बाळासाहेबांच्या शिवसेनेने 'पिंपळाचं झाड' निवडणूक चिन्ह म्हणून का मागितलं?, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 04:18 PM2022-10-11T16:18:13+5:302022-10-11T16:28:27+5:30

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आणि १२ खासदार हे शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडील संख्याबळ घटले. ठाकरेंकडे केवळ १५ आमदार आणि ८ खासदार उरले. त्यात खरी शिवसेना आम्हीच असा दावा एकनाथ शिंदेंकडून करण्यात आला.

एकनाथ शिंदे यांच्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दावा करण्यात आल्यानंतर आयोगाने दोन्ही गटाचं म्हणणं ऐकून घेत तात्पुरत्या स्वरुपात या प्रकरणावर निर्णय दिला. शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास आयोगाने बंदी घातली. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाला नवं नाव आणि चिन्ह देण्यात आले.

निवडणूक आयोगाने पसंतीची ३ नाव, चिन्हाचा पर्याय दोन्ही गटाकडून मागवला. त्यात उद्धव ठाकरेंकडून आलेल्या पर्यायापैकी शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आले. त्याचसोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल चिन्ह बहाल करण्यात आले.

दुसरीकडे अद्यापही एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना यांना चिन्ह देण्यात आलं नाही. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे तलवार, सूर्य आणि पिंपळाचं झाड हे चिन्ह मागितले आहे. या ३ चिन्हांपैकी १ चिन्ह शिंदे गटाला देण्यात येईल. परंतु पिंपळाचं झाड हे चिन्ह का निवडण्यात आले असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडताना एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी वारंवार बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांना उद्धव ठाकरेंकडून तिलांजली देण्यात येत होती असा आरोप करून हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी बाहेर पडल्याचं कारण देण्यात येत होते. बाळासाहेब आणि हिंदुत्व हे प्रखरतेने शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे.

त्यात पिंपळाच्या झाडाला हिंदु धर्मात पौराणिक महत्त्व आहे. पिंपळाच्या झाड्याला दैवी वृक्ष म्हटलं जातं. या वृक्षात ३३ कोटी देवांचा वास असतो असं सांगितले जाते. भगवत गीतेत स्वत: श्री कृष्णाने म्हटलं आहे वृक्षांमध्ये जो पिंपळ आहे तो मी आहे. याच कारणामुळे पिंपळाचे झाड पूजनीय मानले जाते. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून त्याचे पूजन केले जाते.

भगवान विष्णूचा जन्म या खाडाखाली झाला असं पुराणात लिहिलं आहे. पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णू, पानांमध्ये हरी, फळांमध्ये सर्व देवतांचा वास आहे असं सांगितले जाते. पिंपळाची पूजा केल्यानं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आहे.

अलीकडच्या कोरोना महामारीत पिंपळ हा वृक्ष ऑक्सिजन न संपणारा सिलेंडर असल्याचं बोलले गेले. पिंपळ हा वृक्ष २४ तास ऑक्सिजन देतो. या वृक्षामुळे आजूबाजूची हवा स्वच्छ होते. भारतीय संस्कृतीत पिंपळाचं अनेक धार्मिक, अध्यात्मिक महत्त्व आहे त्यामुळे शिंदे गटाकडून हे चिन्ह मागण्यात आल्याचीही शक्यता आहे.

मात्र हेच झाड घरात किंवा अंगणात लावू नये असं म्हटलं जातं. मग हे झाड का लावले जात नाही. त्यामागे वैज्ञानिक कारण आहे. पिंपळाचे आयुष्य खूप असते. त्याची मुळे खोलवर पसरतात त्यामुळे ती घरात किंवा भिंतीत शिरू नये यासाठी हे झाड घराशेजारी लावू नये असं वैज्ञानिक कारण सांगितले जाते.