परभणी- हिंगोली विधान परिषद निवडणूक : देशमुख, बाजोरियांचे भवितव्य मतपेटीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:56 PM2018-05-21T23:56:22+5:302018-05-21T23:57:00+5:30

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत ९९.६० टक्के मतदान झाले असून काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख व शिवसेना- भाजपा युतीचे विप्लव बाजोरिया यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. गुरुवारी मतमोजणी होणार असून या मतमोजणीनंतर अनपेक्षित निकाल लागेल, अशी चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तूळातून होताना दिसून येत आहे.

Parbhani - Hingoli Vidhan Parishad elections: Deshmukh, Bajaurians | परभणी- हिंगोली विधान परिषद निवडणूक : देशमुख, बाजोरियांचे भवितव्य मतपेटीत बंद

परभणी- हिंगोली विधान परिषद निवडणूक : देशमुख, बाजोरियांचे भवितव्य मतपेटीत बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत ९९.६० टक्के मतदान झाले असून काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुरेश देशमुख व शिवसेना- भाजपा युतीचे विप्लव बाजोरिया यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. गुरुवारी मतमोजणी होणार असून या मतमोजणीनंतर अनपेक्षित निकाल लागेल, अशी चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तूळातून होताना दिसून येत आहे.
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या प्रचाराला ८ मे पासून सुरुवात झाली. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सुरेश देशमुख, शिवसेना- भाजपा युतीचे विप्लव बाजोरिया आणि अपक्ष उमेदवार सुरेश नागरे हे उतरले होते. नागरे यांनी तीन दिवसांपूर्वी बाजोरिया यांना पाठिंबा दिला. त्यानंतर या मतदारसंघात आघाडीचे देशमुख व युतीचे बाजोरिया यांच्यात सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्या दृष्टीकोनातून देशमुख व बाजोरिया यांनी आपापल्या परीने प्रचार मोहीम राबविली. देशमुख यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, राष्ट्रवादीचे माजीमंत्री राजेश टोपे यांनी सभा घेतली. बाजोरिया यांच्यासाठी मात्र एकही सभा झाली नाही. केवळ राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी त्यांच्यासाठी सेलू येथे बैठक घेतली. त्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. विशेषत: मतदानाच्या एक दिवस अगोदर घडलेल्या राजकीय घडामोडींनी आघाडी व युतीमधील मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे अनपेक्षित निकालाची चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी परभणी जिल्ह्यातील ४ व हिंगोली जिल्ह्यातील ३ अशा एकूण ७ केंद्रावर सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. प्रारंभी मंदगतीने मतदान झाले. दुपारी २ वाजेनंतर मात्र मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडले. त्यानंतर मतदानाला मतदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला. परभणी येथील मतदान केंद्रावर परभणी मनपाच्या ७० व जि.प. आणि पं.स. सभापतींसह ६३ अशा एकूण १३३ पैकी सर्वच्या सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सेलू येथील केंद्रावर सेलू नगर पालिकेच्या २८ आणि जिंतूर नगरपालिकेच्या २६ अशा एकूण ५४ मतदारांनी मतदान केले. गंगाखेड येथील केंद्रावर गंगाखेड नगरपालिकेच्या २८ , पालम नगरपंचायतीच्या १९ व पूर्णा नगरपालिकेच्या २३ अशा ७० अशा ७० मतदारांनी १०० टक्के मतदान केले. पाथरी तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर पाथरी नगरपालिकेच्या २३, मानवत पालिकेच्या २२ व सोनपेठ पालिकेच्या २० अशा ८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कळमनुरी येथील मतदान केंद्रावर कळमनुरी पालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे १९ व वसमत येथील मतदान केंद्रावर वसमत न.प.च्या ३२ आणि औंढा नगरपंचायतीच्या १९ अशा एकूण ५१ मतदारांनी १०० टक्के मतदान केले.
हिंगोलीमध्ये मात्र १०९ पैकी १०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. हिंगोली येथील केंद्रावर जि.प. व पं.स.च्या ५७ पैकी ५६ नगरपालिकेच्या ३५ पैकी ३४ आणि सेनगाव नगरपंचायतीच्या १७ मतदारांनी मतदान केले. हिंगोली नगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक नाना नाईक यांना तेथील अधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केल्याने ते मतदान करु शकले नाहीत. तर काँग्रेसच्या जि.प.सदस्या सविता गौतम भिसे या मतदान केंद्रावर पोहचू शकल्या नाहीत. त्यामुळे हिंगोलीत फक्त दोन मतदारांनी मतदान केले नाही. त्यामुळे मतदानाची टक्केवारी १०० टक्के न होता ९९.६० टक्के झाली.
पाथरीत बाबाजानी, बाजोरिया आले समोरासमोर
पाथरी येथील मतदान केंद्रावर सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली असली तरी दुपारी १२ वाजेपर्यंत एकाही मतदाराने मतदानाचा हक्क बजावला नाही. दुपारी १ वाजेनंतर मतदानासाठी हालचाली सुरु झाल्या. दुपारी २ वाजेच्या सुमारास मानवत येथील भाजपाचे नगरसेवक वाहनातून दाखल झाले. ओळखपत्र पाहूनच पोलीस मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश देत होते. याचवेळी सोनपेठचेही नगरसेवक मतदान केंद्राबाहेर दाखल झाले. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर गर्दी जमली. यावेळी मावळते आ.बाबाजानी दुर्राणी, माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर हे ही मतदान केंद्रावर दाखल झाले. याचवेळी युतीचे उमेदवार विप्लव बाजोरिया व त्यांचे वडील आ.गोपीकिशन बाजोरिया हे ही दाखल झाले. आ.दुर्राणी- आ.बाजोरिया यांची समोरासमोर भेट झाली. त्यानंतर हास्यविनोद झाला. बाजोरिया यांनी आंब्याच्या पेट्या मतदारांना खाऊ घातल्या, असे सांगताच हास्यकल्लोळ उडाला. येथे केंद्रप्रमुख म्हणून उपजिल्हाधिकारी सी.एस.कोकणी यांनी काम पाहिले. त्यांना तहसीलदार वासुदेव शिंदे यांनी सहाय्य केले.
सेलूत दुपारी अडीच वाजताच १०० टक्के मतदान
सेलू येथील तहसील कार्यालयात दुपारी १२ वाजेपर्यंत एकाही मतदाराने मतदान केले नाही. त्यानंतर नगराध्यक्ष विनोद बोराडे व त्यांच्या जनशक्ती आघाडीचे नगरसेवक मतदानासाठी दाखल झाले. त्यानंतर काँग्रेसचे हेमंतराव आढळकर, जिंतूर येथील राष्ट्रवादीचे कपील फारोखी हे ही नगरसेवकांसह मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यानंतर मतदानाला वेग आला. दुपारी अडीच वाजेपर्यंत या केंद्रावरील सर्वच्या सर्व म्हणजे ५४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: Parbhani - Hingoli Vidhan Parishad elections: Deshmukh, Bajaurians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.