सैन्य भरतीचे स्वप्न पूर्ण होताच शहीद शुभम मुस्तापुरे यांनी दिले होते गाव जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 07:06 PM2018-04-03T19:06:20+5:302018-04-03T19:10:53+5:30

सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने सुटी घेऊन गावाकडे आलेल्या जवान शुभम मुस्तापुरे यांनी गाव जेवण देऊन आनंद साजरा केला होता़

When the dream of military recruitment was completed Shahid Jawan Mastapure had given the village meal | सैन्य भरतीचे स्वप्न पूर्ण होताच शहीद शुभम मुस्तापुरे यांनी दिले होते गाव जेवण

सैन्य भरतीचे स्वप्न पूर्ण होताच शहीद शुभम मुस्तापुरे यांनी दिले होते गाव जेवण

googlenewsNext

पालम (परभणी ) : पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात शहीद झालेले जवान शुभम मुस्तापुरे हे मागील वर्षीच भारतीय सैन्य दलात दाखल झाले़ सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने सुटी घेऊन गावाकडे आलेल्या शहीद शुभम यांनी गाव जेवण देऊन आनंद साजरा केला होता़ परंतु, हा आनंद क्षणिक ठरला, असेच म्हणावे लागेल.

पालम तालुक्यातील कोनेरवाडी येथील रहिवाशी असलेले  जवान शुभम सूर्यकांत मुस्तापुरे हे २१ वर्षाचे जवान आज पाकिस्तान सैन्याच्या गोळीबारात शहीद झाले. जवान मुस्तापुरे यांच्या कुटूंबियांची आर्थिक स्थिती बेताचीच आहे़ वडील गावात टेलर काम व शेती करून उदरनिर्वाह भागवितात. त्यांच्या कुटूंबियांकडे २ एकर २० आर एवढी कोरडवाहू जमीन आहे. त्यांना दोन लहान भावंडे असून, दोन्हीही भाऊ गंगाखेड येथे शिक्षण घेत आहेत. शुभम यांचे प्राथमिक शिक्षण चाटोरी येथे तर दहावी अहमदपूर येथे आणि अकरावी, बारावीचे शिक्षण पालम शहरात झाले.

भारतीय सैन्यात दाखल होवून देशसेवा करण्याचे स्वप्न शुभम यांनी उराशी बाळगले. या साठी त्यांनी लष्करात भरती होण्यासाठी नांदेड येथे खाजगी अकादमीत भरतीपूर्व प्रशिक्षणही घेतले. याशिवाय गावात नियमित व्यायाम व मैदानी चाचणीसाठी लागणारा सराव ते करत. त्यातूनच सप्टेंबर २०१७ मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या भरती प्रक्रियेत शुभम यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली. ११ महिने बेंगलोर येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर २४ डिसेंबर २०१७ ते २४ जानेवारी २०१८ अशी एक महिन्याची सुटी काढून जवान शुभम कोनेरवाडी येथे आले होते. ही त्यांची कुटूंबियांशी झालेली शेवटची भेट ठरली. याच सुटी दरम्यान, सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने जवान शुभम यांनी गावात मारोतीचा रोटाचा कार्यक्रम घेऊन गाव जेवणही दिले होते.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शहीद शुभम यांचे पार्थिव बुधवारी (दि. ४ ) सकाळी ११ वाजता औरंगाबाद येथे पोहचणार आहे. त्यानंतर तेथून ते परभणी जिल्ह्यातील कोनेरवाडी येथे आणण्यात येईल. कोनेरवाडी येथेच त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. 

Web Title: When the dream of military recruitment was completed Shahid Jawan Mastapure had given the village meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.