सर्वत्र स्फोट, आग अन् धूर...; हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलचाही पलटवार, पाहा भयावह फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 03:05 PM2023-10-08T15:05:53+5:302023-10-08T15:10:02+5:30

Israel Palestine Conflict: हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात रात्रभर संघर्ष सुरू आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच होते.

सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष पेटला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासकडून एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरुच आहेत. अनेक फोटो सध्या सोशल मीडियाद्वारे समोर येत आहेत.

हमास दहशतवादी इस्रायलमध्ये घुसून इस्रायली नागरिकांना लक्ष्य करत आहेत. पॅलेस्टिनी दहशतवादी हमासकडून इस्रायली नागरिकांचं अपहरण करून त्यांना ओलिस ठेवण्यात येत आहे.

पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासने शनिवारी अवघ्या २० मिनिटांत इस्रायलवर ५ हजार रॉकेट डागले. गेल्या २४ तासांत या संघर्षात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.

आतापर्यंत ३०० इस्रायली लोक मारले गेले आहेत, तर प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात गाझामध्ये २३० लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींबद्दल बोलायचे तर त्यांची संख्या ३५०० च्या वर गेली आहे.

हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात रात्रभर संघर्ष सुरू आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले सुरूच होते. इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, दक्षिण इस्रायलच्या काही भागांमध्ये लष्कर अजूनही हमासशी लढण्यात गुंतले आहे आणि देशातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नाही.

सोशल मीडियावर दिलेल्या माहितीत, प्रवक्त्याने असेही सांगितले की, हमासने गाझाजवळील इस्रायली शहरांवर शनिवारी केलेल्या अचानक हल्ल्यात मोठ्या संख्येने नागरिक आणि लष्करी जवानांना ओलीस ठेवले आहे.

हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. शत्रूने आमच्यावर केलेल्या हल्ल्याची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागणार असल्याचा इशारा नेतान्याहू यांनी हमासला दिला.

गेल्या काही वर्षांत इस्रायलच्या हद्दीत झालेला हा सर्वात भीषण हल्ला आहे. नेतान्याहू यांनी म्हटले की, इस्रायलमध्ये दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या कारवायांचा बीमोड करण्याचा आदेश सर्व सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांना दिला आहे.