अजित पवार वेगळे होऊन ४३ दिवस नाही झाले, तोवर शरद पवार ४ वेळा भेटले; काय चाललेय काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 10:07 AM2023-08-14T10:07:08+5:302023-08-14T10:13:21+5:30

आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले... ते शरद पवार रिटायर का होत नाहीत... भाजपासोबत कितीवेळा बोलणी झालेली... अजित पवारांनी सगळेच काढलेले...

महाराष्ट्रात विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण हेच मतदारांना कळेनासे झाले आहे. अशी विचित्र राजकीय परिस्थिती राज्याने पहिल्यांदाच अनुभवली आहे. गेल्या वर्षभरात दोन राजकीय पक्ष फुटून त्याच नावाने सत्तेतही आहेत आणि विरोधातही. त्याहून पुढची गंमत म्हणजे अजित पवार आणि शरद पवारांच्या या ना त्या कारणाने सुरु असलेल्या गाठीभेटी आहेत. यामुळे लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे.

अजित पवारांना वेगळे होऊन आता ४३ दिवस लोटले आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला वेगळे होऊन १३-१४ महिने झाले आहेत. तरी उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये विस्तवही जात नाहीय, एवढे वितुष्ट आहे. परंतू, राष्ट्रवादीचे काही औरच दिसत आहे. गेल्या ४३ दिवसांत अजित पवार आणि शरद पवार यांच्या चार भेटी झाल्या आहेत.

नुकतीच १२ ऑगस्टला एका उद्यागोपतीकडे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सिक्रेट बैठक झाल्याने शरद पवारांचे नेमके चाललेय काय? अशा चर्चांना उत आला आहे. अजित माझा पुतण्या आहे. पवार कुटुंब जर बघितले तर मी आता कुटुंबात वडीलधारी आहे. त्यामुळे वडीलकीच्या नात्याने मी त्यांना भेटलो, असे पवारांनीच म्हटले आहे.

शनिवारी उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठक झाली. काही हितचिंतक त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यांचा पक्ष भाजपसोबत जाणार नाही, असे म्हणत पवारांनी या बैठकीवरील शंकांवर पुन्हा बळ दिले.

शरद पवार आणि अजित पवार यांची भेट होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय. अजित पवारांनी शरद पवारांवर निवृत्ती न घेण्य़ाचे, बदनाम करण्याचे अनेक गंभीर आरोप केले होते. यामुळे या दोघांमधील दरी कधीच न मिटणारी होतेय की काय असे वाटू लागले होते. जुलैच्या मध्यात (15 ते 18 जुलै दरम्यान) दोघांमध्ये तीन बैठका झाल्या आणि यामागे काहीतरी वेगळेच गौडबंगाल असल्याची शंका लोकांना यायला लागली.

सलग तीन दिवस झालेल्या तीन बैठकांबाबत शरद पवार गटाशी संबंधित काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेण्यास सुरुवात झाली. शरद पवार यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशा मागण्या झाल्या. हे प्रकरण एवढ्यावरच न थांबता पुण्य़ात मोदींच्या खासगी सत्कार कार्यक्रमाला शरद पवारांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार यांच्यात भेट झाली नसली तरी यामुळे विरोधकांत आणि राज्याच्या जनतेत मात्र संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे.

त्या दिवशीही शनिवार होता. अजित पवार हे त्यांच्या काकू प्रतिभा पवार (शरद पवार यांच्या पत्नी) यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सिल्व्हर ओक येथे गेले होते. राजकारण वेगळे आणि कुटुंब वेगळे, असे अजित पवार या भेटीनंतर म्हणाले होते.

यानंतर अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांनी रविवारी शरद पवार यांची वायबी चव्हाण सेंटरमध्ये भेट घेऊन त्यांची माफी मागितली, त्यानंतर पाठिंबा आणि आशीर्वादही मागितले. मात्र, शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांना कोणतेही उत्तर दिले नाही. यामुळे तिसऱ्या दिवशी अजित पवार आमदारांसह पुन्हा शरद पवारांच्या भेटीला गेले होते.

वारंवार होणार्‍या बैठकांच्या या मालिकेमुळे विरोधी पक्षांच्या आघाडीच्या मूळ भावनेलाच धक्का बसत आहे, त्यासोबतच राष्ट्रवादीच्या प्रमुखांच्या मनात नेमके काय चालले आहे, असा प्रश्नही वारंवार उपस्थित होत आहे.