संकटं संपता संपेना! कोरोनाचा वेग मंदावला पण Black Fungus चा धोका वाढला; तब्बल 40,845 रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 05:28 PM2021-06-30T17:28:21+5:302021-06-30T17:47:00+5:30

Black Fungus Cases India Reached 40000 Mark : देशात ब्लॅक फंगसचे तब्बल 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे योग्य वेळी जर यावर उपचार झाले नाहीत तर रुग्णांना आपले डोळे गमवावे लागत आहेत.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 18 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्य़ासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,03,62,848 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 45,951 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 817 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,98,454 लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाचा वेग थोडा मंदावताना दिसत आहे. मात्र असं असताना Black Fungus चा धोका वाढला आहे.

देशात ब्लॅक फंगसचे तब्बल 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे योग्य वेळी जर यावर उपचार झाले नाहीत तर रुग्णांना आपले डोळे गमवावे लागत आहेत.

"म्युकोरमायकोसिस" असं या आजाराचं नाव असून कोरोना रुग्णांमध्ये हे प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. ब्लॅक फंगसने (Black Fungus) थैमान घातले आहे. देशामध्ये म्युकोरमायकोसिसचे (Mucormycosis) रुग्ण सातत्याने वाढत आहेत

'ब्लॅक फंगस' म्हणजेच "म्युकोरमायकोसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत.

काही राज्यांनी तर वाढत्या रुग्णसंख्येमुळे ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसमुळे आधीच कोरोनाच्या भीतीखाली वावरत असलेल्या लोकांची चिंता अधिकच वाढली आहे. हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहेत.

कोरोनामुळे लोकांना आरोग्यविषयक विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच धडकी भरवणारी माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे. देशातील ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या ही 40,845 वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक फंगसमुळे आतापर्यंत 3129 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ब्लॅक फंगसच्या रुग्णांपैकी 34940 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

52.69 टक्के लोकांना स्टेरॉईडमुळे हे इन्फेक्शन झालं आहे. 18 ते 45 वर्षे वयोगटातील 32 टक्के रुग्णांना, 45 ते 60 वर्षांवरील 17464 तर 60 वर्षांवरील 24 टक्के रुग्णांना ब्लॅक फंगसची लागण झाली आहे.

देशातील अनेक राज्यात ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंतेत भर पडली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशात ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बंगळुरूमध्ये एकाच रुग्णामध्ये ब्लॅक आणि ग्रीन फंगस आढळून आल्याची घटना समोर आली आहे. रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत.

डॉक्टर प्रशांत रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर कार्तिकेयन आर. यांना एप्रिलमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाली होती. चेहरा जड वाटणं, डोकं दुखणं अशा प्रकारचा त्रास जाणवू लागला. त्यांनी तातडीने बंगळुरूमधल्या बीजीएस ग्लेनीग्लस ग्लोबल हॉस्पिटलमध्ये यांच्याकडे उपचारांसाठी विचारणा केली. त्यांना तपासल्यानंतर डॉ. रेड्डी यांना हा प्रकार समजला.

कार्तिकेयन यांची तपासणी केल्यानंतर डॉ. रेड्डी यांना ब्लॅक फंगसची लक्षणं जाणवली. ब्लॅक फंगस असेल या अंदाजाने त्यांनी तपासण्या सुरू केल्या. कार्तिकेयन यांच्यामध्ये फंगसचं संक्रमण दिसून आलं. पण हे वेगळंच प्रकरण असल्याचं ड़ॉक्टरांना जाणवलं.

रेड्डी यांच्यामते सामान्यपणे म्युकोरमायकोसिसमध्ये काळ्या रंगाचे क्रस्ट फॉरमेशन दिसून येतात. पण कार्तिकेयन यांच्या सायनसमध्ये वेगळ्या प्रकारचे घटक दिसत होते. त्याचे नमुने त्यांनी तातडीने लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले.

लॅबमध्ये नमुने तपासल्यानंतर कार्तिकेयन यांच्यामध्ये ब्लॅक आणि ग्रीन फंगस असे दोन्ही घटक दिसून आले. यानंतर सध्या रुग्णावर उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती मिळत आहे.