ईव्ही कारचे मालक असाल तर, या गोष्टींची काळजी घ्या... कार दीर्घ काळ चांगली राहिल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 05:33 PM2023-12-13T17:33:21+5:302023-12-13T17:37:02+5:30

हे तंत्रज्ञान तसे नवीन आहे, कंपन्यांनाही आणि त्यांच्या मेकॅनिक्सनाही. इलेक्ट्रीक ग्राहकांना येत असलेल्या समस्या या सर्वांसाठीच नव्या आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून वाढलेले पेट्रोल, डिझेलचे दर काही केल्या कमी होत नाहीएत. लोकसभा निवडणूक जवळ आली तरी दर कपात होण्याची शक्यता कमीच आहे. सीएनजीचे दरही जवळपास दुप्पट झाले आहेत. असे असताना लोकांचा कल काहीशा महाग असल्या तरी ईलेक्ट्रीक कारकडे वळू लागला आहे. जर तुम्ही ईव्हीचा विचार करत असाल किंवा मालक असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

ईलेक्ट्रीक कारची वेळीच काळजी घेतली तर तुम्हाला त्रासाचा सामना करावा लागणार नाहीय. हे तंत्रज्ञान तसे नवीन आहे, कंपन्यांनाही आणि त्यांच्या मेकॅनिक्सनाही. इलेक्ट्रीक ग्राहकांना येत असलेल्या समस्या या सर्वांसाठीच नव्या आहेत. त्यातून कंपन्या दुरुस्ती आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच काही काळजी घेतल्यास या समस्यांपासून तुम्ही लांब राहू शकता.

कधीही इलेक्ट्रीक कारची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज करू नका. कारण ईव्ही बॅटरीच सर्वकाही असते. या बॅटरीमध्ये अनेक सेल असतात. एकजरी खराब झाला तरी ही बॅटरी त्रास द्यायला सुरुवात करते. तसेच पूर्ण डिस्चार्ज झाली तर तिची क्षमताही कमी होऊ लागते. कारची बॅटरी कमीतकमी २० ते ८० टक्के चार्ज ठेवावी.

सारखे सारखे फास्ट चार्जिंग केल्याने बॅटरीवर परिणाम होतो. या बॅटरीवर कारची रेंज अवलंबून असते. जेव्हा बॅटरी फास्ट चार्ज होते, तेव्हा बॅटरीत जास्त उष्णता निर्माण होते. यामुळे बराच काळ फास्ट चार्जरचा वापर केल्याने बॅटरीचे आयुष्य कमी होऊ शकते. यामुळे बहुतांशवेळा होम चार्जिंगचा वापर करावा. गरज असेल तेव्हाच फास्ट चार्जर वापरावा.

एखादी गोष्ट दीर्घकाळ वापरायची असेल तर तिचा मेन्टेनन्सही वेळेवर आणि चांगल्या प्रकारे करावा लागतो. ईव्हीला कमी देखभालीची गरज असते. मात्र, आहे ती देखभाल वेळेत करणे गरजेचे आहे. यामुळे याकडे दुर्लक्ष न करता कार चांगली कशी ठेवता येईल याकडे लक्ष द्यावे.

सर्व्हिस सेंटरकडून वेळोवेळी बॅटरी टेस्टिंग आणि सॉफ्टवेअर अपडेट करून घ्यावे. जेणेकरून चार्जिंग आणि रेंजची समस्या येणार नाही. बऱ्याच गोष्टी नवीन असल्याने व्हॉट्सअप, फेसबुकवर ईव्ही ओनरचे ग्रुप असतात, त्यांचे अनुभव घ्यावेत. म्हणजे जेव्हा तुमच्यावर वेळ येईल तेव्हा तुम्हाला त्यातील थोडीतरी माहिती असू शकते.