परभणी : स्मशानभूमीच्या सुशोभिकरणासाठी सरसावले जांब येथील ग्रामस्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:14 AM2019-06-16T00:14:44+5:302019-06-16T00:15:56+5:30

देशपातळीवर स्वच्छतेचे वारे वाहत असताना स्मशानभूमीच्या स्वच्छतेकडे होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेऊन तालुक्यातील जांब येथील ग्रामस्थांनी स्मशानमूमीच्या सुशोभिकरणाचा वसा हाती घेतला आहे.

Parbhani: The village collector of Jamb, who has gone to beautify the crematorium | परभणी : स्मशानभूमीच्या सुशोभिकरणासाठी सरसावले जांब येथील ग्रामस्थ

परभणी : स्मशानभूमीच्या सुशोभिकरणासाठी सरसावले जांब येथील ग्रामस्थ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : देशपातळीवर स्वच्छतेचे वारे वाहत असताना स्मशानभूमीच्या स्वच्छतेकडे होत असलेले दुर्लक्ष लक्षात घेऊन तालुक्यातील जांब येथील ग्रामस्थांनी स्मशानमूमीच्या सुशोभिकरणाचा वसा हाती घेतला आहे.
गावागावात ग्रामस्वच्छता मोहीम राबविली जात असताना गाव परिसरातील स्मशानभूमींची मात्र दुरवस्था असल्याचे पहावयास मिळते. हीच बाब लक्षात घेऊन जांब येथील ग्रामस्थांनी स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. येथील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वीच झरी येथील स्मशानभूमीची पाहणी केली आणि त्यानंतर जांब येथील स्मशानभूमीही नीटनिटकी व सुशोभित करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. प्रत्येकजण आपापल्या परीने या कामात सहभाग नोंदवित आहे. त्यातूनच दररोज स्मशानभूमी परिसराच्या स्वच्छतेबरोबरच इतर उपक्रम राबविले जात आहेत. या भागात मागील वर्षी एकूण ३७० झाडे लावली होती. या झाडांच्या संवर्धनासह यावर्षी आणखी झाडे लावण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. तसेच स्मशानभूमी परिसरात जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हौदाचे बांधकाम करण्यात आले आहे. अंत्यविधीसाठी १० बाय १० आकाराचे ओटे बांधले असून येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटावा, यासाठी लोकवर्गणीतून एक बोअरही घेण्यात आला आहे.
लोकवर्गणीतून सुशोभीकरण
स्मशानभूमीच्या सुशोभिकरणासाठी जांब येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी जमा केली आहे. लोकवर्गणी आणि लोकसहभागातूनच कामे हाती घेण्यात आली आहेत. गावातील ५० ते ६० युवक आणि ज्येष्ठ नागरिक या मोहिमेत सहभागी झाले असून या पावसाळ्यात स्मशानभूमी परिसरात १ हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी पेडगाव तलावातील गाळ आणून तो स्मशानभूमीत टाकण्याचा मानस येथील ग्रामस्थांनी बोलून दाखविला.
मंदिराचे भूमिपूजन
स्मशानभूमी परिसरात लोकसहभागातून शंकराचे मंदिर उभारणीचे कामही हाती घेण्यात आले आहे. कांतराव झरीकर यांच्या हस्ते शुक्रवारी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून कामाला सुरुवात झाली आहे. यावेळी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पाच एकरचा हा परिसर सुशोभित करण्यासाठी जांब येथील ग्रामस्थ हिरीरीने सहभागी होत आहेत.

Web Title: Parbhani: The village collector of Jamb, who has gone to beautify the crematorium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :parabhaniपरभणी