परभणी : महामार्ग पोलिसांकडून वाहनधारकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:58 AM2019-01-14T00:58:25+5:302019-01-14T00:58:57+5:30

पोलीस प्रशासनाची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना मागील २० वर्षांपासून देवगावफाटा येथे महामार्ग पथक वाहनधारकांची अक्षरश: लूट करीत असून, प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे़

Parbhani: Vehicle plundering robbers from highway police | परभणी : महामार्ग पोलिसांकडून वाहनधारकांची लूट

परभणी : महामार्ग पोलिसांकडून वाहनधारकांची लूट

Next

विजय चोरडिया।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : पोलीस प्रशासनाची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना मागील २० वर्षांपासून देवगावफाटा येथे महामार्ग पथक वाहनधारकांची अक्षरश: लूट करीत असून, प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे़
जिंतूर येथे महामार्ग पोलीस पथक कार्यरत आहे़ या पथकात ३५ ते ४० कर्मचारी असून, वाहतुकीला शिस्त व अपघातग्रस्त नागरिकांना मदत व्हावी, हा उद्देश या पथकाचा आहे़ या पथकाने १९९७-९८ या वर्षी देवगावफाटा येथे आपली दुसरी शाखा काढली़ या शाखेला कोणतीही परवानगी नाही़ केवळ महसूल मिळावा, यासाठी अनधिकृत ही शाखा कार्यरत आहे़ २००४-०५ मध्ये देवगावफाटा येथे एका खाजगी गाडीत तत्कालीन पोलीस अधीक्षक औरंगाबाद येथे प्रवास करीत असताना येथील कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी अडविली़ तेव्हा पोलीस अधीक्षकांनी पथकाची परवानगी मागितली असता, कोणतीही परवानगी नसल्याचे उघड झाले़ त्यानंतर चार महिने हे पथक बंद होते़ परत या पथकाने स्वत:ची राहुटी उभी केली़ हे पथक अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी वाहनधारकांकडून वसुलीवर जास्त भर असल्याचा दिसतो़ विशेष म्हणजे, दररोज केवळ ३० टक्के वाहनधारकांच्या दंडाच्या पावत्या फाडल्या जातात़ उर्वरित वाहनधारकांना पावती न देता हातावर किंवा कागदावर स्टॅम्प मारले जातात़
१० खाजगी व्यक्ती वसुलीदूत
जिंतूर व देवगावफाटा येथे वाहनधारकांकडून वसुलीसाठी १० खाजगी व्यक्ती नियुक्त केले आहेत़ त्यांना दररोज ५०० ते ८०० रुपये मिळतात़ हे व्यक्ती वाहन थांबविण्यापासून ते वसुलीचे सर्व काम करतात़ विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी हे खाजगी व्यक्तीच सर्वच कारभार पाहतात़ अनेक वाहनांच्या रात्री झडत्या घेतल्या जातात़ या मार्गावरून वाहतूक करताना वाहन धारक त्रस्त झाले आहेत़ विशेष म्हणजे, महामार्ग पथकाला रात्री ८ नंतर वाहने तपासता येत नाहीत़ मात्र राजरोसपणे रात्री-अपरात्री वाहनांची झडती घेतली जाते़ महिला प्रवासी असतानाही असा प्रकार घडत आहे़
आंतर राज्य वाहनधारक त्रस्त
जिंतूर व देवगावफाटा येथील पथकाकडून आंध्रप्रदेश, तेलंगना, कर्नाटक, राजस्थान व बाहेरील राज्यातील वाहनधारकांना मोठा त्रास आहे़ तपासणीच्या नावाखाली वाहनधारकांची अक्षरश: लूट केली जात आहे़ त्यामुळे या मार्गावरून जाताना आंतरराज्य वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे़ विशेष म्हणजे, आंतरराज्य वाहनात महिला असल्या तरी तासन्तास वाहन अडवून ठेवणे व नियमबाह्य महसूल घेणे यामुळे जिंतूरसह देवगावफाटा येथील हे पथक डोकेदुखी ठरत आहे़ अनेक वेळा वसुलीमुळे वाहनधारक व पोलिसांमध्ये प्रचंड वाद निर्माण होत आहेत़ याकडे वरिष्ठ मात्र दुर्लक्ष करीत आहेत़
जिंतूर महामार्ग पथकात ३५ कर्मचारी कार्यरत आहेत़ जिंतूर व देवगावफाटा येथे हेच कर्मचारी काम पाहतात़ देवगावफाटा येथील पथकाला परवानगी मिळावी म्हणून पत्रव्यवहार केला आहे़ १९९७-९८ पासून पथक कार्यान्वित आहे़ आम्ही फक्त पेट्रोलिंग करत आहोत़
-गंगाधर राठोड, पोलीस उपनिरीक्षक, महामार्ग
देवगावफाटा येथील चौकी अनाधिकृत असेल तर तेथील वरिष्ठांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे़ या ठिकाणी वाहनधारकांची नुसती लूट सुरू आहे़ व्यापारी वर्गही त्रस्त आहे़ या पथकाचा मूळ उद्देश नावालाच राहिला आहे़ कडक कार्यवाही अपेक्षित आहे़
-अ‍ॅड़ मनोज सारडा, ज्येष्ठ विधिज्ञ

Web Title: Parbhani: Vehicle plundering robbers from highway police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.