Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रीक बुलेट कधी लॉन्च होणार?; कंपनीनं अखेर सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 07:42 PM2022-11-11T19:42:52+5:302022-11-11T19:44:40+5:30

रॉयल एनफिल्ड(Royal Enfield) सतत नवीन मॉडेल्स देशात आणि परदेशात लॉन्च करत आहे. कंपनीने आपली हंटर 350 बाईक काही महिन्यांपूर्वी भारतात लॉन्च केली होती. अलीकडेच, कंपनीने विदेशी बाजारपेठेत Meteor 650 आणली आहे. जी 2023 मध्ये भारतातही लॉन्च केले जाईल.

यानंतर, बुलेट 350 देखील नवीन इंजिन आणि प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्यात येणार आहे. सर्व ग्राहक कंपनीच्या इलेक्ट्रिक बाईकची वाट पाहत असले तरी नुकतेच रॉयल एनफिल्डने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईकबाबत एक महत्त्वाची माहिती लोकांना दिली आहे.

यापूर्वी, इलेक्ट्रिक रॉयल एनफिल्ड प्रसिद्धीच्या झोतात आली होती जेव्हा व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल यांनी रॉयल एनफिल्ड हंटर 350 लॉन्च दरम्यान पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की कंपनी लवकरात लवकर इलेक्ट्रिक एनफिल्ड लाँच करण्याचा विचार करत नाही, परंतु त्याऐवजी संशोधन आणि विकासासाठी वेळ घेत आहे.

आता आयशर मोटर्सच्या वार्षिक आर्थिक रिपोर्ट परिषदेदरम्यान, रॉयल एनफिल्डचे सीईओ बी गोविंदराजन यांनी त्याच मुद्द्याचा पुनरुच्चार केला, यूके आणि भारतातील कंपनीच्या तांत्रिक केंद्रांवर संशोधन आणि विकास कार्य सुरू आहे. इलेक्ट्रिक रॉयल एनफिल्डच्या आगमनासाठी जवळपास तीन वर्षे शिल्लक आहेत.

गोविंदराजन यांनी हंटर ३५० यशाबद्दल विस्तारानं सांगितले. रॉयल एनफिल्ड कशारितीने नव्या चाहत्यांमध्ये फेमस झाली. हंटर आल्यानंतर क्लासिक ३५० च्या विक्रीत महत्त्वाचे बदल झाले नाही कारण हंटर ३५० वेगळ्या कॅटेगिरीची बाईक आहे.

कंपनीचं उत्पादन यूरोपात तिसऱ्या सर्वाधिक विकणारा ब्रँड आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात रॉयल एनफिल्ड च्या विक्रीत वर्षाकाठी १४ टक्क्यांनी वाढ होत असल्याचं रॉयल एनफिल्डचे सीईओ बी गोविंदराजन यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं.