जगातील सर्वात श्रीमंत शहर न्यूयॉर्क बुडबुड्यांखाली, खचू लागले; इमारतींचे वजन मुख्य कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 04:33 PM2023-10-02T16:33:23+5:302023-10-02T16:38:04+5:30

न्यूयॉर्क नष्ट करण्यासाठी नैसर्गिक आपत्तीची गरज नाही. वर बांधलेल्या उत्तुंग इमारतीच त्याला नरकात बुडविण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे जगातील सर्वात श्रीमंत आणि महागडे शहर म्हणून ओळखले जाणारे शहर न्यूयॉर्क दोन दिवसांपूर्वीच मुसळधार पावसात बुडाले होते. आता य़ा शहराबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. न्यूयॉर्क हे शहर जमिनीमध्ये दबू लागले आहे.

नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीमध्ये हे समोर आले आहे. यामागे अनेक कारणे आहेत. यापैकीच एक म्हणजे टेक्टोनिक प्लेट सटकू लागल्या आहेत. तसेच जमिनीच्या पृष्ठभागावर इमारतींचे खूप मोठे वजन पडलेले आहे. तसेच हवामानातील बदल हे देखील एक कारण आहे.

जेपीएलने केलेल्या अभ्यासानुसार 2016 ते 2023 पर्यंत दरवर्षी 1.6 मिमी दराने ही जमिन खाली घसरू लागली आहे. NASA ने उपग्रहाद्वारे न्यूयॉर्क शहराचा InSAR डेटा घेतला. त्यातून थ्रीडी नकाशा बनविला आहे. याद्वारे न्यूयॉर्क शहराचे मोठे क्षेत्र दरवर्षी 1 किंवा 2 मिलिमीटर दराने घसरत आहे.

न्यूयॉर्क नष्ट करण्यासाठी नैसर्गिक आपत्तीची गरज नाही. वर बांधलेल्या उत्तुंग इमारतीच त्याला नरकात बुडविण्याची शक्यता आहे. सुमारे 24 हजार वर्षांपूर्वी येथे न्यू इंग्लंडचा एक भाग होता. जो बर्फाने झाकलेला होता. न्यू इंग्लंडची जमीन बर्फाच्या वजनामुळे बुडाली होती. तो बर्फ जसाजसा वितळला तसा तो भूभाग वरती येऊ लागला होता.

आम्ही न्यूयॉर्क शहराचा खालील भागाचा तपशीलवार नकाशा तयार केला आहे, असे जेपीएल शास्त्रज्ञ ब्रेट बुजंगा यांनी सांगितले. हे शहर थोड्या थोड्या अंतरावर बुडबुड्याप्रमाणे फुटण्यासाठी तयार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

बुडबुडा फुटायला आला की वर येतो. मात्र, त्यानंतर मोठा खड्डा तयार होतो. न्यूयॉर्कमध्ये असे झाल्यास अनेक ठिकाणी समुद्र आणि नदीच्या पाण्याने पूर येईल, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

न्यूयॉर्क बुडाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याच्या वर बांधलेल्या अतिशय उंच इमारती. या शहरातील काही भाग अतिशय वेगाने खाली जात आहे. न्यूयॉर्कमधील अशा भागात सुमारे 80 लाख लोक राहतात. हे सर्व भाग सखल आहेत. तेथे आता पाणी तुंबण्याचा धोका आहे.

सतत खाणकाम, ड्रेनेज, पाया खोदणे आणि मोठ्या मशिनने खोदणे यामुळे जमीन खचण्याचा धोका वाढतो. न्यूयॉर्कच नाही तर इंडोनेशियातील जकार्ताही बुडण्याच्या मार्गावर आहे. 2050 पर्यंत हे शहर समुद्रात बुडणार आहे. बहुतांश भाग 11 सेंटीमीटर पाण्याखाली असेल असा अंदाज आहे.