जवानांच्या शौर्याचं कौतुक, संरक्षणमंत्र्यांनी केली शस्त्रपूजा

By महेश गलांडे | Published: October 25, 2020 12:01 PM2020-10-25T12:01:48+5:302020-10-25T13:06:39+5:30

विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमधील सुकना युद्ध स्मारक येथे शस्त्रपूजा केली.

भारत आणि चीन सीमारेषेवरील तणावावर त्यांनी भाष्य केलं, लडाख सीमारेषेवर शांतता असावी आणि तणाव संपुष्टात यावा, अशी इच्छा राजनाथसिंह यांनी व्यक्त केली.

भारत देशाचं सैन्य आपल्या जमिनीच्या एक इंचही भूभागावर कोणाला कब्जा करु देणार नाही, याची खात्रीही त्यांनी देशवासीयांना दिली.

राजनाथसिंह हे पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून तेथील युद्ध स्मारक व सैन्य दलाच्या भेटी घेत आहेत.

सुकना युद्ध स्मारक येथे जाऊन राजनाथसिंह यांनी शहीदांना आदरांजली अर्पण केली, तसेच सैनिकांचे बलिदान कधीही विसरता येणार नसल्याचे म्हटले.

विजयादशमीच्या मुहूर्तावर तेथील शस्त्रांचं पूजन करुन भारतीय सैन्याला प्रोत्साहन देण्याचं कामही सिंह यांनी केलंय. भारत-चीन सीमारेषेवरील तणाव संपुष्टात येण्याची इच्छा सिंह यांनी बोलून दाखवली.

दार्जिलिंग दौऱ्यात सिंह यांनी सीमा कडक संघटना (बीआरओ) द्वारे उभारण्यात आलेल्या गंगटोक-नाथुला रोडचे उद्घाटन केले, सिक्कीममध्ये 65 किमीच्या रस्ते निर्मित्तीचं काम प्रगतीपथावर असल्याचंही सिंह यांनी म्हटलं.

सिंह यांनी शस्त्रपूजा केलेल्या स्थानावरुन नियंत्रण रेषा केवळ 2 किमी अंतरावर आहे, यावेळी लष्करप्रमुख जनरल मुकूंद नरवणे हेही उपस्थित होते

संरक्षणमंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे.

देशाच्या जवानांनी सातत्याने देशाची सीमा, अखंडता आणि सार्वभौमिकतेसाठी आपलं बलिदान दिलंय, असे म्हणत शहीदांना आदरांजली वाहत सॅल्यूट केला.