परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ नगरसेवकांचे राजीनामे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:41 AM2019-02-02T00:41:24+5:302019-02-02T00:42:12+5:30

येथील महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य पदावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला असून जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी परस्पर पक्षाशी संबंधित नसलेल्या व्यक्तीचा अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून १८ पैकी १३ नगरसेवकांनी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार यांच्याकडे राजीनामे दिले आहेत.

Parbhani: NCP's 13 corporators resign? | परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ नगरसेवकांचे राजीनामे ?

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ नगरसेवकांचे राजीनामे ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य पदावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला असून जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी परस्पर पक्षाशी संबंधित नसलेल्या व्यक्तीचा अर्ज दाखल केल्याच्या कारणावरून १८ पैकी १३ नगरसेवकांनी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार यांच्याकडे राजीनामे दिले आहेत.
महानगरपालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्वीकृत सदस्य अ‍ॅड. विष्णू नवले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या एका जागेसाठी मनपा प्रशासनाच्या वतीने २९ जानेवारीपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मनपातील गटनेते जलालोद्दीन काजी यांच्या नेतृत्वाखाली काही सदस्यांनी मंगळवारी अतिक इनामदार यांचा स्वीकृत पदासाठी मनपा आयुक्तांकडे अर्ज दाखल केला होता. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये वादावादी सुरु झाली आहे. या संदर्भात १ फेब्रुवारी रोजी पक्षाचे नगरसेवक बालासाहेब बुलबुले, चॉंद सुभाना जाकेर खान, अमरिका बेगम अब्दुल समद, विकास लंगोटे, संगिता दुधगावकर, अली खान मोईन खान, वर्षा खिल्लारे, शेख फहेद शेख हमीद, आबेदाबी सय्यद अहेमद, अमोल पाथरीकर, शेख आलिया अंजूम, मो. गौस, नाजेमा बेगम शेख अब्दुल रहीम या १३ नगरसेवकांनी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार यांच्याकडे राजीनामे दिले. याबाबत अ‍ॅड.परिहार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांनी विश्वासात न घेता गटनेते जलालोद्दीन काजी यांच्या सहीने अतिक इनामदार यांचा अर्ज भरला. जे की राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नव्हते. नगरसेवकांना विचारात घेऊन उमेदवार दिला जात नसेल तर पक्षात राहून काय उपयोग, असेही या संदर्भात निवेदनात या नगरसेवकांनी नमूद केले आहे. त्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. परिहार, मनपातील विरोधी पक्षनेते विजय जामकर यांच्यासह नगरसेवकांनी मनपा आयुक्त रमेश पवार यांना स्वीकृत सदस्य पदासाठी दिलेले नाव रद्द करावे, असे निवेदन दिले आहे. त्यामध्ये अ‍ॅड.विष्णू नवले यांच्या पत्नी प्रणिता नवले यांना स्वीकृत सदस्यपदी नियुक्त करण्याचा निर्णय पक्षाच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता; परंतु, तसे न होता मनमानी पद्धतीने दुसराच अर्ज भरण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गटनेत्याने दिलेले नाव विचारात घेऊ नये, असेही निवेदनात म्हटले आहे. असेच स्वतंत्र निवेदन शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.परिहार यांनी मनपा आयुक्तांना दिले आहे.
अ‍ॅड.विष्णू नवले यांच्या पत्नींना स्वीकृत सदस्यपदाची उमेदवारी देण्याचा गुरुवारी झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता; परंतु, २९ रोजी परस्पर उमेदवारी बदलली गेली. त्यामुळे आ.दुर्राणी यांच्या निर्णयाच्या विरोधात १३ नगरसेवकांनी आपल्याकडे राजीनामे दिले आहेत. याबाबत आपण लवकरच माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही बाब घालणार आहे.
-अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार, शहर जिल्हाध्यक्ष
अ‍ॅड.विष्णू नवले यांच्या पत्नी प्रणिता नवले यांनाच स्वीकृत सदस्यपदाची उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले होते; परंतु, त्यांनीच राजकीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे अतिक इनामदार यांचे नाव सूचविले होते. त्यानुसार इनामदार यांचा स्वीकृत सदस्यपदासाठी गटनेते जलालोद्दीन काजी यांनी अर्ज दाखल केला होता. यामागे कोणालाही डावलण्याचा किंवा मनमानीचा उद्देश नव्हता.
-आ.बाबाजानी दुर्राणी, जिल्हाध्यक्ष राकॉं

Web Title: Parbhani: NCP's 13 corporators resign?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.