वांद्रे-वरळी सी-लिंक नाही तर हा आहे भारतातील सर्वात लांब ब्रिज, अशी आहेत खास वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 10:14 AM2023-07-25T10:14:47+5:302023-07-25T10:20:17+5:30

India Longest Bridge: भारतातील सर्वाच लांब पुल कुठला, असा प्रश्न विचारल्यास तुमच्यापैकी बरेचजण मुंबईतीव वांद्रे-वरळी सी लिंकचं नाव घेतील. मात्र हे उत्तर चुकीचं आहे. कारण देशात यापेक्षाही मोठा आसा एक पुल आहे. हा पुल ईशान्य भारतात आहे. या ब्रिजचं नाव आहे ढोला-सादिया किंवा भूपेन हजारिका सेतू.

भारतातील सर्वाच लांब पुल कुठला, असा प्रश्न विचारल्यास तुमच्यापैकी बरेचजण मुंबईतीव वांद्रे-वरळी सी लिंकचं नाव घेतील. मात्र हे उत्तर चुकीचं आहे. कारण देशात यापेक्षाही मोठा आसा एक पुल आहे. हा पुल ईशान्य भारतात आहे. या ब्रिजचं नाव आहे ढोला-सादिया किंवा भूपेन हजारिका सेतू.

लोहित नदीवर बांधलेला हा पूल भारतातील सर्वात मोठा ब्रिज आहे. तो आसाम आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांना जोडतो. भूपेन हजारिका सेतूची लांबी ९.१५ किमी एवढी आहे. तो मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकुपेक्षा ३० टक्के अधिक लांब आहे. एवढंच नाही तर त्याचा जगातील सर्वात लांब पुलांमध्येही समावेश होतो. जगातील सर्वात लांब ब्रिजचा मान चीनमधील दनयांग-कुनशन ग्रँड ब्रिजकडे आहे.

आसाममधील तिनसुकीया जिल्ह्यात असलेल्या ढोला आणि सादिया या दोन गावांना एकमेकांशी जोडत असल्याने या ब्रिजचं ढोला-सादिया असं नावही पडलं आहे. सादिया गावापासून अरुणाचल प्रदेशची सीमा काही अंतरावरच आहे. २०१७ मध्ये या ब्रिजचं उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं नामकरण भूपेन हजारिका सेतू असं ठेवण्याची घोषणा केली.

९.१५ किमी लांब असलेला हा ब्रिज एकूण १८२ खांबांवर उभा आहे. त्याच्या कामास २०११ मध्ये सुरुवात झाली होती. तसेच २०१७ मध्ये तो बांधून पूर्ण झाला.

भारतातील सर्वात लांब अशा या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे तो भूकंपाचे तीव्र धक्केही सहजपणे सहन करू शकतो. तसेच हा ब्रिज एवढा मजबूत आहे की ६० टन वजनाचे रणगाडेही त्यावरून सहजपणे जाऊ शकतात.

भूपेन हजारिका सेतू आसामची राजधानी दिसपूर येथून ५४४ किमी तर अरुणाचल प्रदेशमधील इटानगर येथून ३०० किमी दूर अंतरावर आहे. तर चीनच्या सीमेपासून याचं अंतर केवळ १०० किमी एवढं आहे. लोहित नदीवरील या ब्रिजमुळे आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधील अंतर हे १६५ किमीने कमी झालं आहे.