PM Narendra Modi : मोदींनी पुन्हा एकदा चालवलं 'ब्रह्मास्त्र', काँग्रेसनंतर आता AAP चाही 'गेम' होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 06:39 PM2022-10-12T18:39:19+5:302022-10-12T18:46:51+5:30

यापूर्वी मोदींनी आपल्या विरोधातील काँग्रेस नेत्यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांचा शस्त्रांप्रमाणे वापर केला आहे.

गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. याच महिन्याच्या अखेरपर्यंत तेथील निवडणुकीच्या तारखाही जाहीर होतील. मात्र, यापूर्वीच येथील निवडणूक प्रचाराला वेग आला आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस चौक सभा आणि घरोघरी जावून प्रचार करण्यावर भर देताना दिसत आहेत. तर भाजप आणि राज्यात पहिल्यांदाच सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढविणाऱ्या आम आदमी पक्षाच्या बड्या नेत्यांनी सभा घेत आणि रोड शो करत येथे निवडणुकीचे वातावरण तयार केले आहे.

यातच, पीएम मोदी यांनी तीन दिवसांच्या आपल्या गुजरात दौऱ्यात जबरदस्त जनसभा घेत भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, या जाहीर सभांच्या माध्यमाने त्यांनी पक्षाच्या प्रचाराची दिशा ठरवण्या बरोबरच, ज्या शस्त्रांच्या माध्यमाने त्यांनी अनेकवेळा आपल्या विरोधकांना धूळ चारली आहे, त्या त्या शस्त्रांचा वापर करायलाही सुरूवात केली आहे.

स्वतःला निवडणुकीच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न - पीएम नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभांच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वतःला गुजरात निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणले आहे. यावेळी त्यांनी जनतेला पुन्हा एकदा काँग्रेसच्या शासन काळाची आठवण करून दिली. तसेच, गुजरातमध्ये ते मुख्यमंत्री झाल्यानंतर कशा प्रकारे बदल झाला, हेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारची कामे आणि अचिव्हमेन्ट संदर्भातही माहिती दिली.

राजकीय विश्लेषकांच्या मते, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षांना आपल्या पिचवर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदी अजूनही गुजरातमधील सर्वाधिक लोकप्रीय नेते आहेत. एवढेच नाही, तर अनेक लोक त्यांना 'गुजराती अभिमान' म्हणून पाहतात. तज्ज्ञांच्या मते, यामुळेच दिल्लीत पंतप्रधान मोदींना उघडपणे आव्हान देणारे अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये त्यांचे नाव घेणे टाळत आहेत आणि राज्यातील भूपेंद्र सरकारलाच निशाण्यावर ठेवत आहेत.

करून दिली 'अपमाना'ची आठवण - आम आदमी पक्षाचे गुजरातमधील प्रमुख गोपाल इटालिया यांच्या 'नीच व्यक्ती' वाल्या व्हिडिओने पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा एक अशी खेळी खेळण्याची संधी मिळाली आहे. जिच्या सहाय्याने त्यांनी काँग्रेसला अनेक वेळा चित केले आहे.

यापूर्वी मोदींनी आपल्या विरोधातील काँग्रेस नेत्यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांचा शस्त्रांप्रमाणे वापर केला आहे. यावेळी राजकोट येथील सभेत त्यांनी पुन्हा एकदा, आपल्याला कशा प्रकारे 'मौत का सौदागर' म्हटले होते, याची आठवण करून दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर शिव्या देण्याचा आरोप करत अप्रत्यक्षपणे 'आप'वर निशाणा साधला आणि त्यांनी शिव्या देण्याचा ठेका आता दुसऱ्याला दिला असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या शांत प्रचारापासून आपल्या कार्यकर्त्यांना सावध करत, काँग्रेस आता शांत झाली आहे. त्यांना शिव्या देत नाही. नव्या रणनीती अंतर्गत त्यांनी आता हे काम दुसऱ्याला दिल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसला अनेकदा झाले आहे नुकसान - 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पीएम मोदींना 'नीच किस्म का आदमी' असे म्हटले होते. यानंतर मोदींनी याला आपल्या जातीशी जोडत काँग्रेसला बॅकफुटवर ढकलले होते. 2019 मध्येही त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याला कोण-कोणत्या शिव्या दिल्या याची आठवण करून दिली होती.

राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है' असे वक्तव्य केले होते. मात्र, त्यांच्या या वक्तव्यालाही मोदींनी आपली मोहीम बनवले. यावेळी काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याने वादग्रस्त वक्तव्य तर केलेले नाही, पण 'आप' नेत्याचा जूना व्हिडिओ बरोबर निवडणुकीपूर्वी व्हायरल करून भाजपने पुन्हा एकदा जूनीच खेळी खेळली आहे.