षपणे संघाने या लढ्यात मोठे काम केले आहे. संघाच्या वैचारिक विरोधकांनी नेहमी संघावर टीका केली, त्याचप्रमाणे लिखाण केले आणि स्वातंत्र्याचे श्रेय एकट्या काँग्रेसकडे देण्याचा नेहमी प्रयत्न करण्यात आला, असे संघाच्या जाणकारांचे मत आहे.