परभणी जिल्ह्यासाठी सहा लाख मे़ टन चाऱ्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 08:50 PM2018-11-30T20:50:12+5:302018-11-30T20:51:16+5:30

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती  निर्माण झाली तरी चारा टंचाई उद्भवल्यास प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे़ 

Six lakh Metric Tone of fodder for Parbhani district in drought planning | परभणी जिल्ह्यासाठी सहा लाख मे़ टन चाऱ्याचे नियोजन

परभणी जिल्ह्यासाठी सहा लाख मे़ टन चाऱ्याचे नियोजन

Next

परभणी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उद्भवणारी चारा टंचाई लक्षात घेऊन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने जून अखेरपर्यंत पुरेल एवढ्या ६ लाख मे़ टन चाऱ्याचे नियोजन केले आहे़ त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती  निर्माण झाली तरी चारा टंचाई उद्भवल्यास प्रशासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे़ 

यावर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने संपूर्ण जिल्हा दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे़ पाणीटंचाई बरोबरच चाऱ्याचाही प्रश्न या काळात निर्माण होवू शकतो़ खरीप हंगामामध्ये झालेल्या पेरणीवर काही चारा प्रशासनाकडे उपलब्ध आहे़ तसेच रबी हंगामातही थोड्याफार प्रमाणात चाऱ्याची उपलब्धता होणार असून, चारा टंचाई उद्भवू नये, यासाठी प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे़
 येथील जिल्हा पशुसंवर्धन विभागातून मिळालेल्या माहितीनुसार ३० आॅक्टोबरपर्यंत उपलब्ध असलेला चाऱ्यावर पुढील नियोजन करण्यात आले आहे़

परभणी जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातून ३ लाख ९५ हजार ८४५ मे़ टन चाऱ्याची उपलब्धता झाली आहे़ तसेच ३० आॅक्टोबरपर्यंत २७ हजार २३१ मे़ टन चारा रबी हंगामात झालेल्या पेरणीतून उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे़ याशिवाय वनक्षेत्र, चटई क्षेत्र, कुरण, बांधावरील क्षेत्र, पडिक जमीन या भागातील चाऱ्याचा आढावा घेतला तेव्हा १ लाख ३०० मे़ टन चारा उपलब्ध आहे़ तसेच जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मक्याची पेरणी झाली असून, त्यातूनही २० हजार ६४० मे़ टन चारा मिळेल़

महाराष्ट्र शासनाने जिल्हा नियोजन विशेष समितीच्या माध्यमातून राबविलेल्या योजनेतून ३१ हजार ७४३ म़े टन, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १७ हजार ५०० मे़टन चारा उपलब्ध होईल़ त्यामुळे या सर्व घटकांमधून परभणी जिल्ह्यात ५ लाख ९३ हजार २९३ मे़ टन चाऱ्याची उपलब्धता होवू शकते़ हा चारा जून अखेरपर्यंत पुरू शकतो़ विशेष म्हणजे ३० आॅक्टोबरपर्यंतचा हा अहवाल असून, त्यावेळी रबी हंगामात केवळ ३ टक्के पेरणी झाली होती़ या पेरणीच्या आधारे २७ हजार २३१ मे़ टन चाऱ्याचे नियोजन करण्यात आले होते़ सद्यस्थितीला रबी हंगामातील पेरणी १३ टक्क्यांवर पोहचली. रबीतूनही चारा उपलब्ध होणार आहे़ 

दररोज लागतो २५४६ मे़ टन चारा
परभणी जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेल्या पशुधनाची संख्या लक्षात घेता राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीत मोठ्या जनावरांसाठी दररोज ६ किलो, लहान जनावरांसाठी ३ किलो आणि शेळ्या-मेंढ्यासाठी ०़६ किलो चारा प्रतिदिन लागतो, असे निष्कर्ष काढले आहेत़ या निष्कर्षानुसार परभणी जिल्ह्यात जनावरांसाठी दररोज २५४६ मे़ टन चाऱ्याची आवश्यकता आहे़ तर महिन्याकाठी ७६ लाख ३९३ मे़टन चारा जिल्ह्याला लागतो़

जिल्ह्यात साडेतीन लाख जनावरे
पशूसंवर्धन विभागाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जिल्ह्यामध्ये ३ लाख ६२ हजार ७९३ मोठी जनावरे आहेत़ तर ९१ हजार ३१० लहान जनावरे आहेत़ चाऱ्यासाठी पशूसंवर्धन विभाग घटक स्वरुपात जनावरांची नोंदणी करते़ त्यानुसार लहान जनावरांमध्ये दोन घटक गृहित धरले जातात़ त्यामुळे लहान जनावरांची घटक संख्या ४५ हजार ६५५ एवढी असून, शेळ्या-मेंढ्या १ लाख ५९ हजार ५५९ एवढ्या असून, त्यांची घटक संख्या १५ हजार ९५६ एवढी आहे़ जिल्ह्यामध्ये ४ लाख ४२ हजार ४०४ पशूधन घटक उपलब्ध असून, या घटकांनुसार चाऱ्याचे नियोजन करण्यात येते़ 

चाऱ्यासाठी २५ लाखांची मागणी
भविष्यात जिल्ह्यामध्ये चारा कमी पडू नये, यासाठी चारा उत्पादनाचाही उपक्रम राबविण्यात येणार असून, चाऱ्यासाठी शेतकऱ्यांना प्रशासनामार्फत बियाणांचे वाटप करण्यासाठी पूनर्विनियोजन अंतर्गत २५ लाख रुपयांची मागणी नोंदविण्यात आली आहे़ 

१ कोटी ८८ लाखांची नोंदविली मागणी
जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता भविष्यामध्ये चाऱ्याची टंचाई वाढू शकते़ त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध करून देणे गरजेचे होईल़ पशू संवर्धन विभागामार्फत गावनिहाय आराखडे तयार करण्याचे काम सुरू आहे़ भविष्यात चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला तर चारा छावण्या उभाराव्या लागतील़ त्यासाठी शासनाकडे १ कोटी ८८ लाख रुपयांची मागणी नोंदविली आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा पशू संवर्धन उपायुक्त डॉ़ संजीव खोडवे यांनी दिली़ 

Web Title: Six lakh Metric Tone of fodder for Parbhani district in drought planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.