असं दाम्पत्य ज्यांनी बाबा रामदेव यांना कंपनी सुरू करण्यासाठी दिलं कर्ज, बेटही दान केलं; आहेत तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 08:49 AM2024-04-25T08:49:50+5:302024-04-25T09:09:21+5:30

Baba Ramdev Patanjali : योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांची कंपनी पतंजली याबद्दल आज बहुतांश लोकांना माहीत आहे. यामध्ये एका जोडप्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Baba Ramdev Patanjali : योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांची कंपनी पतंजली याबद्दल आज बहुतांश लोकांना माहीत आहे. कंपनीचं बाजार भांडवल सुमारे ५५,४९० कोटी रुपये आहे. मात्र, त्यांच्या यशस्वी प्रवासाची सुरुवात अगदी साधी होती. यामध्ये एका जोडप्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हे जोडपं म्हणजे सुनीता आणि सरवन सॅम पोद्दार. २००६ मध्ये बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी त्यांची कंपनी स्थापन केली. त्यावेळी त्यांचं बँकेत खातंही नव्हतं. सुनीता आणि सरवन सॅम पोद्दार त्यांचे अनुयायी होते. कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना पर्सनल लोन दिलं होतं.

सुनीता आणि सरवन सॅम पोद्दार हे स्कॉटलंडचे रहिवासी आहेत. त्यांनी लिटल कंब्रे आयलंड २० लाख पौड्सना विकत घेतलं आणि २००९ मध्ये बाबा रामदेव यांना भेट दिले. २०११ पर्यंत त्यांच्याकडे पतंजली आयुर्वेदाचे बरेच शेअर्स होते. यासह, पती-पत्नी आचार्य बाळकृष्ण यांच्यानंतर कंपनीचे दुसरे सर्वात मोठे भागधारक बनले.

सुनीता यांच्या आयुष्यावर बाबा रामदेव यांचा खूप प्रभाव होता. विशेषतः योगाच्या माध्यमातून वजन कमी करण्याच्या त्यांच्या प्रवासात बाबा रामदेव यांची मदत झाली होती. बाबा रामदेव यांच्या प्रेरणेनं त्यांनी आपल्या पतीला बेट आणि मोठी रक्कम दान करण्यास तयार केलं. यानंतर सुनीता ब्रिटनमधील पतंजली योग पीठ ट्रस्टच्या विश्वस्त बनल्या.

सुनीता यांचा जन्म मुंबईत झाला, परंतु त्या लहानाच्या मोठ्या काठमांडूमध्ये झाल्या. त्या आता ग्लासगोमधील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. त्या योगा क्लासेस चालवतात. योग शिक्षकांना प्रशिक्षणही देतात. ग्लासगो दौऱ्यात त्यांनी बाबा रामदेव यांची भेट घेतली होती. दुसरीकडे, बिहारमध्ये जन्मलेले सॅम पोद्दार लहान वयातच ग्लासगोला गेले.

इंजिनिअर असलेल्या पोद्दार यांनी १९८० च्या दशकात होम-केअर व्यवसाय खरेदी करून व्यवसायात प्रवेश केला. सुनीता नंतर पतीसोबत व्यवसायात रुजू झाल्या. यापूर्वी त्या गॅस स्टेशनच्या व्यवस्थापन करत होत्या. पतीच्या यशात सुनीता यांचा वाटा खूप महत्त्वाचा आहे.

एक असा काळ होता जेव्हा बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसीच्या रजिस्ट्रेशनसाठी पैसेही नव्हते. ते लोकांना योगा शिकवायचे. बाबा रामदेव यांची लोकप्रियता वाढण्यासोबतच पोद्दार दांम्पत्यानं त्यांच्या कंपनीच्या विस्तारासाठी मोठं कर्जही दिलं. आता सुनीता या ओकमिनिस्टर हेल्थकेअरच्या सीईओ आणि संस्थापक आहेत. ती प्रसिद्ध होम केअर आणि रिहॅबिलिटेशन सेवा पुरवणारी कंपनी आहे.