No Police recruitment from Parbhani district | पोलीस भरतीतून परभणी जिल्हा वगळला; उमेदवारांना इतर जिल्ह्यामधून करावे लागणार प्रयत्न

ठळक मुद्दे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अर्ज करुन पोलीस दलात भरती होण्याच्या उद्देशाने हे युवक तयारीला लागले होते. सोमवारी इतर जिल्ह्यांमधून पोलीस भरतीच्या जाहिराती प्रकाशित झाल्या. मात्र  परभणी जिल्ह्यात यावर्षी पोलीस भरती होणार नसल्याची बाब या युवकांच्या निदर्शनास आली.

परभणी : जिल्हा पोलीस दलामध्ये पोलीस भरती प्रक्रिया होईल, या आशेने मागील अनेक महिन्यांपासून तयारी करणार्‍या युवकांचा सोमवारी हिरमोड झाला आहे. राज्यात सर्वत्र पोलीस भरती होत असली तरी परभणी जिल्ह्यात मात्र ही भरती प्रक्रिया होणार नसल्याने आता या युवकांना पोलीस दलात भरती होण्यासाठी इतर जिल्ह्यांमध्ये प्रयत्न करावा लागणार आहे.

पोलीस कर्मचार्‍यांच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया होऊ घातली होती. प्रत्येक जिल्ह्यात भरती होणार असल्याने परभणीतील इच्छुक उमेदवारांनीही भरतीची तयारी सुरु केली होती. मागील ६ महिन्यांपासून परभणी शहरासह तालुक्याच्या ठिकाणी युवक-युवती भरतीची तयारी करीत होते. पहाटे आणि सायंकाळच्या वेळी धावणे, लांबउडी, उंचउडी, गोळाफेक आदी क्रीडा प्रकारांचा कसून सराव शहरातील मैदानांवर केला जात होता. पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अर्ज करुन पोलीस दलात भरती होण्याच्या उद्देशाने हे युवक तयारीला लागले होते. सोमवारी इतर जिल्ह्यांमधून पोलीस भरतीच्या जाहिराती प्रकाशित झाल्या.  मात्र  परभणी जिल्ह्यात यावर्षी पोलीस भरती होणार नसल्याची बाब या युवकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे युवकांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले आहे. ५-६ महिन्यांपासून तयारी केली. मात्र, जिल्ह्यात भरती प्रक्रियाच होणार नसल्याने आता उमेदवारांना इतर जिल्ह्यामधून पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज करावे लागणार आहेत. 

शासन नियमात अडकली जिल्ह्याची भरती प्रक्रिया
परभणी जिल्हा पोलीस दलामध्ये ३१ डिसेंबर २०१७ अखेर पोलीस कर्मचार्‍यांची १ हजार ७९२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३८ पदे रिक्त आहेत. शासनाच्या निर्देशानुसार रिक्त पदांच्या ७५ टक्के पदभरतीची किंवा ३० पदांपेक्षा अधिक पदे असल्यास भरती प्रक्रिया राबवावी, असे निर्देश आहेत. त्यामुळे रिक्त ३८ पदांच्या ७५ टक्के पदे २९ एवढी होत आहेत. ही पदसंख्या ३० पेक्षा कमी असल्याने जिल्ह्यात भरती प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे इच्छुक युवकांचा हिरमोड झाला आहे. एकंदर यंदा जिल्ह्यात पोलीस भरती नसल्याने उमेदवारांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

इतर जिल्ह्यातून करावे लागणार प्रयत्न
परभणी जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया यावर्षी राबविली जाणार नसली  तरी इतर जिल्ह्यांमध्ये मात्र पोलीस कर्मचार्‍यांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पोलीस भरती होणार नाही. त्यात शेजारच्या हिंगोली जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामुळे या सर्व उमेदवारांना इतर जिल्ह्यांमधून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करावे लागतील. उमेदवारांची संख्या वाढल्याने स्पर्धा अधिक होणार असून स्थानिक उमेदवार नसल्याने जिल्ह्यातील युवकांना नुकसानीलाच सामोरे जावे लागणार आहे. शिवाय परजिल्ह्यात जावून मैदानी चाचण्यांमध्ये पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक कौशल्यपणाला लावावे लागणार आहे.