राष्ट्रवादीत पार्थ पवारांची काहीही भूमिका नाही, पटेलांनी सांगितलं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 04:13 PM2020-08-22T16:13:36+5:302020-08-22T16:24:35+5:30

पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसांत राम मंदिर आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विसंगत जाहीर भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे पवार कुटुंबात नवीन वाद उद्भवला आहे.

पार्थ पवार यांनी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या मागणीवर पार्थ पवार यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आज याप्रकरणी सुनावली केली. त्यानुसार, या घटनेचा तपास सीबीआयने करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत.

मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनाही न्यायालयानं केल्या. न्यायालयाच्या सर्वोच्च निकालानंतर पार्थ पवार यांनी आनंद व्यक्त करत शेवटी सत्याचाच विजय झाल्याचे म्हटलंय.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी पार्थ पवार यांनी सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.

विशेष म्हणजे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच याप्रकरणी सीबीआय चौकशीची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही याप्रकरणी मत मांडलं होतं. त्यावेळी, पार्थ यांना इनमॅच्यूअर असल्याचेही त्यांनी म्हटले होते. याबाबत अनेक राजकीय नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

पवार कुटुंबाकडे नेहमीच एक आदर्श कुटुंब म्हणून पहिले जाते. त्यामुळे या हा निर्माण झालेला वाद तात्पुरत्या स्वरूपाचा असून त्यावर घरात बसूनच मिटवला जाऊ शकतो, या शब्दात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पार्थ पवार आणि पवार कुटुंब यांच्यात निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले.

पार्थ पवार हे माझे चांगले मित्र असून त्यांच्याशी त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर सविस्तर बोललो आहे असेही टोपेंनी यावेळी सांगितले. तर, खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट केलीय.

पार्थ जरी अजित पवार यांचा मुलगा असला तरी राष्ट्रवादीत पार्थची काहीही भूमिका नाही. विनाकारण त्यांना एवढे महत्त्व देऊन, त्याच्या ट्वीटला महत्त्व देणे मला आवश्यक वाटत नाही, असे म्हणत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टीकरण दिलंय.

तरुण मुले ट्वीटरवर व फेसबुकवर काहीही बोलतात, आमच्यादृष्टीने पार्थ प्रकरणावर आता पडदा पडला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी नेहरू सेंटरवर झालेल्या बैठकीत खातेवाटपावरून झालेली तणातणी पाहून अजित पवार नाराज होते. अशी रस्सीखेच असेल तर हे सरकार टिकणार कसे? अशी शंका त्यांना होती, त्यामुळेच ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी केला.

अजितदादांनी भाजपसोबत जायला नको होते, असेही ते म्हणाले. हे सरकार स्थापन करतेवेळी ‘जे घडले’ व त्यानंतर आमचा जो काही संवाद झाला, त्यांनी जी भावना व्यक्त केली ते सगळं आत्ता उघड करता येणार नाही. पण ती त्यांची ती एक भूमिका होती.

पण पुढे सगळे प्रश्न सुटले आणि आता तर आमचे सरकार व्यवस्थीत चालू आहे, असेही खा. पटेल म्हणाले.