एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी टोकाचा निर्णय घेण्यामागे नेमकं काय घडामोडी घडल्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 12:08 PM2023-02-22T12:08:56+5:302023-02-22T12:25:25+5:30

उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड करत एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांना पक्षाच्या ५५ पैकी ४० आमदारांनी तर लोकसभेच्या १३ खासदारांनी पाठिंबा दिला. अनेक पदाधिकारी शिंदे यांच्यासोबत गेले.

एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे यांच्या संघर्षाच्या या लढाईत खरी शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांनी बाजू मांडली. त्यातही शिंदे यांचा विजय झाला. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं.

बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या शिवसेनेचे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांना मिळाले. मात्र शिवसेनेत ऐतिहासिक फूट कुणामुळे घडली? शिंदेंसह समर्थक आमदारांमध्ये ही भावना का निर्माण झाली? इतका टोकाचा निर्णय का घेतला गेला? याबाबत शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी खुलासा केला आहे.

भरत गोगावले म्हणााले की, आम्ही शिवसेनेला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. शिवसेना बुडवण्याचा काहींचा प्रयत्न होता. बाळासाहेबांनी निर्माण केलेले वैभव पुढे चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही शिवसेनेचे विचार घेऊन पुढे चाललोय. उद्धव ठाकरे यांचे विचार, तत्व, आचार वेगळ्या मार्गाने जायला लागले म्हणून आम्ही हा निर्णय घेतला.

तसेच रेडे, घोडे, गाढव सगळेच बोलले, आमचे काहीच ठेवले नाही. उद्धव ठाकरेंसारख्या नेतृत्वाने विचार करणे गरजेचे होते. बाळासाहेबांनी जे बोलले ते कधीच मागे फिरले नाहीत. संघटनावाढीसाठी आम्ही शेकडो केसेस अंगावर घेतल्या परंतु लढवय्या नेत्याचा मुलगा म्हणून तुमच्या अंगावर किती केसेस घेतल्या? यांचे कर्तृत्व काय? असा सवाल भरत गोगावलेंनी केला.

आम्ही वारंवार उद्धव ठाकरेंकडे आमदारांच्या अडचणी, कार्यकर्त्यांच्या समस्या घेऊन जायचो. मात्र त्यांचे विचार वेगळे होते. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीबद्दल काय सांगायला गेलो तर ते ऐकायचे पण निर्णयापर्यंत यायचे नाही. स्थानिक पातळीवर आमचे काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांसोबत वाद विवाद व्हायचे त्यात उद्धव ठाकरेंनी रस घेतला नाही असा आरोप गोगावलेंनी केला.

या घडामोडीतून यांना आमची काही पडलेली नाही अशा आमच्या भावना तयार झाल्या. केवळ खुर्ची, काँग्रेस-राष्ट्रवादी, मी आणि माझे कुटुंब एवढ्यापुरतेच ते मर्यादित होते. त्यानंतर घरातल्यांचे, नातेवाईकांचे हस्तक्षेप कामात व्हायला लागले असं गोगावलेंनी म्हटलं.

उद्धव ठाकरेंचे मेव्हणे, भाचे हस्तक्षेप करत होते. रश्मी वहिनी कळत-नकळत हस्तक्षेप करायच्या. त्याच्यामुळे याची जाणीव आमदारांना होऊ लागली. कणखर नेत्यांच्या संघटनेत अशाप्रकारे वागणूक होऊ लागली त्यामुळे आमदारांमध्ये नाराजी पसरू लागली असं भरत गोगावलेंनी सांगितले.

त्याचसोबत बाळासाहेब ठाकरे असताना कधीही माँसाहेबांनी हस्तक्षेप केला नाही. उलट माँसाहेबांनी प्रेम दिले. माँसाहेब आणि बाळासाहेबांबद्दल स्वत:च्या आई वडिलांइतकी भावना तयार झाली आणि यांच्याबद्दल जे द्वेष निर्माण होत गेले. ४० आमदार, १३ खासदार, शेकडो नगरसेवक सत्ता असताना सोडून गेले त्याचे आत्मपरिक्षण करायला हवे असा सल्लाही गोगावलेंनी उद्धव ठाकरेंना दिला.

आपल्यानंतर कोणतरी वारसदार असावा असं प्रत्येक वडिलांना वाटते. पण वारसदार पुढे वारसा नीट चालवतील का याबाबत त्यावेळी बाळासाहेबांना कल्पना नव्हती. पण त्यानंतर हळूहळू बाळासाहेबांना ही गोष्ट कळू लागली असा खुलासाही भरत गोगावलेंनी केला.