कोरोनासंदर्भात सरकारची 'निती' फेल, राहुल गांधीकडून फोटो शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 08:31 PM2020-05-15T20:31:26+5:302020-05-15T20:41:26+5:30

कोरोना संदर्भात निती आयोगाने केलेला दावा फोल ठरल्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे कोरोनाविषयी गंभीरतेने प्रश्न विचारत असून मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

देशातील स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नवरुनही राहुल गांधींनी मोदी सरकाला घेरलं आहे. स्थलांतरीतांसाठी सरकारकडून पॅकेज जाहीर व्हावे, अशी मागणीही राहुल गांधींनी केली होती.

निती आयोगाकडून कोरोना संदर्भात दावा करण्यात आला होता. त्यानुसार, १६ मे नंतर देशात एकही कोरोनाग्रस्त सापडणार नसल्याचे आयोगाने म्हटले होते. यावरुन राहुल गांधींनी निशाणा साधला.

निती आयोगातील बुद्धीजीवी लोकांनी पुन्हा करुन दाखवले, मी तुम्हाला या ग्राफची आठवण करुन दाखवू इच्छितो. केंद्र सरकारच्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे १६ मे नंतर देशात कोरोनाचा एकही रुग्ण आढळणार नाही, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे.

राहुल गांधींनी शेअर केलेला ग्राफ हा निती आयोगाकडून २३ एप्रिल रोजी प्रकाशित करण्यात आला होता. आयोगाच्या ग्राफनुसार ४ मेपासून देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसेल, असे म्हटले आहे.

४ मे पासून रुग्णांची घटणारी संख्या लक्षात घेता, १६ मेनंतर देशात एकही कोरोनाच रुग्ण नसेल, असे आयोगाने म्हटले आहे.

निती आयोगाचे सदस्य आणि कोरोनासंदर्भात बनविण्यात आलेल्या एका समितीचे प्रमुख वीक पॉल यांनी २४ एप्रिल रोजी एक अभ्यासपूर्ण प्रेझेंटेशन दिले होते.

त्यानुसार, सध्या १० दिवसांनंतर कोरोना रुग्णांची संख्या डबल होताना दिसत आहे. त्यामळे १६ मे नंतर देशात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नसेल, असे सांगण्यात आले होते.

राहुल गांधींनी निती आयोगाच्या या अहवालाचा संदर्भ देत, निती आयोग व सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून येते.