परभणी : टँकरचे नियोजन नसल्याने टंचाईत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 12:39 AM2019-05-09T00:39:12+5:302019-05-09T00:39:36+5:30

शहरातील यशोधननगर, रविराज पार्क भागात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ मनपाने या भागासाठी केवळ एका टँकरचे नियोजन केले असून, हे टँकरही नियमित येत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़

Parbhani: Due to the lack of planning of the tanker, the burden of scarcity | परभणी : टँकरचे नियोजन नसल्याने टंचाईत भर

परभणी : टँकरचे नियोजन नसल्याने टंचाईत भर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील यशोधननगर, रविराज पार्क भागात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ मनपाने या भागासाठी केवळ एका टँकरचे नियोजन केले असून, हे टँकरही नियमित येत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़
शहरातील जायकवाडी परिसरात यशोधननगर असून, याच भागात रविराज पार्क पार्वतीनगर ही वसाहत आहे़ दोन्ही वसाहतींमध्ये साधारणत: एक ते दीड हजार कुटूंबिय वास्तव्याला आहेत़ या दोन वसाहतींबरोबरच या परिसरातील इतर वसाहतींसाठी महापालिकेने केवळ एका टँकरचे नियोजन केले आहे़ टँकरचे पॉर्इंटही नेमून दिले आहेत; परंतु, टँकर येण्याची वेळ निश्चित नसल्याने येथील नागरिकांची तारांबळ होते़ यशोधननगर भागात १० दिवसानंतर बुधवारी टँकर दाखल झाले़ त्यामुळे टँकरचे पाणी भरून घेण्यासाठी नागरिकांची धावपळ झाल्याचे पहावयास मिळाले.
यशोधननगर परिसरामध्ये जलवाहिनी टाकली आहे; परंतु, या जलवाहिनीला जोडणी दिली नाही़ लोकमान्यनगर भागातील मुख्य जलवाहिनीवर व्हॉल्व्ह टाकल्यानंतर नळाद्वारे यशोधननगराला पाणी उपलब्ध होऊ शकते़ महापालिकेने पुढाकार घेतला तर या भागातील पाण्याची समस्या निकाली निघू शकते़; परंतु, जलवाहिनी टाकूनही अद्याप पाणीपुरवठा सुरू केला नसल्याने येथील नागरिकांना टंचाईचा सामन करावा लागत आहे़ नळ योजना नाही, हातपंपांचे पाणी आटले आहे़ अशा परिस्थितीत या नागरिकांची संपूर्ण भिस्त टँकरच्या पाण्यावर आहे; टँकरही बेभरोस्याचे असल्याने नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत़ नियमित टँकर येत नाही़ पाणी संपल्यानंतर नगरसेवकांकडे पाठपुरावा करावा लागतो़ त्यानंतर कुठे टँकरचे पाणी मिळत आहे़ मनपाने या भागात जलवाहिनीचे पाणी उपलब्ध करून द्यावे आणि येथील समस्या निकाली काढावी, अशी नागरिकांची मागणी आहे़ याच परिसरातील रविराज पार्क, पार्वतीनगर या भागाचीही अशीच समस्या आहे़ रविराज पार्क परिसरात जलकुंभ उभारणीचे काम सध्या सुरू आहे़ विशेष म्हणजे, या भागातही महापालिकेने जलवाहिनी टाकली आहे़ मात्र या जलवाहिनीला पाणी उपलब्ध करून दिले नाही़
परिणामी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़ मार्च महिन्यामध्येच रविराज पार्क भागातील हातपंप आटले आहेत़ या भागातही सहा ते सात दिवसांतून एक वेळा टँकरचे पाणी येत असून, सुमारे १ हजार कुटूंबियांसाठी केवळ १२ हजार लिटरचे एकच टँकर पाठविले जाते़ या टँकरच्या दिवसभरातून पाच फेऱ्या होत असल्या तरी नागरिकांना पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही़ एका वेळेला केवळ ५०० लिटर पाणी मिळते़ हे पाणी जास्तीत जास्त दोन दिवस पुरते़ त्यामुळे मनपाने टँकरची संख्या वाढवावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे़
जलकुंभावर जाऊन आणावे लागते टँकर
४यशोधननगर, रविराज पार्क या दोन्ही भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे़ मनपाच्या टँकरचे नियोजन नाही़ पाणी संपल्यानंतर नगरसेवकांकडे पाठपुरावा केला जातो़ थेट पाण्याच्या टाकीवर जाऊन एक जण टँकरसोबत दिल्यासच ते टँकर वसाहतीपर्यंत पोहचते आणि तेव्हा कुठे नागरिकांना पाणी उपलब्ध होते़ प्रत्येक वेळी अशाच प्रकारे पाठपुरावा केल्यानंतरच टँकर मिळते़ त्यामुळे टंचाईत भर पडली आहे़
४महापालिकेचे टँकरचे नियोजन नसल्यानेच परिसरामध्ये पाण्याची समस्या तीव्र झाली आहे़ टँकरच्या सहाय्याने किमान तीन दिवसांआड मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला तर नागरिकांची समस्या दूर होऊ शकते़; परंतु, हे नियोजन विस्कळीत असल्याने येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़
४टँकरच्या सहाय्याने मिळणारे पाणी सांडपाण्यासाठी वापरले जाते़ पिण्यासाठी मात्र विकतच्या पाण्यावरच येथील नागरिकांची भिस्त आहे़ त्यामुळे टंचाई परिस्थितीमध्ये पाण्यावरील खर्च वाढला आहे़ प्रभागात टँकर पोहचल्यानंतर पाणी वितरित करीत असताना अनेक नागरिकांपर्यंत पाणी पोहचत नाही़ त्यामुळे पाण्यावरून वादाचेही प्रकार घडत आहेत़ मनपाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी होत आहे़
मागील महिनाभरात टँकरने केवळ तीन वेळा पाणी मिळाले़ १० दिवसांतून एक वेळा टँकर येत असल्याने पाण्यासाठी ओढाताण होत आहे़ या भागातील बोअर आटल्याने पाणीटंचाई वाढली आहे़ मनपाने टँकरची संख्या वाढवावी़
-रामचंद्र शिंदे, नागरिक
बोअरचे पाणी आटले असून, १५-१५ दिवस टँकरचे पाणी मिळत नाही़ आमच्या भागात नळ नाहीत़ त्यामुळे पाणी संपल्यानंतर दूर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागत आहे़ मागील काही दिवसांपाूसन ही परिस्थिती निर्माण झाली आहे़
-शिवनंदा मिरसगावे, नागरिक
१५ दिवसांपर्यंत टँकर येत नाही़ नळ योजना नसल्याने पाण्याची खूपच समस्या निर्माण झाली आहे़ या भागात जलकुंभाचे काम सुरू आहे़ ते पूर्ण करून जलवाहिनीच्या माध्यमातून परिसराला त्वरित पाणी उपलब्ध करून द्यावे़
-मीनाबाई चव्हाण

Web Title: Parbhani: Due to the lack of planning of the tanker, the burden of scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.