नांदेड : जिल्हा परिषदेत फिरणार्‍या शिक्षकांची संख्या लक्षात घेता जि.प. त येणार्‍या शिक्षकांना आता कामाच्या स्वरूपाची नोंद करावी लागणार आहे. शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी याबाबत प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषदेत शिक्षकांची चलती नव्या पदाधिकार्‍यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. बोगस बदली प्रकरणानंतर या शिक्षकांना आपल्यापासून लांब ठेवण्याची काळजी पदाधिकार्‍यांनी घेतली आहे. शिक्षक पीए ठेवण्याबाबतही नव्या पदाधिकार्‍यांनी काळजी घेतली आहे. शिक्षण सभापती बेळगे यांनी जिल्हा परिषदेत येणार्‍या शिक्षकांना आपल्या कामाची नोंद प्रशासनाकडे करण्याचे आदेश दिले आहेत. अशीच पद्धत आरोग्य विभागातही गेल्या दोन महिन्यांपासून राबविली. 
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी रूजू होताच मुख्यालय सोडून जिल्हा परिषदेत विनाकारण आरोग्य कर्मचार्‍यांवर आळा घातला होता. 
दरम्यान, बोगस बदली प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी केलेल्या कारवाईचे शिक्षण सभापती बेळगे यांनी सर्मथन केले आहे. प्रशासनाने केलेली कारवाई योग्यच असून शिक्षण विभागातील अनागोंदीला आळा घालण्यास आपण प्राथमिकता देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे असेही ते म्हणाले.