राज ठाकरेंनी उल्लेख केलेली 'ती' जागा मजार नाही तर 'चिल्ला'; काय आहे इतिहास?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 04:06 PM2023-03-23T16:06:43+5:302023-03-23T16:10:51+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्यातील भाषणानंतर राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. राज यांनी भाषणात माहिम येथील समुद्रात होत असलेल्या अनधिकृत बांधकामाचा मुद्दा प्रखरतेने मांडला. याबाबत ड्रोनचे फुटेज त्यांनी जाहीर सभेत दाखवले.

राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्र सरकार, पोलीस प्रशासन आणि मुंबई महापालिकेला १ महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. जर हे अनधिकृत बांधकाम पाडले नाही तर त्याचशेजारी सर्वात मोठे गणपती मंदिर बांधू असा इशारा राज यांनी दिला होता.

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर तातडीने सरकारने पावले उचलली. अवघ्या १४ तासांत प्रशासकीय अधिकारी माहिमच्या त्या वादग्रस्त जागेवर पोहचले. त्याठिकाणी मोजमापणी करून तेथील अवैध बांधकाम जेसीबी आणि हातोड्याच्या मदतीने जमीनदोस्त करण्यात आले.

राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या त्या जागेचा इतिहास काय? असा प्रश्न काहींना पडला आहे. त्याबाबत माहिम आणि हाजीअली दर्गाचे ट्रस्टी सोहेल खंडवानी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मूळात ही मजार नाही तर चिल्ला आहे असं खंडवानी यांनी सांगितले आहे.

सोहेल खंडवानी म्हणतात की, मखदूम बाबाची मजार ही ६०० वर्ष जुनी आहे. जी जागा सांगितली जाते ती मजार नव्हे तर चिल्ला आहे. त्याठिकाणी मखदूम बाबा धार्मिक शिक्षण द्यायचे. त्या जागेवरून ते अनुयायांना शिकवायचे असं त्यांनी म्हटलं.

तसेच आणखी एक चिल्ला आहे जो माहिम पोलीस स्टेशनमध्ये आहे. जो पब्लिकसाठी खुला नाही. लोक मजारवर प्रार्थना करून चिल्ल्याच्या ठिकाणी जात दर्शन घेत होते. ती जागा मजार नाही हे लक्षात घ्या. राज ठाकरेंनी जे सांगितले ते अनधिकृत बांधकामाबद्दल म्हटलंय. त्यांनी मखदूम बाबा मजारावर काही बोलले नाहीत असं सोहेल खंडवानी यांनी म्हटलं.

त्याचसोबत अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली त्याचे आम्ही स्वागत करतो. आज प्रशासनाने जे चिल्ल्याचे स्क्ट्रचर होते त्याला धक्का पोहचवला नाही. ती जागा भरतीवेळी पाण्यात जाते ओहोटी येते तेव्हा चिल्ला दिसतो. भाविकांनी तिथे चादर, फूल श्रद्धेपोटी चढवले आहेत असं सोहेल खंडवानी म्हणाले.

दरम्यान, जेव्हा समुद्रात ओहोटी असते तेव्हा त्याठिकाणी लोक जातात तेव्हा काहींनी दगडे एकत्रित केली. आधी २० लोक जायचे आता २०० जातात. भाविकांची संख्या वाढते. आज जी कारवाई तातडीने केली तशी इतरत्रही केली तर मुंबई खूप स्वच्छ होईल असंही सोहेल खंडवानी यांनी सांगितले.

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर रातोरात प्रशासकीय चक्रे वेगाने फिरली आणि मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या अख्यारित ही जागा येत असल्याने गुरुवारी सकाळी पथक पाठवून सरकारने तातडीने अनधिकृत बांधकाम पाडले. त्याठिकाणचा मलबा हटवण्यात आला.

तोडकाम पूर्ण झाल्यानंतर मनसे नेत्यांनी प्रशासनाचे कौतुक केले. त्याचसोबत इतर ठिकाणीही अशी बांधकामे होत असतील तर त्याठिकाणी कारवाई व्हावी. तसेच त्या जागेवर पुन्हा असे बांधकाम होणार नाही याची दक्षता प्रशासनासोबत स्थानिकांनीही घ्यावी असं मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी म्हटलं आहे.