शिवसेना भवनाची जागा नेमकी कुणाची?; वाचा बाळासाहेबांनी उभारलेल्या वास्तूचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 12:22 PM2022-07-19T12:22:19+5:302022-07-19T12:26:17+5:30

शिवसेनेच्या इतिहासात अनेक बंड उभी राहिली. परंतु कधीही शिवसेनेच्या अस्तित्वाला धक्का पोहचला नाही. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना शिवसेना आणि धन्युषबाण हे चिन्हही वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

शिवसेनेचे एकूण ५५ पैकी ४० आमदार शिंदे गटात सहभागी झाले. त्यानंतर शिवसेनेचे १२ खासदारही मुख्यमंत्र्यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे संसदीय, विधिमंडळ सभागृहात शिवसेना शिंदेंची की ठाकरेंची असा नवा वाद निर्माण झाला.

त्यात मूळ शिवसेना आमचीच असा दावा एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यात दादर येथील शिवसेना भवनावरही शिंदे गट दावा करणार असल्याचं सांगितले जात आहे. त्यामुळे बाळासाहेबांनी उभारलेल्या शिवसेना भवनाचा इतिहास काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.

शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे. तर सामना प्रबोधन ट्रस्टची मालमत्ता आहे. बाळासाहेब ठाकरेंनी जी व्यवस्था करून ठेवलीय त्यानुसार हे चालतं. उद्या मातोश्रीही आमचं म्हणतील. उद्या बाळासाहेबांनी शिवसेना स्थापनच केली नाही, बाळासाहेबांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही अशा शब्दात राऊतांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

शिवसेना १९६६ मध्ये जन्माला आली, त्यानंतर पक्ष जसजसा वाढत गेला. तेव्हा शिवसेना पक्ष कार्यालयाची उणीव भासू लागली. १९७४ मध्ये पहिल्यांदा शिवसेना भवन उभारलं गेले. ही जागा उमरभाई नावाच्या मुस्लीम माणसाची होती. व्यवहार करून ही जागा शिवाई ट्रस्टला देण्यात आली.

शिवसेना भवन हे केवळ पक्ष कार्यालय नसून सामान्य शिवसैनिकांसाठी ते मंदिर आहे. तर मराठी माणसांसाठी न्यायदानाचं ठिकाण. शिवसेनेच्या जडणघडणीत शिवसेना भवनाचं अभूतपूर्व योगदान आहे. अनेकांच्या भावना शिवसेना भवनाशी जोडल्या आहेत.

शिवसेना भवन तयार करताना आर्टिकेटनं किल्ल्यासारखा आकार देण्याचं ठरवलं. पुतळ्याची उंची किती असावी. खुद्द बाळासाहेब ठाकरे या बांधकामावर लक्ष ठेवून होते. जेव्हा शिवसेना भवन उभं राहिले त्यात माँसाहेबांना एक उणीव जाणवली.

माँसाहेबांनी शिवसेना भवनात मंदिर हवं असं म्हटलं. तेव्हा आंबेमातेचं मंदिर उभारण्यात आले. त्यानंतर शिवसैनिकांची रेलचेल शिवसेना भवनात वाढली. महाराष्ट्रात कुठल्याही राजकीय पक्षाचं इतकं भव्य पक्ष कार्यालय नाही. वर्गणीच्या माध्यमातून शिवसेना भवन उभं राहिले.

मार्च १९७७ मध्ये जनता पक्षाचं केंद्रात राज्य आले. त्यांची विजयी सभा शिवाजी पार्कात होती. तेव्हा उत्साही कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनावर दगड भिरकावले. तेव्हा काचा फुटल्या. तेव्हा शिवसैनिक रस्त्यावर उतरले. शिवसैनिक आणि जनता पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात धुमचश्क्री उडाली. त्यात ३० जण जखमी झाले.

यापुढे शिवसेना भवनावर जर कुणी वाकड्या नजरेने पाहिले तर आमच्या हातात जे असेल त्यानं प्रत्युत्तर देऊ असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तेव्हापासून आजतागायत शिवसेना भवनावर कुणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला नाही.