अधिक मास: अपेक्षित यश, धनप्राप्ती हवी? ‘असे’ करा श्रीविष्णूंना प्रसन्न; पाहा, प्रभावी उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 03:03 PM2023-07-20T15:03:03+5:302023-07-20T15:03:03+5:30

adhik maas 2023: उत्तम यश, आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अधिक महिना सहाय्यभूत ठरू शकतो, असे मानले जाते. श्रीविष्णूंची कृपा लाभण्यासाठी कोणते उपाय करावेत? जाणून घ्या...

यंदा चातुर्मासात अधिक मास आला आहे. सुमारे दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो. सन २०२३ मध्ये श्रावण महिना अधिक आहे. अधिक महिना श्रीविष्णूंना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास म्हटले जाते. अधिक महिन्यात यथाशक्ती आणि शक्य तितकी श्रीविष्णूंची आराधना, उपासना, नामस्मरण करावे, असे म्हटले जाते.

यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त व्हावेत. जीवनस्तर उंचावला जावा. राहणीमान चांगले व्हावे. दीर्घायुष्य लाभावे, अशा अनेक कारणांसाठी माणून सतत झटत असतो. कठोर मेहनत आणि परिश्रम घेत असतो. अनेक जण यासोबत देवतांचे कृपाशिर्वाद लाभावेत, म्हणून नामस्मरण, जप, आराधना, उपासना करताना आपण पाहतो.

देशभरातील कोट्यवधी भाविक, भक्त दररोज, नियमितपणे आपापल्या आराध्यांचे पूजन करत असतात. शिवपूजनेसाठी श्रावण सर्वोत्तम मानला जातो, तसे अधिक महिन्यात केलेले विष्णूपूजन अत्यंत पुण्यफलदायी, शुभ मानले जाते. श्रीविष्णूंची स्तोत्रे, जप, श्लोक यांचे या कालावधीत प्रामुख्याने पठण केले जाते. काही उपाय असे आहेत, जे केल्याने श्रीविष्णूंचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊन मनोवांच्छित मनोकामना पूर्णत्वास जाऊ शकतात, असे सांगितले जाते.

अधिक महिन्यात श्रीविष्णूंचे नामस्मरण, आराधना, उपासना, पूजन करण्यासह श्रीविष्णूंना आवडणाऱ्या काही वस्तूंचे दान करणे उपयुक्त मानले जाते. यामध्ये पीतांबर, पिवळ्या रंगांची वस्त्रे, पिवळ्या रंगाची फळे, पिवळ्या रंगाचे धान्य प्रथम श्रीविष्णूंना अर्पण करावे.

यानंतर ते गरजू व्यक्तींना दान करावे, असे सांगितले जाते. असे केल्याने विष्णूकृपा होऊन कुटुंबात कोणत्याही प्रकारच्या गोष्टींची कमतरता राहणार नाही. तसेच लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वादही प्राप्त होऊ शकतील, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

अधिक महिन्यात दररोज नियमितपणे तिन्हीसांजेला देवासमोर दिवा लावावा. तसेच तो तुळशीसमोरही लावावा. अधिक महिन्यात दररोज सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावणे अत्यंत शुभ आणि पुण्य फलदायी मानले गेले आहे. गायीच्या तुपाचा दिवा लावल्यास उत्तम.

यावेळी 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. शक्य असल्यास तुळशीभोवती ११ वा २१ यथाशक्ती पदक्षिणा काढाव्यात. श्रीविष्णूंना तुळस सर्वाधिक प्रिय असल्याचे मानले जाते. त्यामुळे असे केल्याने घरात सुख, शांतता, समाधान नांदते. सकारात्मकतेचा संचार होतो. कुटुंबावरील संकटे नाहीशी होण्यास मदत होते. तसेच आर्थिक आघाडीवर सकरात्मक बदल आणि सुधारणा दिसून येतात. दिलासा मिळण्यास सुरुवात होते, असे सांगितले जाते.

आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि समृद्ध होण्यासाठी अधिक महिना सहाय्यभूत ठरू शकतो. या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने शक्य असल्यास दररोज नियमितपणे विष्णू मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा पांढऱ्या रंगाचा समावेश असलेली मिठाई अर्पण करावी. ही मिठाई अर्पण करताना तुळशीच्या पानांचा आवर्जुन वापर करावा.

मंदिरात जाऊन श्रीविष्णूंचे दर्शन घेणे शक्य नसल्यास घरच्या घरी नामस्मरण करावे. बाजारातून मिठाई आणणे शक्य नसल्यास घरीच खिरीचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते. असे केल्याने श्रीविष्णूंची कृपा आणि शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. धन, धान्य, वैभव, समृद्धी येऊन कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहण्यास मदत मिळू शकते, असे सांगितले जाते.

अधिक मासात केलेले पूजन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना यांचे पुण्य दसपटीने मिळले, अशी मान्यता आहे. अधिक महिन्यात शक्य असल्यास दररोज ब्रह्म मुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे. असे करणे शक्य नसल्यास आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळावे.

यानंतर नित्यनेमाने पूजन करावे. यावेळी गायत्री मंत्राचा जप प्रामुख्याने करावा, असे सांगितले जाते. विशेषतः घरातील महिलांनी गायत्री मंत्राचा जप नियमितपणे करावा. असे केल्याने पतीला दीर्घायुष्य मिळते. आरोग्य चांगले राहते. तसेच श्रीविष्णूंची कृपा आणि शुभाशिर्वाद संपूर्ण कुटुंबाला लाभतात, असे सांगितले जाते.

नोकरदार वर्गाला नोकरीत बढती, पदोन्नती आणि व्यापारी वर्गाना व्यापार गतिमान होण्यासाठी अधिक महिन्यात कुमारिकांना घरी बोलावून भोजन करवावे, असे सांगितले जाते. यामध्ये खिरीचा समावेश प्रामुख्याने करावा, असा सल्ला दिला जातो. असे केल्याने मनोवांच्छित इच्छा पूर्ण होऊ शकतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

खोटे बोलू नये, हा संस्कार आपल्यावर लहानपणापासून केला जातो. मात्र, अधिक महिन्यात याची विशेष काळजी घ्यावी. आपले आचरण शुद्ध, सात्विक, प्रामाणिक ठेवावे. ईर्ष्या बाळगू नये. अन्यथा श्रीविष्णूंची नाराजी ओढावू शकेल.

असे केल्याने कितीही उपाय, उपासना, आराधना केली, तरी त्याचे पुण्य प्राप्त होत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अधिक महिना व्रत-वैकल्ये, उपास, दान, पूजा, यज्ञ, हवन आणि ध्यानधारणा करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे.

या कालावधीत केलेल्या आराधना, उपासना, नामस्मरण, जप यांमुळे पापकर्मांचा क्षय होऊन पुण्यप्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.