परभणीत दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा कळस; केंद्रप्रमुखांसह ११ शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचे सीईओंचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 07:16 PM2019-03-13T19:16:49+5:302019-03-13T19:19:01+5:30

पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील हायटेक माध्यमिक विद्यालयाच्या केंद्रावर कॉप्याचा कळस

mass copy in Class 10 th exam in Parbhani; The order of the CEOs to file cases against 11 teachers, including the Center Chief | परभणीत दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा कळस; केंद्रप्रमुखांसह ११ शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचे सीईओंचे आदेश

परभणीत दहावीच्या परीक्षेत कॉप्यांचा कळस; केंद्रप्रमुखांसह ११ शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचे सीईओंचे आदेश

Next
ठळक मुद्देकेंद्रावर ११ अनधिकृत शिक्षक, कर्मचारी आढळून आलीकारवाईत बैठे पथकास दिले अभय

परभणी : पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील हायटेक माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर बुधवारी दहावीच्या भूमिती विषयाच्या पेपरच्या वेळी मोठ्या प्रमाणात कॉप्याचा सुळसुळाट व ११ अनधिकृत शिक्षक, कर्मचारी आढळून आल्याने त्यांच्यावर पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी दिले आहेत़ 

परभणी जिल्ह्यातील बारावीच्या काही परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कॉप्यांचा सुळसुळाट आढळून आला़ परंतु, या प्रकरणी कठोर कारवाई मात्र शिक्षण विभागाकडून झाली नाही़ दहावीच्या परीक्षा सुरू असतानाही अशीच परिस्थिती काही केंद्रावर असल्याची चर्चा जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळात सुरू होती़ या पार्श्वभूमीवर १३ मार्च रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज हे औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाचे अधीक्षक ए़बी़ जाधव, पूर्णा येथील गटविकास अधिकारी एस़आऱ कांबळे, बोर्डाचे पर्यवेक्षक के़एम़ अंबुलगेकर, मानवत येथील गटशिक्षणाधिकारी एस़बी़ ससाणे यांच्या पथकासह दुपारी १२ वाजता पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील हायटेक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दाखल झाले. 

यावेळी मोठ्या प्रमाणात कॉप्या सुरू असल्याचे पहावयास मिळाले़ यावेळी ११ अनाधिकृत शिक्षक व वसतिगृह कर्मचारी येथे आढळून आले़ येथील केंद्र संचालकांनी यापैकी काही शिक्षकांना भूमिती विषयासाठी केंद्रावर अनाधिकृत व्यक्तींच्या मदतीने जबाबदारी दिल्याचे आढळून आले़ त्यामुळे सीईओ पृथ्वीराज यांनी महाराष्ट्र विद्यापीठ महामंडळ व इतर निर्विधिष्टीत होणाऱ्या परीक्षेतील गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम १९८२ कलम ७ व इतर प्रचलित कायदे, शासन निर्णय व शासकीय धोरण आयपीसीनुसार केंद्र संचालक प्रदीप मारोती जाधव, बालाजी विठ्ठलराव बनसोडे, प्रभू किशन भुसारे, शेषराव  हरिभाऊ भुसारे, अनंता माधवराव भुसारे, विरेंद्र सुदामराव भुसारे, शंकर ज्ञानदेवराव पवार, मारोती नामदेव भुसारे, विठ्ठल प्रल्हादराव भालेराव, धम्मपाल मनोहर रणवीर, संतोष पुरभाजी मोरतळे यांच्याविरूद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पथकाला दिले आहेत़ त्यानंतर १० शिक्षक व केंद्रप्रमुखास ताब्यात घेऊन पूर्णा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़ 

बैठे पथकास दिले अभय
एरंडेश्वर येथील हायटेक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर नियमित ५२६ व ४० पूनरपरीक्षा देणारे असे एकूण ५६६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत़ या परीक्षा केंद्रावर ५ कर्मचाऱ्यांचे बैठे पथकही नियुक्त करण्यात आले होते़ सीईओ पृथ्वीराज यांच्या पथकाच्या भेटीत परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असताना व परीक्षा प्रक्रियेशी संबंधित नसलेले अनाधिकृत व्यक्ती परीक्षा प्रक्रियेत सहभागी झाले असताना या केंद्रावरील बैठे पथक काय करीत होते? असा सवाल उपस्थित होत आहे़ विशेष म्हणजे परीक्षा केंद्रावर गैरप्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी बैठे पथकातील कर्मचाऱ्यांना का अभय दिले जात आहे? त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही? असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. जि़प़ सीईओ पृथ्वीराज यांनी पूर्णा येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात ५ अधिकाऱ्यांचे भरारी पथक व बैठे पथकासह केंद्राला भेट दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे़ आता बैठे पथक हे केंद्रावर बसूनच असते़ मग भरारी पथकासह भेट देण्यासाठी बैठे पथकातील कर्मचारी कसे काय आले? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़ 

१४ विद्यार्थ्यांवर कारवाई
हायटेक विद्यालयाच्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर कॉप्या करीत असताना १४ विद्यार्थी आढळून आले़ या विद्यार्थ्यांवर पथकाने कारवाई केली़ याशिवाय जिल्ह्यात एकूण २९ विद्यार्थ्यांवर कॉपी केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली़ त्यामध्ये पिंगळी येथील आनंद माध्यमिक विद्यालयाच्या केंद्रावर २, पूर्णा येथील संस्कृती माध्यमिक विद्यालयाच्या केंद्रावर २ आणि सोनपेठ तालुक्यातील खडका कॅम्प येथील श्री माधवाश्रम विद्या मंदिरच्या केंद्रावर ११ विद्यार्थ्यांवर कॉपी केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली़ 

Web Title: mass copy in Class 10 th exam in Parbhani; The order of the CEOs to file cases against 11 teachers, including the Center Chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.