परभणी : दुधनातील पाणी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:25 AM2018-12-22T00:25:23+5:302018-12-22T00:25:53+5:30

सेलू तालुक्यातील दुधना नदीपात्रातून १२ टक्के पाणी अचानक कमी झाल्याने हे पाणी गेले कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण केले असताना अचानक पाणी गायब झाल्याने परभणीसह पूर्णा शहराचाही पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.

Parbhani: Missing water in milk | परभणी : दुधनातील पाणी गायब

परभणी : दुधनातील पाणी गायब

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सेलू तालुक्यातील दुधना नदीपात्रातून १२ टक्के पाणी अचानक कमी झाल्याने हे पाणी गेले कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण केले असताना अचानक पाणी गायब झाल्याने परभणीसह पूर्णा शहराचाही पाणीप्रश्न निर्माण झाला आहे.
यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने हे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. प्रत्येक प्रकल्पामध्ये पाण्याची अद्ययावत नोंद घेतली जात आहे. उपलब्ध असलेल्या पाण्यानुसार आॅक्टोबर महिन्यातच आरक्षण करण्यात आले. परभणी शहरासह पूर्णा शहरासाठी दुधना प्रकल्पामध्ये १६ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार २६ आॅक्टोबर २०१८ रोजी निम्न दुधना प्रकल्पात २६.४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. २७ नोव्हेंबर २०१८ रोजी हा पाणीसाठा १४.१५ टक्क्यावरुन येऊन ठेपला. तीन महिन्यांमध्ये धरणातून कोठेही पाणी सोडले नसताना १२.२८ टक्के पाणी कमी झाले आहे.
त्यामुळे हे पाणी गेले कोठे, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. परभणी जिल्ह्यातील निम्न दुधनाच्या लाभक्षेत्रात चारा पिकासाठी आणि जनावरांसाठी पाणी सोडण्याची मागणी होत असताना दुधना पात्रात पाणी तर सोडण्यात आले नाही; परंतु, प्रकल्पातील पाणीसाठा मात्र कमी झाला आहे. प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार २२ नोव्हेंबर रोजी नदीपात्रात पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले होते; परंतु, हे पाणी सोडले नाही.
पाणी सोडू नये, यासाठी दबाव येत होता. प्रकल्पातून ३ ते ४ टक्के पाणी सोडले असते तर सेलू, मानवत, परभणी आणि जिंतूर या चार तालुक्यांमधील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असता; परंतु, पाणी सोडण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आली.
पाणी सोडण्यासाठी दबाव वाढत गेल्यानंतर १ डिसेंबर रोजी या प्रकल्पातून दोन्ही कालव्यातून पाणी सोडले आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये सद्यस्थितीला केवळ ७.३१ टक्के म्हणजे १७.७१० दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. २६ आॅगस्ट ते २७ नोव्हेंबर या काळात धरणातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पाण्याचा उपसा झाल्याने सध्या चार तालुक्यांतील अनेक गावांबरोबरच परभणी शहर आणि पूर्णा शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरक्षणानुसार पाणी उचलले नसताना धरणाचा पाणीसाठा कमी कसा झाला, याची चौकशी करावी, अशी मागणी आता होत आहे.
पाण्याचा अवैध उपसा वाढला
निम्न दुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अवैध उपसा होत आहे. प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात परतूर, मंठा तालुक्यातून हे पाणी उपसले जात आहे. परभणी जिल्ह्यात एकीकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना धरणातून शेकडो विद्युत मोटारींच्या सहाय्याने बागायती पिके जगविली जात असल्याचा आरोप होत आहे. तसेच पिण्यासाठी पाणी नसताना पाण्याचा अवैध उपसा होत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पथकांची स्थापना केली असली तरी ही पथके उपसा रोखण्यामध्ये अयशस्वी होत आहेत. त्यामुळेच परभणी जिल्ह्यावर पाण्याचे संकट ओढावले आहे.
शहरांच्या पाण्याचा निर्माण झाला प्रश्न
४२६ आॅगस्ट रोजी दुधना प्रकल्पामध्ये २६.४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. या पाण्याचे आरक्षण करण्यात आले. परभणी, पूर्णा शहरासाठी १६ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले. उपलब्ध पाणी शहराला पुरुन वेळेत दुधना नदीपात्रात पाणी सोडले असते तर ६० ते ७० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असता; परंतु, अवैध मार्गाने पाण्याचा उपसा केल्यामुळे या प्रकल्पात सध्या १७.७१० दलघमी पाणी उपलब्ध असून दोन्ही शहरांना पाणी सोडणे अशक्यप्राय झाले आहे. त्यामुळे अवैध मार्गाने उपसा झालेल्या पाण्याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
४दुधना प्रकल्पात असलेल्या पाण्याचा लाभक्षेत्रात एक थेंबभरही वापर झाला नसताना या प्रकल्पातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडावे, यासाठी किसान सभेने वारंवार आंदोलने केली; परंतु, राजकीय दबावापोटी वेळेत पाणी सोडण्यात आलेले नाही. प्रकल्पातील पाण्यावर ऊस जगविण्यापेक्षा दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी देणे महत्त्वाचे असताना याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचा आरोप किसान सभेचे कॉ.विलास बाबर यांनी केला आहे.

Web Title: Parbhani: Missing water in milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.