परभणी :कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रभावी जनजागृतीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:25 AM2018-01-30T00:25:51+5:302018-01-30T00:25:58+5:30

३५ वर्षानंतरही जिल्ह्यात कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन झाले नाही. सध्या कुष्ठरोग्यांची संख्या नगण्य असली तरी या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रभावी जनजागृती व उपचार करण्याचीे गरज निर्माण झाली आहे.

Parbhani: The need for effective public awareness to eradicate leprosy | परभणी :कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रभावी जनजागृतीची गरज

परभणी :कुष्ठरोग निर्मूलनासाठी प्रभावी जनजागृतीची गरज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ३५ वर्षानंतरही जिल्ह्यात कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन झाले नाही. सध्या कुष्ठरोग्यांची संख्या नगण्य असली तरी या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रभावी जनजागृती व उपचार करण्याचीे गरज निर्माण झाली आहे.
कुष्ठरोग हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे. त्याचा परिणाम त्वचा, हातातील आणि पायातील परिघवर्ती चेता, नाकातील त्वचा, घसा आणि डोळ्यावर होतो. त्वचेच्या टोकावर परिणाम झालेल्या भागांची संवेदना नष्ट होते. संवेदना नाहिशी झाल्याने हाता-पायांची बोटे वाकडी होतात किंवा गळून पडतात. हात-पाय विद्रुप होणे, न खाजणारा, न दुखणारा बधीर चट्टा हे या रोगाचे प्रमुख लक्षण आहे. हॅन्सन या शास्त्रज्ञाच्या नावावरुन कुष्ठरोग ओळखला जातो. संसर्गजन्य व असंसर्गजन्य असे कुष्ठरोगाचे दोन प्रकार आहेत. संसर्गजन्य प्रकारामध्ये कुष्ठरोग्याची प्रतिकार यंत्रणा बचाव करण्यास अपुरी पडते, त्यामुळे कुष्ठरोग्याचे जिवाणू त्वचेमध्ये वाहतात. हा रोग जिल्ह्यासह राज्यातून हद्दपार करण्यासाठी राज्य शासनाने राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्याचे ठरविले. १९५५-५६ साली या कार्यक्रमांतर्गत पाहणी, शिक्षण व उपचार या तत्वावर एक उद्देशीय पद्धतीने योजना राबविण्यास सुरुवात झाली. १९८१-८२ पासून प्रभावी औषधोपचाराचा समावेश असलेली बहुविध औषधोपचार पद्धत लागू करण्यात आली. १९९५-९६ पासून सर्व जिल्ह्यांमध्ये ही उपचार पद्धती सुरु करण्यात आली. जिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातही या रोगावर मोफत उपचार केले जातात; परंतु, ही उपचार पद्धती लागू करुनही ३५ वर्षानंतरही जिल्ह्यात १३१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून कुष्ठरोग हा हद्दपार करण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याची गरज आहे.
असे आहे कुष्ठरोग्याचे प्रमाण
परभणी जिल्ह्यामध्ये १९९०-९१ पासून बहुविधी औषधोपचार पद्धती सुरु करण्यात आली. जिल्ह्यामध्ये १९८१-८२ यावर्षी १० हजार लोकसंख्येस ७१.१० रुग्ण असे प्रमाण होते. त्यानंतर १९९१-९२ साली हे प्रमाण कमी होत १० हजार लोकसंख्येमागे १५.६० एवढे आले. २००१-०२ या वर्षी ३.८१ असे झाले. त्यानंतर २००५-०६ हे प्रमाण केवळ ०.५४ वर आले. २०१५-१६ या वर्षात पुन्हा कुष्ठरोग्यांच्या संख्येत वाढ होत ०.६५ एवढे आले. सद्यस्थितीत डिसेंबर २०१७ अखेर जिल्ह्यात १३१ कुष्ठ रुग्ण आहेत. त्यामुळे तब्बल ३५ वर्षानंतरही जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग निर्मूलनाची प्रभावी जनजागृती झाली नाही.
कुष्ठरोग दिनानिमित्त कार्यक्रम
महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यात ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत कुष्ठरोग दिन पंधरवाडा साजरा केला जातो. यानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात. यामध्ये प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, ग्रामसभेत कुष्ठरोगाबाबत माहिती देणे, महिला मंडळ, बचतगट यांना कुष्ठरोगाबाबत शास्त्रीय माहिती देणे, यात्रेत कुष्ठरोगाबाबत प्रदर्शन भरविणे आदी कार्यक्रम घेतले जातात, अशी माहिती डॉ. एस.एम.बायस, वैद्यकीय अधिकारी एस.एम.कोपुरवाड, डॉ.बिर्ला सरपे, पर्यवेक्षक विष्णू घुगे, एम.जी. पवार, सी.एस. पाटील यांनी दिली.

Web Title: Parbhani: The need for effective public awareness to eradicate leprosy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.