परभणी : १० वाळूघाट उपशासाठी झाले खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:24 PM2019-03-17T23:24:09+5:302019-03-17T23:24:31+5:30

जिल्ह्यातील १० वाळूघाटांचे लिलाव पूर्ण झाले असून या घाटांवर आता अधिकृत वाळू उपसा होणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लवकरच या वाळूघाटांमधून वाळू उपशाला सुरुवात होईल.

Parbhani: 10 opened for sandalgate rallies | परभणी : १० वाळूघाट उपशासाठी झाले खुले

परभणी : १० वाळूघाट उपशासाठी झाले खुले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: जिल्ह्यातील १० वाळूघाटांचे लिलाव पूर्ण झाले असून या घाटांवर आता अधिकृत वाळू उपसा होणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लवकरच या वाळूघाटांमधून वाळू उपशाला सुरुवात होईल.
जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाळूघाटाचे लिलाव रखडल्याने वाळूची कृत्रिम टंचाई निर्माण झाली होती. परिणामी बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिक कचाट्यात सापडले होते. दुष्काळी परिस्थिती आणि त्यात वाळूअभावी बांधकामे ठप्प असल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो मजुरांनी रोजीरोटीसाठी इतर व्यवसाय सुरु केले. तसेच वाळू मिळत नसल्याने शासकीय योजनांची कामेही ठप्प पडली होती. घरकुल बांधकामांसह इतर कामांवर वाळूचा मोठा परिणाम झाला. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने १५ वाळूघाट लिलावासाठी ठेवले होते. त्यापैकी १० वाळूघाटांचे लिलाव पूर्ण झाले असून कंत्राटदाराने या वाळूघाटाची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केल्यानंतर वाळूचा अधिकृत उपसा सुरु केला जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाने वाळू घाटांसाठी निविदा प्रक्रिया राबविली. त्यात दुस्सलगाव येथील वाळूघाट ६४ लाख ८४ हजार ५८४ रुपयांना जय नृसिंह बिल्डींग मटेरियल यांना सुटला आहे. काजळा रोहिणा हा वाळूघाट ३५ हजार ३१ हजार ४० रुपयांचा श्री साई भुसार दुकान या कंत्राटदारास मिळाला आहे. मुद्गल येथील वाळू घाट १ कोटी १३ लाख १८ हजार ४२८ रुपयांना शेख बिल्डींग मटेरियल यांनी घेतला आहे.
पूर्णा तालुक्यातील धानोरा मोत्या येथील वाळू घाट ८१ लाख रुपयांना साई अर्थमूव्हर्स अ‍ॅण्ड बोअरवेल बिल्डींग या कंत्राटदारास, चिंचटाकळी येथील वाळूघाट ६१ लाख १ हजार १०० रुपयांना कृष्णा त्र्यंबक कचरे यांना मिळाला आहे. गुंजचा वाळू घाट ६४ लाख ९१ हजार रुपयांना अग्रवाल ट्रेडिंग कंपनीला, रावराजूर येथील वाळू घाट विष्णू शंकर नारणवार यांना १ कोटी १ लाख ९५ हजार रुपयांना मिळाला आहे. तर कुंभारी येथील वाळू घाट शेख चाँद शेख हबीब यांना ६० लाख ६२ हजार ६०० रुपयांना मिळाला आहे. वांगी येथील वाळू घाटाचा लिलाव झाला असून हा घाट १ कोटी १४ लाख ६ हजार ५४८ रुपयांना बप्पा श्री कन्स्ट्रक्शनला सुटला आहे. त्याचप्रमाणे मानवत तालुक्यातील पार्डी येथील वाळू घाटाचाही लिलाव झाला असून हा घाट १२ लाख ४० हजार रुपयांना सुटला आहे.
जिल्ह्यातील १० वाळू घाटांचे लिलाव पूर्ण झाल्याने या वाळू घाटामधून लवकरच वाळू उपसा होणार असून खुल्या बाजारपेठेत वाळू उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात दोन वर्षांपासून वाळूची कृत्रिम टंचाई आहे. वाळू घाटांच्या लिलावामुळे आगामी काळात बांधकाम व्यवसायाला चालना मिळेल, अशी शक्यता आहे.
वाळूच्या किंमतीत घट होण्याची शक्यता
४वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने खुल्या बाजारातून वाळू गायब झाली होती; परंतु, चोरुन- लपून वाळूची विक्री सुरुच होती. वाळूची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने ० हजार रुपयांना तीन ब्रास वाळू मिळत होती. वाळूचे भाव गगनाला भिडल्याने नागरिक जेरीस आले होते. शिवाय काळ्या बाजारात वाळू खरेदी केल्यानंतर कारवाईचा धसका असल्याने वाळू खरेदीकडेच अनेकांनी पाठ फिरवली होती. दरम्यान, १० वाळू घाटांमधील अधिकृत वाळू उपसा होणार असल्याने वाळूचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. यातून बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.
७ कोटींचा महसूल होणार जमा
४जिल्ह्यातील १० वाळू घाटांचे लिलाव झाल्याने या माध्यमातून प्रशासनातील तिजोरीमध्ये ७ कोटी ९ लाख ३० हजार ३०० रुपयांचा महसूल जमा होणार आहे. यावर्षी वाळू घाटांचे लिलाव रखडल्याने जिल्हा प्रशासनाला महसूल जमा करताना अडचणींचा सामना करावा लागला. मार्च महिन्याच्या अखेरीस १० घाटांचे लिलाव झाल्याने ७ कोटी रुपयांचा महसूल प्रशासनाला मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या महसुली उत्पादनात वाढ होणार आहे.

Web Title: Parbhani: 10 opened for sandalgate rallies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.