संगीता वडकर पहिल्या महिला महापौर

By admin | Published: November 6, 2014 02:32 PM2014-11-06T14:32:43+5:302014-11-06T14:32:43+5:30

परभणी महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता वडकर यांना मिळाला असून, या संदर्भातील बिनविरोध निवडीची घोषणा बुधवारी करण्यात आली.

Sangeeta Wadkar First Lady Mayor | संगीता वडकर पहिल्या महिला महापौर

संगीता वडकर पहिल्या महिला महापौर

Next

 

परभणी : येथील महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता वडकर यांना मिळाला असून, या संदर्भातील बिनविरोध निवडीची घोषणा बुधवारी करण्यात आली. उपमहापौरपदी काँग्रेसचे भगवानराव वाघमारे यांची निवड जाहीर करण्यात आली.
परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता वडकर व काँग्रेसचे भगवानराव वाघमारे या दोघांचेच अर्ज शनिवारी निवडणूक अधिकार्‍यांकडे दाखल झाले होते. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली होती. या संदर्भातील अधिकृत घोषणा मात्र ५ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीसाठी सकाळी ११ वाजता बी. रघुनाथ सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी संभाजी झावरे, उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, रणजीत पाटील, नगरसचिव चंद्रकांत पवार यांची उपस्थिती होती. महापौरपदासाठी वडकर यांचा तर उपमहापौरपदासाठी वाघमारे यांचेच एकमेव अर्जआल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी सभागृहात ६५ पैकी ५२ नगरसेवक उपस्थित होते. यावेळी नूतन पदाधिकार्‍यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मावळते महापौर प्रताप देशमुख, सभापती विजय जामकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, माजी नगराध्यक्ष बंडू पाचलिंग, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंजाब देशमुख, बाळासाहेब फुलारी, राधाकिशन वाघमारे, अतिक उर रहेमान, जलालोद्दीन काजी, नगरसेवक मेहराज कुरेशी, खान, स. अहमद, बाळासाहेब बुलबुले, विश्‍वजित बुधवंत, अर्चना नगरसाळे, रेखा कानडे, विजया कनले, सुनील देशमुख आदींची उपस्थिती होती. ही प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी बाळासाहेब पेंडलवार, साहेबराव पवार, ईस्माईल शेख, भगवान सुरवसे, उमेश आर्दड आदींनी परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)
 
स्वच्छता-पाणीपुरवठय़ास प्राधान्य- वाघमारे
शहरात साफसफाई व सुरळीत पाणीपुरवठा नागरिकांना देण्यास पहिले प्राधान्य राहणार असल्याची प्रतिक्रिया नूतन उपमहापौर भगवान वाघमारे यांनी दिली. महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असून, शहराच्या विकासाची कामे यापुढेही चालू राहतील, असे सांगत त्यांनी पाणीपुरवठा योजनेच्या शहरातील अंतर्गत कामांचे उद््घाटन जानेवारी महिन्यात करण्यात येणार असल्याचे सांगितले. 
 
विकासकामे सुरूच राहणार-संगीता वडकर
गेल्या अडीच वर्षांत मावळते महापौर प्रताप देशमुख यांनी परभणी शहरात अनेक विकासाची कामे केली आहेत. हीच विकास कामे यापुढेही चालूठेवली जातील.. पाणी प्रश्न, स्वच्छता, दलित वस्तीमधील महिलांसाठी शौचालय बांधकाम आदी प्रश्न मार्गी लावले जातील, असे नूतन महापौर संगीता वडकर यांनी सांगितले. तसेच घरकुल योजना, जलकुंभाचे बांधकाम, उद्यानाचे सुशोभिकरण आदी प्रश्नही सोडविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
■ परभणी शहराचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. प्राप्त परिस्थितीनुसार राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभागी होणे आवश्यक होते, असेही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख म्हणाले. शहरातील मूलभूत प्रश्न सोडविण्यावर भर दिला जाणार असून, विकासकामांसाठी शासनाकडून निधी खेचून आणण्यात काँग्रेस- राष्ट्रवादी कमी पडणार नाही, असेही पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले. 
विकासासाठी कटिबद्ध-प्रताप देशमुख
 
> परभणी शहरातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जो विश्‍वास टाकला आहे. तो विश्‍वास सार्थठरविण्याचा प्रयत्न सातत्याने पक्षाकडून करण्यात आला. यापुढेही शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार महापौरपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा योजनेतील अडथळे आता दूर झाले आहेत. निधीही उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ही योजना प्राधान्याने आता पूर्ण केली जाणार असल्याचे सांगताना मावळते महापौर प्रताप देशमुख यांनी या निवड प्रक्रियेसाठी सहकार्य केलेल्या सर्व नगरसेवकांचे आभार व्यक्त केले.
> जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली होती. यासाठी विजय भांबळे व सुरेश देशमुख यांनी परिश्रम घेतले होते. हाच पॅटर्न महापौर निवडीतही कायम असल्याचे दिसून आले. महापौरपदी वडकर व उपमहापौरपदी वाघमारे यांची बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर विजयी जल्लोष करताना नूतन पदाधिकार्‍यांसह प्रताप देशमुख, परिहार. वाघमारे यांच्या निवडीने कार्यकर्ते समाधानी
> नूतन उपमहापौर भगवान वाघमारे हे १९८५ पासून शहराच्या पालिकेतील राजकारणात सक्रिय आहेत. तब्बल तीन वेळा त्यांची नगराध्यक्षपदाची संधी हुकली. मितभाषी व शांत स्वभावाच्या भगवान वाघमारे यांना काँग्रेसने उपमहापौरपदाची संधी दिल्याने निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी दिली. निवडीनंतर जल्लोष, मिरवणूक
■ महापौर, उपमहापौरांची निवड झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. त्यानंतर काँग्रेसच्या वतीने उपमहापौर भगवान वाघमारे यांची विजयी मिरवणूक शहरात काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांची मोठय़ा प्रमाणात उपस्थिती होती.

Web Title: Sangeeta Wadkar First Lady Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.