Maharashtra Political Crisis: मातोश्रीवऐवजी शिवतीर्थाचं महत्त्व वाढतंय? राज ठाकरे बाळासाहेबांची जागा घेणार? चर्चांना उधाण!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 10:56 AM2022-07-17T10:56:04+5:302022-07-17T11:01:40+5:30

Maharashtra Political Crisis: गेल्या चाळीस वर्षांपासून मातोश्री हे राज्यातील राजकारणातील महत्वाचे स्थान बनलेले. मात्र, आता चित्र काहीसे बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जाते.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सक्रीय झाले आहेत.

छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या निर्णयांवरही या काळात चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावेही मोठ्या प्रमाणावर झाले. असे असले तरी आता राजकीय वर्तुळात मातोश्रीवऐवजी (Matoshree) शिवतीर्थाचे (Shiv Tirtha) महत्त्व वाढतेय का, याबाबत चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

यासाठी अलीकडील काळात घडलेल्या घटना महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. एक म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थावर जाऊन घेतलेली भेट आणि दुसरे म्हणजे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी मातोश्रीची टाळलेली भेट.

बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख असताना मातोश्रीचा एक वेगळा दरारा होता. मुंबईत दौऱ्यावर येणारी कोणतीही बडी असामी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला जायची. अगदी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार देखील. युपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांनी मातोश्रीवर जाऊन पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले होते.

गेल्या चाळीस वर्षांपासून मातोश्री हे राज्यातील राजकारणातील महत्वाचे स्थान बनले. आता चित्र बदलताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे मुर्मू ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर जातील, अशी अपेक्षा होती. मात्र मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणे टाळले.

यानिमित्ताने भाजपने उद्धव ठाकरेंचं राजकीय महत्त्व कमी झाल्याचे दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे आता अनेक भाजप नेते थेट शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेत आहेत.

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर रावसाहेब दानवे या आणखी एका केंद्रीय मंत्र्याने प्रत्यक्ष शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. याशिवाय प्रसाद लाड, चंद्रशेखर बावनकुळे, कृपाशंकर सिंह, प्रसाद लाड यांनीही शिवतीर्थावर हजेरी लावली.

सलग दुसऱ्यांदा भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. नवीन सत्ता स्थापनेनंतर ही भेट महत्वाची मानली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली.

मंत्रिमंडळ विस्ताराची उत्कंठा असताना झालेल्या या प्रदीर्घ चर्चेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागले आहे ते मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष लागलं आहे. यापूर्वीच फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने मसनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना भाजप कोट्यातून मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराला आपले मत दिले होते. त्यामुळे भाजप-मनसे एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले होते.

दुसरीकडे, त्यात नुकतेच राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना कॅबिनेटमध्ये घेणार असल्याची बातमी समोर आली. मात्र राज यांनी या वृत्ताचं खंडन केले. मात्र राज-फडणवीस यांच्या भेटीने नक्कीच राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

त्यामुळे आता भविष्यात भाजप-मनसे युती होणार का, राज ठाकरे यांचा करिष्मा पुन्हा चालणार का, शिवसेनेला हे आव्हान कितपत जड जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याचे म्हटले जात आहे.