CoronaVirus News : सावधान! कोरोनामुळे वाढला 'या' आजाराचा मोठा धोका; मुंबईत आढळले तब्बल 60 हजार रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 12:51 PM2022-09-08T12:51:22+5:302022-09-08T13:02:30+5:30

CoronaVirus News : देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता इतरही आजारांनी डोकं वर काढलं आहे. धडकी भरवणारी माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

देशात कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 4 कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक राज्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता इतरही आजारांनी डोकं वर काढलं आहे. धडकी भरवणारी माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात यावा म्हणून सर्वत्र प्रयत्न केले जात आहेत. विविध उपाययोजना या सातत्याने करण्यात येत आहे. पण असं असताना कोरोनामुळे टीबीचा धोका वाढला असून टीबी रुग्णांची संख्या वाढली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या दोन वर्षांत टीबीचे 60,579 रुग्ण आढळले आहेत, तर 14,338 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाशी टीबीचा संबंध असण्याची शक्यता तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे, मात्र याची पुष्टी झालेली नाही. कोविड संसर्गानंतर कमकुवत झालेल्या फुफ्फुसांवर टीबी अटॅक करत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत लक्षणे दिसताच क्षयरोगाची तात्काळ चाचणी करून घ्या आणि गंभीर होण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

इंडिया टीबी रिपोर्ट 2022 नुसार, 2020 मध्ये कोरोनाची लागण झालेल्या 1.3 लाख लोकांची टीबी चाचणी झाली. त्यापैकी 2,163 लोकांना या आजाराचे निदान झाले आहे. 2020 मध्ये क्षयरोगाच्या प्रकरणांमध्ये 28 टक्क्यांची घट झाली आहे. तसेच 2019 च्या तुलनेत केवळ 43,464 लोकांची ओळख पटली, तर मुंबईत एकूण 60,597 टीबी रुग्ण आढळून आले.

आकडेवारीनुसार, 2021 मध्ये क्षयरोगामुळे सुमारे 7,453 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 2020 मध्ये हा आकडा 6,985 होता. डॉ. निखिल सारंगधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 पासून, मुंबईत 15-36 वयोगटातील लोकांमध्ये क्षयरोगाच्या निदानात वाढ झाली आहे.

कोरोना महामारी आणि श्वसनाच्या लक्षणांसाठी आरोग्य सेवा केंद्रांशी संपर्क साधणाऱ्या लोकांच्या संख्येत आता घट झाली आहे. अलीकडेच एक हजाराहून अधिक लोकांनी तब्बल सात हजारांहून अधिक टीबी रुग्णांना दत्तक घेतले आहे, जेणेकरून त्यांना अधिक चांगले उपचार मिळावेत.

महाराष्ट्रात आतापर्यंत 81,06,272 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 79,50,302 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. संक्रमितांपैकी 1,48,269 लोकांचा मृत्यू झाला आहे. फुफ्फुसावर परिणाम झाल्यामुळे ही समस्या आली आहे. अशा स्थितीत फुफ्फुसात संसर्ग होण्याचा धोका असतो.

फुफ्फुसे कमकुवत झाल्यामुळे कोरोनाच्या काळात टीबीचे रुग्ण वाढल्याने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. आरोग्य विभाग सध्या टीबी बाधितांचा शोध घेत आहे. कोरोनाच्या काळात अधिक सतर्क राहण्याचा, मास्क लावण्याचा, नियम पाळण्याचा सल्ला हा वारंवार प्रशासनाकडून देण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.